शुक्रवार, २४ फेब्रुवारी, २०१२

महिलांच्या सुरक्षिततेसाठी....

आपली संस्कृती स्त्रीचा सन्मान करायला शिकविते; प्रत्यक्षात चित्र मात्र वेगळे दिसते. महिलांच्या वाट्याला उपेक्षा आणि छळच जास्त येतो. नगर जिल्हा तर महिलांच्या छळात आघाडीवर असल्याचे आकडेवारी सांगते. रात्रीचे सोडाच, भरदिवसाही महिलांना घराबाहेर पडल्यावर छेडछाडीला समोरे जावे लागते आहे. काहींना घरात कुटुंबीयांकडून होणारा छळ, तर कोणाला बाहेर टवाळखोरांकडून होणारी छेडछाड सहन करावी लागते. बाजारात खरेदीसाठी गेलेल्या, बस किंवा रिक्षाने प्रवास करणाऱ्या महिला, कार्यालयांत काम करणाऱ्या महिलांना हा त्रास नेहमीचा झाला आहे. त्याकडे ना समाज गांभीर्याने पाहतो, ना पोलिस. त्यामुळे कोणाचाही धाक नसलेले हे "रोडरोमिओ' महिलांना छळत आहेत. दाद मागूनही उपयोग होत नसल्याने महिला हा त्रास मुकाटपणे सहन करीत आहेत.
"पुरोगामी जिल्हा' म्हणून ओळखल्या जाणाऱ्या नगर जिल्ह्यातील महिलांच्या सुरक्षेची स्थिती अत्यंत वाईट आहे. पोलिस यंत्रणेकडून जाहीर झालेली 2010मधील यासंबंधीची आकडेवारीच पुरेशी बोलकी आहे. या वर्षात जिल्ह्यात स्त्रियांवरील अत्याचाराच्या 962 घटना घडल्या. याबाबतीत जिल्ह्याचा राज्यात दुसरा क्रमांक लागतो. पती-नातेवाइकांकडून होणाऱ्या छळात तर जिल्ह्याने राज्यात "आघाडी' घेतली. अशा प्रकारचे 604 गुन्हे नोंदले गेले. हुंड्यासाठी 24 महिलांच्या खुनाचा प्रयत्न आणि 32 जणींचा खून झाल्याने जिल्ह्याने यातही राज्यात आघाडी घेतली. बलात्काराची 57 व छेडछाडीची 115 प्रकरणे वर्षभरात नोंदली गेली. यावरून आपल्या जिल्ह्यात महिलांच्या सुरक्षेची स्थिती लक्षात येते.

नगरमध्ये गेल्या आठवड्यात "एएमटी' बसमध्ये महाविद्यालयीन तरुणींची छेड काढण्यात आली. या विद्यार्थिनींनी टवाळखोरांसह बस पोलिस चौकीत आणली. चौकीत पोलिस नव्हते. त्यांना चौकीत येण्यासाठी पोलिसांना उशीर लागलाच; पण प्रत्यक्षात गुन्हा नोंदवून घेण्यासाठीही खूपच उशीर झाला. या काळात संबंधित विद्यार्थिनींना जो मनस्ताप सहन करावा लागला, तो टाळता आला असता. तसे झाले असते तर अशा गुन्ह्यांमध्ये तक्रारी देण्यासाठी महिला पुढे आल्या असत्या. त्या माध्यमातून टवाळखोरांवर जरब बसण्यास मदत झाली असती; पण ही घटना पोलिसांनी गांभीर्याने घेतली नाही, कोणा संघटना अगर नागरिकांनीही. या घटनेच्या वेळी पोलिसांचे वर्तन आणि कार्यपद्धती पाहिली तर अशा घटना कशा हाताळू नयेत, याचेही ते एक उदाहरण होते, असेच म्हणावे लागेल.

आपल्या आजूबाजूला सतत अशा घटना घडतात. त्यामुळे "हे होणारच,' असे म्हणत तर कधी त्यासाठी महिलांनाही दोषी धरत याकडे दुर्लक्ष करण्याची वृत्ती वाढली आहे. ही वृत्ती जशी नागरिकांमध्ये वाढली, तशी ती पोलिसांमध्येही वाढली आहे. त्यामुळेच टवाळखोरांचे धाडस वाढते आहे. समाज तर आपले काहीच करू शकत नाही; पण पोलिसांचीही कसली आलीय भीती, अशीच टवाळखोरांची भावना झाली आहे. अशा साध्या साध्या घटनांमधून पोलिसांची परीक्षा घेतलेले हेच टवाळखोर नंतर इतर गुन्हे करण्यास प्रवृत्त होतात, हेही ध्यानात घेतले पाहिजे. किरकोळ घटनांमध्ये पोलिसांनी तातडीने केलेली कारवाई पुढील मोठ्या घटना टाळणारी ठरते.

या घटनांना आळा घालण्यासाठी समाजापासून सुरवात झाली पाहिजे. घरातच स्त्रियांना सन्मानाची वागणूक मिळाली, त्यांना योग्य तो आधार मिळाला, तर बाहेर घडणाऱ्या अशा घटनांचा सामना करण्यासाठी आवश्‍यक असलेले नैतिक बळ त्यांना मिळेल. मात्र, अशा घटनांना स्त्रियांनाही जबाबदार धरण्याची अगर संशयाने पाहण्याची वृत्ती असल्याने त्या पोलिसांकडेच काय तर घरीही तक्रार करीत नाहीत. त्यांना ना समाजाचा आधार वाटतो, ना पोलिसांचा. त्यामुळे त्यांनी तकार करायची तरी कोठे? आणि ती केली तरी त्याचा खरेच उपयोग होतो का? या घटना थांबणे दूरच; त्यातून नवीनच समस्या निर्माण होतात. त्यामुळे मुकाटपणे हा त्रास सहन करण्याशिवाय त्यांच्यापुढे पर्याय राहत नाही.

1 टिप्पणी:

आत्मनिर्भर म्हणाले...

मा.इंदिरा इज इंडिया गांधींनी सांगितलेला उत्तम उपाय, "सेल्फ रिलायन्स..." म्हणजे आपण स्वतःच आपल्या शरीराचे पोलीस द्विदल बनवायचे... वाटते तेवडे सोपे नाही पणं त्यासाठी इतर कोणालाही पे देखिल करावे लागत नाही...