सुटे पैसे देण्याची माणुसकी दाखविली खरी; परंतु हाती ढबूही पडला नाही. त्यामुळे डोक्याला हात लावण्याची वेळ कोल्हारमधील (जि. नगर) एका गुरुजींवर आली. सुटे पैसे मागण्याचा बहाणा करून त्यांना नगरमध्ये अगदी भरदुपारी एका लबाडाने सहा हजार रुपयांना सहजपणे गंडविले.
बाळासाहेब यशवंत गांगर्डे असे फसविले गेलेल्या गुरुजींचे नाव असून, ते कोल्हार खुर्द (ता. राहुरी) येथील पाटीलवाडी शाळेत नोकरीस आहेत. उसने पैसे घेऊन गृहकर्जाचा हप्ता भरण्यासाठी ते नगरला गेले होते. युनियन बॅंकेच्या सावेडी शाखेत त्यांना पैसे भरावयाचे होते. बॅंकेजवळ स्प्लेंडर मोटारसायकलवरून आलेल्या भामट्याने गुरुजींना रामराम घातला. त्याच्याकडे पाहून क्षणभर बुचकळ्यात पडलेल्या गुरुजींना थोडाही विचार करू न देता तो म्हणाला, "मला ओळखले नाही? माझे नाव भाऊसाहेब खर्डे. मी तुमच्याच गावचे (कोल्हार) शंकरनाना खर्डेंचा पुतण्या.' नानांचे नाव सांगितल्यामुळे गुरुजींची झाली पंचाईत. तरीही गुरुजींनी स्वतःजवळ पैसे नसल्याचे सांगितले. त्यावर भामटा म्हणाला, "तुमच्या पॅंटच्या खिशात असतील तेवढे सुटे पैसे द्या. मी बंधे देतो.' गुरुजींनी त्याला खिशातील सहा हजार रुपये दिले. भामटा म्हणाला, "चला माझ्याबरोबर. घरून बंधे पैसे देतो.' त्याच्या ताब्यात पैसे गेले असल्यामुळे गुरुजींना निमूटपणे त्याच्या मोटारसायकलवर बसणे भाग पडले.
भामट्याने जवळच असलेल्या सावेडीतील एका बंगल्यासमोर गुरुजींना नेले. बंगल्याच्या दरवाजासमोर उभा राहून "पप्पू दरवाजा उघड' अशी हाक भामट्याने मारली; मात्र दरवाजा उघडला गेला नाही. तोपर्यंत "गाडी सावलीत लावतो' असे सांगून भामटा सटकला... तो मोटारसायकलवरून पाइपलाइन रस्त्याकडे सुसाट निघूनही गेला. गुरुजींनी हा प्रकार कोल्हारचे अभियंते शिरीष भीमाशंकर खर्डे यांना सांगितला व शंकरनानांचा कोणी पुतण्या नगरला आहे काय, याची चौकशी केली; मात्र नगरला नानांचे कोणीच नातलग नसल्याचे शिरीष यांनी सांगितले. त्यावर एकाने आपल्याला सहा हजारांना गंडविल्याचे गुरुजींच्या लक्षात आले. बॅंकेचा हप्ता भरावयास गेलेले गुरुजी हात हलवीत कोल्हारला परतले.
त्या लबाडाच्या हाती पैसे देण्यापूर्वीच गुरुजींनी शिरीष खर्डे यांच्याकडे चौकशी केली असती, तर कदाचित डोक्याला हात लावण्याची वेळ आली नसती, असे पश्चातसल्ले मात्र गुरुजींना मिळू लागले आहेत. (सकाळ)
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा