मोबाईल ...आपल्या दैनंदिन जिवनात संवादाचे एक अविभाज्य अंग . सहज कुठेही नेण्यासारख्या वस्तुमुळे आपण मोबाइल विशेषण जोडून नवीनशब्द तयार केले.उदा.मोबाईल व्हॅन, मोबाईल विधी सेवा केंद्र !
होय मोबाईल विधी सेवा केंद्र . संवादासाठी वापरल्या जाणा-या मोबाईल या यंत्राप्रमाणेच मोबाईल विधी सेवा केंद्रही आपल्याला पाहिजे त्या ठिकाणी नेता येते व न्यायविषयक प्रक्रिया पार पाडता येते. मंगळवार दि.१९ जानेवारी २०१० रोजी नवीमुंबईतील आग्रोळी - बेलापुर येथे न्याय आपल्या दारी योजनेअंतर्गत मोबाईल विधी सेवेच्या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. महाराष्ट्र राज्य विधी सेवा प्राधिकरणातर्फे राज्यात प्रथम सुरु करण्यात आलेल्या फिरते विधी सेवा केंद्र व लोक अदालत यांच्यामार्फत न्याय प्रक्रियेबबाबत जनजागृती व्हावी या उद्देषाने मोबाईल विधी सेवा केंद्र सुरु करण्यात आले आहे. राज्य सरकारच्या तंटामुक्ती गाव योजनेचा एक भाग म्हणुनही ही मोबाईल विधी सेवा कार्यरत रहाणार आहे.
गरीबांना मोफत विधी सल्ला देणे, न्यायालयात दाखल होण्यापूर्वीच्या याचिकांवर तसेच न्यायालयात दाखल झालेल्या याचिकांवर या फिरत्या न्यायालयात सुनावणी होते. आपापसातील मारामारी, बँकेने ग्राहकास पाठविलेली वसुलीसाठीची कायदेशीर नोटीस, पोटगीसाठीच्या याचिका, किरकोळ जमीनीचा वाद, चेक रिटर्नची याचिका सामंजस्याने या न्यायालयात निकाली काढल्या जातात.
मोबाईल विधी सेवा कार्यक्रमात एक निवृत्त न्यायाधिश , एक वकिल, विधी महाविदयालयाचे विदयार्थी, सामाजिक कार्यकर्ता यांचा समावेश असतो. मोबाईल व्हॅनची मागील बाजुचे दरवाजे उघडे करुन सहा जणांची बसण्याची व्यवस्था होईल एवढया खुर्च्या तेथे मांडलेल्या असतात. तसेच गाडीच्या बाजुला दाव्याकरीता उपस्थित नागरिक व वकिलांसाठी काही खुर्च्या असतात. स्थानिक न्यायालय, लोकन्यायालय, सामाजिक कार्यकर्ते यांच्यामार्फत या मोबाईल विधी सेवा केंद्राची माहिती स्थानिक पातळीवर दिली जाते.त्यामुळे या कार्यक्रमास प्रतिसाद मिळण्यास मदत होते.
ज्या व्यक्तीची केस मा.न्यायाधिशांसमोर येते त्याचे नाव माईकवरुन उच्चारले जाते. याठिकाणी वादी व प्रतिवादी दोन्ही उपस्थित रहात असल्याने खटले निकाली निघण्याचेही प्रमाण चांगले आहे. दि.१७ जानेवारी रोजी उदघाटनाच्या दिवशी मुंब्रा येथे या न्यायालयामार्फत ४० लाख रुपयांहुन आधिक रकमेचे दावे निकाली काढण्यात आले होते. दि.२६ फेब्रुवारी २०१० पर्यत ही मोबाईल विधी सेवा व्हॅन ठाणे जिल्हयात असुन त्यापुढे ती नासिक जिल्हयात जाणार आहे.
लोकशाहीच्या चार आधारस्तंभापैकी न्यायव्यवस्था हा एक महत्वाचा आधारस्तंभ आहे. वाढत्या लोकसंख्येच्या अन्न वस्त्र निवारा या प्राथमिक गरजांसोबतच न्यासव्यवस्था हि सामाजिक गरज आहे. इतर सेवेप्रमाणेच नागरिकांना विनासायास न्याय मिळुन न्याय व्यवस्थेवरील त्याचा विश्वास दृढ झाल्यास सामाजिक सौहार्दाचे वातावरण कायम रहाते. निकाली निघत असलेले तंटे पाहुन या योजनेमागचा उद्देश सार्थ झाल्याचे मला भासले.
'महान्यूज'
1 टिप्पणी:
very exelent
टिप्पणी पोस्ट करा