गुरुवार, ९ फेब्रुवारी, २०१२

आता आव्हान नवे तंटे थांबविण्याचे!

जिल्हा परिषद-पंचायत समितीच्या निवडणुकीमुळे जिल्ह्यातील राजकीय वातावरण ढवळून निघाले. गावपातळीपर्यंत गढूळ झालेल्या परिस्थितीमुळे नव्या तंट्यांना सुरवात होणार आहे. गेल्या वर्षी तंटामुक्त गाव मोहिमेत राज्यात पहिला क्रमांक मिळविलेला नगर जिल्हा आता वेगळ्या वळणावर येऊन ठेपला असताना, नव्याने होणारे तंटे शोभणारे नाहीत. त्याला वेळीच आळा घालण्यासाठी पोलिसांनी आणि सामाजिक कार्यकर्त्यांनी तातडीने प्रयत्न करण्याची गरज आहे. जनसंपर्काची आवड असलेल्या आणि आपल्या भाषणातून छाप पाडण्याचे कौशल्य असलेल्या पोलिस अधीक्षक कृष्णप्रकाश यांनी ग्रामीण भागावर लक्ष केंद्रित करून आपल्या या कौशल्याचा वापर केला तर बरेच काम सोपे होईल.
या वेळी निवडणुकीच्या प्रचारात मुद्दे नव्हतेच; होती ती केवळ एकमेकांवर चिखलफेक आणि नंतर गुद्दागुद्दी. नेत्यांनी एकमेकांवर तोंडसुख घेतले, तर कार्यकर्त्यांनी हातसफाई अन्‌ कोठे एकमेकांचा उद्धार केला. त्यामुळे प्रत्येकाच्याच मनात खदखद आहे. निकालानंतर ती बाहेर पडण्याची शक्‍यता जास्त असते. मोठ्या निवडणुकांपेक्षा जिल्हा परिषद, पंचायत समिती आणि ग्रामपंचायतीच्या निवडणुकांनंतर होणाऱ्या भांडणांचे प्रमाण अधिक असल्याचे निरीक्षणावरून आढळून येते. यासाठी काहीही कारण पुरते. एकमेकांकडे रोखून पाहणे, समोरून जोरात वाहन चालविणे, जोरजोरात हसणे अशी किरकोळ कारणेसुद्धा मोठ्या भांडणांसाठी पुरेशी ठरतात. निवडणुकीचा वाद वैयक्तिक पातळीवर आणला जातो. शेताच्या बांधावरून जाऊ न देणे, रस्ता अडविणे, पाणी बंद करणे, ग्रामपंचायत अगर इतर सरकारी कामात अडवणूक करणे असे प्रकार सुरू होतात. हीच प्रकरणे पुढे हातघाईवर येतात आणि दोन व्यक्ती, दोन गट यांच्यामध्ये वैर निर्माण होते. त्याचा परिणाम गाव प्रशासन आणि सहकारी संस्थांच्या निर्णय प्रक्रियेत होऊन विकासाची कामेही मागे पडू शकतात. त्याहीपेक्षा वाढणारे फौजदारी गुन्हे जास्त डोकेदुखी करणारे ठरतात. शिवाय याच्याशी ज्यांचा संबंध नाही, अशी सामान्य जनताही यामध्ये भरडली जाते. भांडणे करणाऱ्यांचीच डोकी फुटत असली, तरी संपूर्ण गावात दहशतीचे आणि अस्वस्थतेचे वातावरण निर्माण होते.

अर्थात हे प्रकार नेहमीचे असले तरी या वेळी जिल्ह्याला वेगळी ओळख प्राप्त झालेली आहे. कसा का होईना गेल्या वर्षी नगर जिल्हा राज्य सरकारच्या तंटामुक्त गाव मोहिमेत राज्यात प्रथम आला. त्यामुळे "राजकारण्यांचा जिल्हा' अशी ओळख असलेल्या जिल्ह्याला "तंटामुक्त जिल्हा' अशी ओळख प्राप्त झाली. ती टिकविण्याचे आव्हान पोलिसांसह नेते, कार्यकर्ते आणि नागरिकांसमोरही आहे. जिल्ह्यात बांधावरून होणाऱ्या भांडणाचे प्रमाण जसे अधिक आहे, तसेच निवडणुकीनंतर होणाऱ्या भांडणाचेही आहे. निवडणूक संपली. झाले गेले विसरून जाऊ. एकमेकांची डोकी फोडण्यापेक्षा आपली डोकी शांत ठेवू, असा विचार करण्याची गरज आहे. त्यासाठी वातावरण निर्मिती करावी लागेल. निवडणुकीची आचारसंहिता संपताच पोलिसांनी पुन्हा तंटामुक्त गाव मोहिमेच्या माध्यमातून गावोगावी बैठका सुरू करून हे काम केले आणि त्यांना इतर खात्याच्या अधिकाऱ्यांचे सहकार्य मिळाले तर तापणारी डोकी वेळीच शांत होऊन अनेक गावे आणि गावातील डोकीही फुटण्यापासून वाचतील.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत: