मंगळवार, १३ सप्टेंबर, २०११

पुण्याचा गणेशोत्सव अडकला मानपान आणि शोबाजीत

लोकमान्य टिळकांनी सुरवात केलेल्या पुण्यातील गणेशोत्सावाबद्दल राज्यभरातील नव्हे तर राज्याबाहेर आणि सातासमुद्रापारही आकर्षण आहे. मलाही याबद्दल आकर्षण होते. यावर्षी पुण्यातील गणेशोत्सव जवळून पाहण्याचा योग आला. माझ्या कल्पनेपेक्षा तो खूपच वेगळा वाटला. एका वाक्यात सांगायचे झाले तर हा उत्सव मानपान आणि शोबाजीत अडकलेला दिसून आला. ज्या मंडळांना संधी मिळतेय ते शोबाजी करतायत आणि ज्यांना उत्सव करायचाय त्यांना संधी मिळत नाही, असे चित्र पहायला मिळाले. येथील नागरिक म्हणतात बदलत्या पुण्याबरोबर उत्सव बदलला, तेही खरे आहे. चोखंदळ पुणेकरांनी हा बदल कसा काय स्वीकारला? की त्यांचीही या बदलाला संमती आहे, हे मा्त्र कळत नाही.

शहरात सुमारे साडेतीन हजार मंडळांकडून उत्सव साजरा केला जातो. त्यातील साडेपाचशेच्या आसपास मंडळे मुख्य विसर्जन मिरवणुकीत सहभागी होतात. ही मिरवणूक पंचवीस ते तीस तास चालते. विशेष म्हणजे मिरवणुकीत सकाळी पाच आणि सायंकाळी पाच अशा दहा मंडळांचा मान आहे. ही मंडळे गेल्याशिवाय इतरांना मार्गावर संधी नाही. या मंडळांना मिरवणुकीसाठी चाैदा ते पंधरा तास लागतात. उरलेल्या वेळात इतर मंडळांची मिरवणूक चालते.

जी अवस्था मिरवणुकीची तीच एकूण उत्सवाची आहे. प्रमुख आठ-दहा मंडळांभोवतीच उत्सव फिरतो. आणि हा उत्सव म्हणजे तरी काय तर केवळ शोबाजी. शिवाय गणेशोत्सवाच्या जोडीने सुरू झालेले इतर उत्सवही आता मागे पडू लागले आहेत. देखाव्यांमध्येही समाजप्रबोधन, नवा विचार, कल्पकता यांचा फारसा विचार केलेला दिसत नाही. मोठी मंडळे किती महागडा देखावा केला यावर भर देतात, तर छोटी मंडळे मिळालेल्या वर्गणीत मिरवणुकीसाठी मोठा पैसा मागे ठेवून उरलेल्यांत बाकीचा खर्च भागवितात. मोजकीच मंडळे याला अपवाद ठरतील.

विसर्जन मिरवणूकही आनंददायी ठरण्यापेक्षा नागरिकांना त्रासदायकच वाटू लागली आहे. मंडळाचे कार्यकर्तेच नव्हे तर मिरवणूक पाहायला येणारे कित्येक जण तर्रर असतात. एक इव्हेंट म्हणूच याकडे पाहिले जाते. त्यामुळे कंपन्या जाहिरातींसाठी आणि नागरिक एन्जाॅय करण्यासाठी या उत्सवाकडे पाहू लागले आहेत. त्यामुळे त्यातील पावित्र्य आणि् उत्सवीस्वरुप जाऊन त्याला बाजारी स्वरूप आले आहे.

वाढते शहरीकरण आणि दहशतवादी कारवायांच्या पार्श्वभूमीवर या उत्सवावर आता बंधनेही तेवढीच येऊ लागली आहेत. त्यामुळे उत्सव पोलिसांच्या ताब्यात गेल्याचेच दिसते. उत्सवाचे नियम पोलिस तयार करतात. प्रत्येक ठिकाणी उत्सवापेक्षा सुरक्षा महत्त्वाची असे सांगत अनेक बंधने लादली जातात. त्यामुळे एकूणच प्रशासन आणि सामान्यांच्या दृष्टीने हा उत्सव दहशतीच्या वातावरणातच पार पडतो. लोकांनी एकत्र यावे, विचारांची देवाणघेवाण करावी, त्यातून नवे काही तरी केले जावे हा या उत्सवाचा उद्देश होता. ती गरज आजही संपलेली नाही. पुणे वाढत असले तरी त्याच्या नियोजनाची गरज आहे. हे नियोजन लोकांच्या अशा एकत्र येण्यातूनच होणार आहे. पण हे एकत्र येणे केवळ उत्सव किंवा इव्हेंट ठरू नये. उत्सवातून आनंद मिळालाच पाहिजे, याबद्दल दुमत नाही. पण या उत्सवाचा मूळ उद्देशही विसरता कामा नये, किमान पुण्यात तरी.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत: