बुधवार, २० मे, २००९

वर्षभर तुरुंगवासनंतर लग्नाची बेडी


प्रेयसीवर ऍसिड फेकल्याच्या प्रकरणात न्यायालयाने प्रियकरला दोषी धरले. पण मधल्या काळात न्यायालयाच्याच सूचनेनुसार त्या दोघांनी लग्नही केले होते. त्यामुळे न्यायालयानेही सामाजिक दृष्टीकोन ठेवून त्याला एक वर्षे तुरुंगावासाची शिक्षा दिली. ही शिक्षा त्याने आधीच भोगलीही आहे. त्यामुळे त्याच्या हातातील कायद्याची बेडी आता निघणार असून "लग्नाच्या बेडी'चे कर्तव्य निभावण्यासाठी तो मोकळा झाला आहे.
जवळा (ता. पारनेर) येथील हे प्रकरण आहे. मनोहर रामचंद्र बरसिले (वय 21) याचे त्याच गावातील एका मुलीवर प्रेम होते. त्याने तिच्याशी लग्न करण्याची इच्छा व्यक्त केली; पण तिने आपला विचार झाला नसल्याचे आणि आई-वडिलांना विचारल्याशिवाय निर्णय घेणार नसल्याचे सांगितले. त्यामुळे त्याने रागाच्या भारात मध्यरात्री घराबाहेर झोपलेल्या त्या मुलीच्या तोंडावर ऍसिड फेकले. यामध्ये त्याला अटक झाली. त्याच्याविरूद्धचा खटल्याची सुनावणी येथील जिल्हा न्यायाधीश रमेश कदम यांच्यासमोर त्याची सुनावणी झाली. मधल्या काळात दोन्ही कुटुंबांचे आणि गावकऱ्यांचेही मत बदलले होते. खटला चालवून शिक्षा देण्यापेक्षा दोघांचे लग्न लावून देण्याचा विचार पुढे आला. दोन्ही कुटुंबांना तो मान्य झाला. सरकारी वकील ऍड. सतीश पाटील यांना याबद्दल माहिती देण्यात आली. त्यांनीही सहकार्याची भूमिका घेऊन न्यायालयास विनंती केली; पण आधी लग्न करावे आणि नंतरच खटल्याचा काय तो निर्णय घ्यावा, असे ठरले. त्यानुसार लग्नासाठी म्हणून मनोहरला पंधरा दिवसांसाठी जामिनावर सोडण्यात आले. नुकतेच त्यांनी लग्न केले. तो पुन्हा तुरुंगात गेला आणि खटल्याचे कामकाज सुरू झाले.
आज या खटल्याचा निकाल देण्यात आला. समोर आलेल्या साक्षीपुराव्यावरून न्यायालयाने आरोपी मनोहर याला दोषी धरले. यामध्ये दहा वर्षांपर्यंत शिक्षेची तरतुद आहे. मात्र, शिक्षेबद्दल युक्तिवाद करताना आरोपीने आपण या मुलीशी न्यायालयाच्या सूचनेप्रमाणे विवाह केला असून तिचा योग्य पद्धतीने सांभाळ करणार असल्याचे आरोपीने सांगितले. शिवाय तिच्यावर प्लॉस्टीक सर्जरीद्वारे उपचार सुरू असल्याचेही सांगण्यात आले. त्यामुळे न्यायालयाने सर्वोच्च न्यायालयाच्या एका निकालाचा आधार घेत आरोपीला एक वर्ष तुरुंगवास व पाचशे रुपये दंड अशी शिक्षा दिली. अटक झाल्यापासून म्हणजे सुमारे वर्षभर आरोपी तुरुंगातच आहे. त्यामुळे हा काळ शिक्षेतून वजा केल्यास त्याची शिक्षा भोगून झाली असून उद्याच त्याची तुरुंगातून सुटका होणार आहे.

शिक्षा आणि न्यायही!
न्यायनिर्णयात न्यायाधीशांनी म्हटले आहे की, आरोपी दोषी आढळल्याने त्याला शिक्षा देणे क्रमप्राप्त आहे. गुन्हा केल्यावर शिक्षा होते, हा संदेश समाजात जायला हवा. मात्र, त्याला शिक्षा दिल्याने त्या मुलीच्या आयुष्याचा प्रश्‍न सुटला नसता. आरोपीने फिर्यादी मुलीशी लग्न केल्याने सामाजिक दृष्टीकोन ठेवत शिक्षा कमी करण्यात आली आहे. आरोपीला शिक्षा आणि फिर्यादीचेही पुनर्वसन असा हा न्यायनिवाडा आहे.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत: