![](https://blogger.googleusercontent.com/img/b/R29vZ2xl/AVvXsEhLCgzK1lHMjqUC6zEXXCdSC-cdB5qqtANEFWRH8nuWays5NfUWkGlZ5fYvpsLsRkESmFuqrfN7qn6b5FkTfzaT8eAvNAs4t4Hv-Tvgqu1GVyR72Aq7cU7cU4mrakYn5EHUjmZb_YjOvTc/s200/police2.jpg)
शहीद पोलिसांची आठवण ठेवताना पोलिसांच्या सध्याच्या अवस्थेकडे मात्र दुर्लक्ष होता काम नये; कारण इतर दिवशी पोलिसांना शिव्याशाप देण्यातच आपण धन्यता मानत असतो. प्रत्यक्षात पोलिस कोणत्या परिस्थितीत काम करतात, याचा विचार ना सरकार करते, ना जनता. कोणत्याही घटनेला पोलिसांना जबाबदार धरले जाते; पण तीही माणसेच आहेत, काम करण्यासाठी त्यांनाही काही सुविधा हव्या आहेत, त्यांच्या कुटुंबांच्या काही गरजा आहेत, याकडे लक्ष दिले जात नाही. राज्यातील कोणत्याही पोलिस वसाहतीत जाऊन पहा, पोलिस आणि त्यांचे कुटुंबीय कसे राहतात ते. माणसांना राहता येईल, अशा सोयी-सुविधा तरी तेथे आहेत का? बारा तासांची ड्युटी करून दमूनभागून घरी गेलेला पोलिस तेथे शांतपणे विश्रांती तरी घेऊ शकतो का? त्याच्या कुटुंबाचे इतर प्रश्न तर दूरच राहिले; निवाऱ्याचा प्रश्नसुद्धा सुटलेला नसतो. इतर कोणत्याही सरकारी कर्मचाऱ्यांच्या तुलनेत पोलिसांची होणारी हेळसांड जास्त आहे. त्यांचे काम आणि त्यांच्याकडून असणाऱ्या समाजाच्या अपेक्षा किती तरी जास्त आहेत. त्यांच्यावर कामाचा ताण असूनही ते काम करण्यासाठी त्यांना पोषक वातावरण असतेच असे नाही. पोलिस ठाण्यांच्या इमारतीही जुनाट. इमारतीत पुरेशा प्रकाशाची सोय नाही. कित्येक पोलिस ठाण्यांत स्वच्छतागृहांचीही सोय नाही. कामासाठी लागणारी साधनसामग्री मिळत नाही. आधुनिक साधने नाहीत. अशाही स्थितीत पोलिसांना काम करावे लागते.
बदलत्या सामाजिक आणि राजकीय परिस्थितीमुळे सतत स्फोटक बनलेले वातावरण. कधी कोठे काय होईल याचा भरवसा नाही. कोणत्याही स्थितीत येणाऱ्या परिस्थितीला समोरे जाण्याची तयारी त्यांना ठेवावी लागते. या गडबडीत कुटुंबाकडे तर सोडाच; पण स्वतःकडेही लक्ष द्यायला त्यांना वेळ नसतो. त्यामुळे आजार मागे लागतात. त्यासाठी सरकारने सुविधा उपलब्ध करवून दिल्या असल्या, तरी तपासणी आणि उपचार करण्यासाठी रजा नाही. अशा स्थितीत नोकरी करून सेवानिवृत्त होताना बहुतांश पोलिस आजार सोबत घेऊनच जातात.
पोलिसांची ही बाजू कधीही पाहिली जात नाही. त्यांच्या कामाबद्दल ओरड करताना त्यांच्या कचखाऊ आणि पैसेखाऊ वृत्तीवर जास्त टीका होते; मात्र त्यांच्या अंगी या सवयी कशा रुजल्या, याचाही विचार होण्याची गरज आहे. राजकीय हस्तक्षेप आणि गुन्हेगारीचे राजकीयीकरण, यांमुळे आरोपींविरुद्ध कारवाई करताना पोलिस कचखाऊ वृत्तीने वागतात; कारण त्यांच्या बदल्या आणि इतर गोष्टी राजकीय व्यक्तींच्या हातात असतात. वरिष्ठ अधिकारीही त्यांच्याच इशाऱ्यावर काम करीत असताना सामान्य पोलिसांकडून निःपक्षपणाची अपेक्षा कशी करता येईल? बदलीसाठी पैशाचे व्यवहार होतात. हा पैसा मिळविण्यासाठी लाचखाऊ वृत्ती बळावते आणि तो पोलिसांचा स्वभाव होऊन जातो. कसेही वागले, तरी जनतेच्या रोषाचे बळी ठरावे लागत असल्याने पोलिसही मग ही वृत्ती सोडायला तयार होत नाहीत.
26 नोव्हेंबरच्या निमित्ताने पोलिस दल व त्यांच्या कामाबद्दल, सुविधांबद्दल चर्चा होत असताना याही गोष्टींकडे लक्ष देण्याची गरज आहे. जनतेला जर खरेच पोलिसांबद्दल आस्था असेल, तर या गोष्टी टाळणे त्यांच्याही हातात आहे.
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा