शनिवार, ५ डिसेंबर, २००९

लग्नाच्या वरातींना शिस्त कधी लागणार?

लग्नाच्या वरातींमुळे किंवा त्यासाठी आलेल्या वाहनांमुळे वाहतुकीची कोंडी होऊन इतरांना त्रास होण्याच्या घटना नेहमीच्याच झाल्या आहेत. त्याचा त्रास झाल्यावर सामान्य लोक तेवढ्यापुरती ओरड करतात; मात्र यातून ना सरकारी यंत्रणा बोध घेत आहे, ना लग्नसमारंभ करणारे आणि मंगल कार्यालयाचे व्यवस्थापनही. या सर्वांच्या सोयीस्कर दुर्लक्षामुळे दर वेळी लग्नसराई आली, की लोकांना त्रास होतोच आहे.

या प्रश्‍नाला कोणी एक यंत्रणा जबाबदार नाही. सर्वांच्याच दुर्लक्षाचे आणि नियमभंग करण्याच्या वृत्तीचे हे "फलित' आहे. मुळात आपल्याकडील बहुतांश मंगलकार्यालये ही महामार्गावर किंवा बाजारपेठेत आहेत. त्यांच्याजवळ वाहनतळासाठी पुरेशी सोय नाही. वाहतुकीची कोंडी झाल्यास त्यातून मार्ग काढण्यासाठी स्वतःची यंत्रणा नाही. शिवाय, तेथे येणारे लोक नियम पाळतातच असे नाही. एरवी नगरमधील लोकांना वाहतुकीची शिस्त नकोच असते. लोकांना अशी शिस्त लावण्यापेक्षा पोलिसांना इतर कामांतच जास्त रस असतो. अशा सगळ्या बेशिस्तीच्या मामल्यातच लग्नसमारंभ पार पडतात. लग्नाच्या वराती काढण्यासाठी पोलिसांचा परवाना घ्यावा लागतो. रस्त्याने वाजतगाजत मिरवणूक काढण्यासाठी तर तो आवश्‍यकच असतो; मात्र कित्येक लोकांना याची माहितीही नसते. असली तरी परवाने घेतले जात नाहीत. त्यामुळे वरातीच्या नावाखाली रस्त्यावर कसाही गोंधळ घालण्यास वऱ्हाडी मंडळी मोकळी राहतात.

अलीकडे तर लग्नाच्या मिरवणुकीत मोठमोठ्या सीडी प्लेअरच्या गाड्या दिसू लागल्या आहेत. रस्त्यावरील वाहतुकीच्या कोंडीचा विचार न करता ही मिरवणूक काढली जाते. जवळपास पोलिस असले, तरी ते त्याकडे लक्ष देत नाहीत. जणू लग्नाची वरात असली, म्हणजे त्यांना सगळे माफ आहे, असाच समज झालेला दिसतो. भररस्त्याने नाचणे, फटाके आणि शोभेच्या दारूची आतषबाजी करणे, एवढचे नव्हे, तर हत्ती, घोडे, उंट अशा प्राण्यांनाही मिरवणुकीत आणणे, असे प्रकार आता होऊ लागले आहेत. शाही विवाह किंवा श्रीमंतीचा थाट या नावाखाली हे केले जाते. त्याचा त्रास इतर लोकांना होतो, याकडे कोणीही लक्ष द्यायलाच तयार नाही. लग्नसराईत नगर-पुणे व नगर-मनमाडसारखे महामार्ग ठप्प होतात, याला जबाबदार कोण? मंगल कार्यालय चालक पैसे कमावतात. वरातीतील मंडळी नाचून व मस्ती करून मजा करतात; पण सामान्यांना त्याचा त्
रास भोगावा लागतो, याची कोणाला ना खंत आहे, ना खेद.

सर्वसामान्यांच्या मागण्यांसाठी कोणी रास्ता रोको आंदोलन केले, तर पोलिस लगेच गुन्हे दाखल करून मोकळे होतात, मग रस्ता अडवून वाहतुकीची कोंडी करणाऱ्या या वरातींना मात्र मोकळे सोडतात. जमावबंदीच्या आदेशातून या वरातींना वगळण्यात आलेले असले, तरी याचा अर्थ त्यांना रस्त्यावरील वाहतूक अडविण्याचा परवाना दिला आहे, असा तर होत नाही ना? त्यांना असलेल्या परवान्यांच्या अटींचे पालन होते किंवा नाही, हे पोलिसांनी पाहायला नको का? तसाच नियम मंगल कार्यालयांना का लावला जात नाही? विवाह समारंभासाठी भरमसाट भाडे वसूल करणाऱ्या या मंगल कार्यालयांनाही परवाने आणि अटी आहेत. त्यांनी वाहनतळाची सोय केली पाहिजे, ही त्यातील प्रमुख अट आहे. तिचे पालन किती ठिकाणी झाले आहे? येणाऱ्या वाहनांमुळे कोंडी होऊ नये, याची दक्षता घेतली जाते आहे का? तशी सूचना मंगल कार्यालय व्यवस्थापनाने विवाह समारंभ आयोजकांना दिली आहे का, याचा कोणीच विचार करीत नाही. त्यामुळे वाहतुकीची कोंडी होण्याचा त्रास नेहमीचाच झाला आहे. जर प्रशासन स्वतःहोऊन यात पुढाकार घेणार नसेल, तर कोंडी झाल्यावरच ओरड करणाऱ्या लोकांनी आणि इतर सघंटनांनी जनमताचा रेटा का तयार करू नये?

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत: