मंगळवार, २२ डिसेंबर, २००९

नगरी वाहतुकीची "शिस्त'!

वाहनाला नोंदणी क्रमांक नसला, तरी चालेल. त्यावर नेत्याचे नाव किंवा एखादी घोषणा लिहिली, की भागते. चौकातील सिग्नल आपल्यासाठी नव्हे, तर समोरून येणाऱ्यांसाठी असतात. दुचाकीला वेगाची मर्यादा नसते. आपले वाहन कोठेही उभे केले, तरी चालते. एकेरी मार्ग, प्रवेश बंद, नो पार्किंग असले काही नियम नसतातच. दुचाकीला कंपनीचे हॉर्न काढून टाकून त्या जागी कर्कश हॉर्न बसविणे आवश्‍यकच असते, असाच समज जणू नगरकारांचा झाला असावा. शहरातील वाहतुकीची स्थिती पाहिली असता हे जाणवते. येथील वाहनचालकांना तर सोडाच; पोलिसांनाही वाहतुकीचे खरे निमय माहिती आहेत की नाही, अशी शंका येते.

शहरातील रस्ते अरुंद आहेत, लोकसंख्या वाढली आहे, सार्वजनिक वाहतुकीची साधने नसल्याने खासगी वाहने वाढत आहेत. त्यामुळे शहरातील वाहतुकीचा प्रश्‍न बिकट बनला आहे. या गोष्टी खऱ्या असल्या, तरी बेशिस्त वाहनचालक हेही यामागील महत्त्वाचे कारण आहे. मात्र, त्याकडे दुर्लक्ष केले जात आहे. पोलिस व परिवहन यंत्रणा शिस्त लावण्यासाठी प्रयत्न करीत नाही आणि त्यांनी प्रयत्न केलेच, तर लोकप्रतिनिधी वाहनचालकांची बाजू घेऊन ते हाणून पाडतात. त्यामुळे पोलिसांच्या उदासीनतेत आणि वाहनचालकांच्या बेशिस्तीत आणखीच भर पडते.

मुख्य म्हणजे, शिस्त लावणे म्हणजे केवळ दंड करणे नव्हे! प्रथम वाहनचालकांचे प्रबोधन केले पाहिजे, वाहतुकीसाठी आवश्‍यक त्या पायाभूत सुविधा निर्माण केल्या पाहिजेत. या नियमांची अंमलबजावणी करण्यासाठी आधी पोलिसांनी प्रामाणिक प्रयत्न केले पाहिजेत. नेत्यांनी हस्तक्षेप करणे थांबविले पाहिजे, तेव्हाच वाहनचालकांना शिस्तीचे महत्त्व कळेल. पण, नगरमध्ये अशी स्थिती नाही. येथे यंत्रणेलाही प्रमाणिक प्रयत्न नको आहेत. त्यांचेही लक्ष हितसंबंधांवरच असते. नगरच्या नेत्यांना तर बेकायदेशीर गोष्टींना पाठीशी घालण्याचेच समाधान मिळते. पोलिसांनी पकडलेल्या कार्यकर्त्याची सुटका केली म्हणजे मोठे काम केले, असाच त्यांचा समज असतो. जनताही अशाच नेत्याला मानते, हेही विशेष. कारण, नियम पाळणे हा बऱ्याच लोकांना अपमान वाटतो. त्यामुळेच हे सर्व प्रश्‍न निर्माण झाले आहेत.

या गोष्टीवर नियंत्रण ठेवण्यासाठी मोटार वाहन कायदा असला, तरी तेथेही खूप पळवाटा आहेत. वाहन चालविण्यासाठी आवश्‍यक असलेला परवानाच बहुतांश लोकांकडे नसतो. असला तरी त्यांनी वाहन चालविण्याची चाचणी दिलेली नसते. पैसे मोजले, की घरपोच परवाने देणारी यंत्रणाही येथे कार्यरत आहे. त्यामुळे वाहन घेतले, परवाना मिळाला, की वाहनधारक रस्त्यावर सुसाट सुटतात. वाहतुकीच्या नियमांची त्यांना माहितीही होत नाही आणि असली, तरी त्याचे पालन करण्याची वृत्ती नाही. वाहतुकीच्या नियमांसंबंधी प्रबोधन करण्यासाठी यंत्रणेतर्फे विशेष प्रयत्न केले जात नाहीत. मोठ्यांचे सोडा; विद्यार्थ्यांना तरी याचे धडे दिले पाहिजेत. त्यासाठी वाहतूक सुरक्षा सप्ताहासारखे उपक्रम असले, तरी ते वरिष्ठांना हारतुरे अन्‌ सत्कारामध्ये उरकले जातात. त्यामुळे लोकांचे प्रबोधन कसे होणार? नियम मोडल्यास काय धोका होऊ शकतो, हे त्यांना कसे कळणार? अल्पवयीन मुलांच्या हाती वाहने देणारे पालक, आपल्या मुलासमोर वाहतुकीचे नियम मोडून त्यांच्यावर तसेच संस्कार करणारे पालक जर येथे असतील, तर पुढील पिढी तरी वाहतुकीच्या नियमांबद्दल जागृत कशी होईल. नगरी वाहतुकीची हीच "शिस्त' पुढील पिढीतही राहणार काय, हा खरा प्रश्‍न आहे.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत: