बुधवार, १३ मे, २००९

पुन्हा एकदा "ड्रॉप'!


स्वस्तात सोने देऊन लुटण्याच्या घटना आता काही नवीन राहिल्या नाहीत. तरीही लोक त्याला बळी पडतात. ज्यांच्याशी पुरती ओळखही नाही, अशा लोकांवर विश्‍वास ठेवून आडरानात लाखो रुपये घेऊन लोक जातातच कसे? याचे आश्‍चर्य वाटते. नगर जिल्ह्यातील काही तालुक्‍यांमध्ये अशा घटना वारंवार घडतात. प्रसारमाध्यमांमुळे ही माहिती आता राज्यभर पसरली आहे. तरीही शहरी आणि सुशिक्षित लोक अशा लुटमारीचे बळी ठरतात हीही खेदाचीच गोष्टी आहे. झटपट श्रीमंत होण्याचा मोहच त्यांना यासाठी प्रवृत्त करतो, असेच म्हणावे लागेल.
शेवगाव तालुक्‍यात पुन्हा एकदा अशी घटना घडली आहे. स्वस्तात सोने देण्याचे आमिष दाखवून, मुंबई येथील पाच जणांना जबर मारहाण करून त्यांच्याकडील तीन लाख बत्तीस हजारांची रक्कम व इतर साहित्य दरोडेखोरांनी हिसकावून घेतले. ही घटना शेवगाव-पैठण राज्यमार्गापासून जवळच असलेल्या खानापूर ते घारी दहिगाव रस्त्यावर भर दुपारी दोनच्या सुमारास घडली. मुंबई येथील संदीप मधुकर घारे यांना एका मध्यस्थाने "स्वस्तात सोने देतो,' असे आमिष दाखवून घटनास्थळी बोलावून घेतले. मध्यस्थ घारे यांचे मित्र शेषराव गंगाराम इंगळे यांच्याकडे कामाला होता. त्याचे पूर्ण नाव कोणालाही माहीत नव्हते; मात्र विश्‍वास बसावा म्हणून त्याने काही दिवसांपूर्वी त्यांना सोन्याचा छोटासा तुकडा दाखविला व आमच्या भागात आल्यानंतर अत्यंत स्वस्त भावात हे सोने देऊ, असे सांगितले. त्याच्यावर लगेचच विश्‍वास ठेवून स्वस्तातील सोने खरेदी करण्यासाठी संदीप मधुकर घारे, शेषराव गंगाराम इंगळे, नीलेश श्रीकांत लोखंडे, अर्जुन उमरजी डोके (सर्व रा. चारकोप, मुंबई) व प्रदीप सूर्यकांत घाणेकर (रा. सांताक्रूझ, मुंबई) हे पाच जण एमएच-02 एल-5751 या क्रमांकाच्या मारुती मोटारीतून खानापूर शिवारात आले.
दोन मध्यस्थांनी या पाच जणांना आडरस्त्याला असलेल्या एका शेताच्या शिवारात नेले. त्यांनी रक्कम काढताच शेजारील शेतात उसात लपून बसलेल्या दहा ते बारा जणांनी येऊन तीन लाख बत्तीस हजारांची रक्कम व त्यांच्याकडील मोबाईल संच हिसकावून घेतले. शिवाय या पाच जणांना बेदम मारहाणही केली. जवळचे पैसे तर गेलेच, पण मार खाण्याचीही वेळ त्यांच्यावर आली. अशा घटनांच्या बातम्या वृत्तपत्रांतून वारंवार येत असतात. तरीही लोक याला फसतातच. यामागे संबंधित गुन्हेगारांचे कौशल्य आणि त्यावर विश्‍वास ठेवणाऱ्या लोकांचा भाबडेपणाही कारणीभूत असावा.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत: