रविवार, १२ जुलै, २००९

सुपारी मोडणाऱ्याचीच दिली सुपारी

शिर्डीतील एका नेत्याच्या खुनासाठी तेथील एक व्यावसायिक आणि एका गुन्ह्यातील आरोपीने पाच लाखांची सुपारी दिली; पण सुपारी घेणारा डळमळला. त्याच्याकडून काम झाले नाही. मग त्या व्यावसायिकाने सुपारी घेणाऱ्यांच्याच खुनाची सुपारी दुसऱ्याला दिली. त्याने मात्र आपले काम चोख बजावले आणि टोलनाक्‍यावर संधी मिळताच त्याचा गेम केला; पण यामुळे आता शिर्डीत मोठी खळबळ उडाली आहे.

नगर-औरंगाबाद रस्त्यावर जेऊर (ता. नगर) येथील पथकर वसुलीनाक्‍यावर कुरबूर झाली. ज्याच्याशी कुरबूर झाली, तो एका गुन्हेगारी टोळीच्या म्होरक्‍याचा भाऊ होता. त्यामुळे त्याने आपल्या भावाला याची माहिती दिली. भावाने लगेच आपल्यासाठी काम करणाऱ्या एका "शार्प शूटर'ला तेथे जाण्यास सांगितले. तोपर्यंत आता येथे काही तरी विचित्र घडणार, याची कल्पना आल्याने पथकर नाक्‍यावरील लोकांनी पोलिसांशी संपर्क साधला. काही वेळातच नगरचे पोलिस तेथे पोचले. नेवासे तालुक्‍यातून शार्प शूटर पिंट्या ऊर्फ अनिल लाजरस शिंदे हाही तेथे आला होता. पोलिसांनी मध्यस्थी केल्याने पथकर नाक्‍यावरील प्रकरण मिटले. त्यामुळे पिंट्या पुन्हा नेवाशाकडे जायला निघाला. नाक्‍यापासून काही अंतरावरच ओळखीचे लोक दिसल्याने तो थांबला. तो त्यांच्याशी बोलत असतानाच पाठीमागून दुचाकीवरून दोघे आले. त्यांनी काही कळायच्या आतच पिंट्यावर पाठीमागून गोळ्या घातल्या. तीन गोळ्या लागल्यावर पिंट्या जागीच कोसळला. गोळीबाराचा आवाज ऐकून नाक्‍यावरच थांबलेले नगरचे पोलिस तिकडे धावले. गोळीबार करणारा दीपक ढाकणे (रा. नगर) पोलिसांच्या तावडीत सापडला. दुसरा मात्र पळून गेला. जो ठार झाला तोही गुन्हेगार प्रवृत्तीचा, ज्याने गोळ्या घातल्या तोही तसाच. टोळी युद्धाचा हा प्रकार असावा, असेच सुरवातीला सर्वांना वाटले.

पोलिसांनी केलेल्या चौकशीत मात्र, वेगळीच माहिती पुुढे आली. हा खूनही सुपारी देऊन केला गेला. तोही एक सुपारी "फेल' केल्याने दुसऱ्याला सुपारी देऊन केलेली ही "गेम' होती. असे नंतर उघड झाले. याचा संबंध श्रद्धा व सबुरीचा संदेश देणाऱ्या साईबाबांच्या शिर्डीशी आला. त्यामुळे तेथे मोठी खळबळ उडाली आणि एक दिवस लोकांनी बंद पाळून आंदोलनही केले.
नगर जिल्ह्यात दोन वर्षांपूर्वी एक "सेक्‍स स्कॅंडल' गाजले होते. अल्पवयीन मुलींना वाम मार्गाला लावल्याचे हे प्रकरण. यामध्ये अनेक प्रतिष्ठित व्यक्तीही अडकल्या. त्यांच्याविरुद्धचा खटला सध्या सुरू आहे. त्यातच शिर्डी परिसरातील एक आरोपी आहे. त्याने शिर्डीचे माजी नगराध्यक्ष कैलास कोते यांचा खून करण्यासाठी पिंट्याला पाच लाख रुपयांची सुपारी दिली होती. मात्र, पिंट्याने पैसे घेऊनही ते काम केले नाही. त्यामुळे पैसे तर गेले, उलट आपले नाव उघड होते की काय, या भीतीमुळे त्या व्यावसायिकाने मग पिंट्याचाच "गेम' करण्याचे ठरविले. त्यासाठी त्याने नगरच्या दीपक ढाकणे याला सुपारी दिली. त्याचे एक लाख रुपयेही आगाऊ दिले. त्यातून ढाकणे याने इंदूरहून शस्त्र आणले. सर्व तयारी झाल्यावर ढाकणे संधीची वाट पाहात होता. त्या दिवशी योगायोगाने ढाकणे जेऊरच्या टोलनाक्‍यावरून जात होता. तेवढ्यात त्याला तेथे पिंट्या दिसला आणि त्याने गोळीबार केला, अशी हकिगत पुढे आली आहे. पोलिस त्याची खातरजमा करीत आहेत.

हिंदी चित्रपटात किंवा मुंबईत घडणाऱ्या अशा घटना नगर जिल्ह्यात तशा नवीनच. याच्याशी संबंधित आरोपी सराईत असले तरी पूर्वी ती साधी माणसे होती. ठार झालेला पिंट्या पूर्वी नगर-मनमाड रस्त्यावरील एका ढाब्यावर वेटर म्हणून काम करीत होता. तेथे झालेल्या एका खून प्रकरणात तो अडकला. पुढे त्याची निर्दोष सुटका झाली असली तरी बराच काळ त्याचा तुरुंगात राहावे लागले होते. तेथे त्याचा गुन्हेगारी प्रवृत्तीच्या लोकांशी संबंध आले. ते त्याने सुटल्यानंतर टिकविले आणि त्याच मार्गाने त्याची वाटचाल सुरू झाली. त्याचा शेवटीही त्यातच झाला. त्याच्या खुनाची सुपारी घेणारा ढाकणे हा तर हमाली काम करणारा; पण तोही अशा लोकांचा सहवास येऊन गुन्हेगार बनलेला. त्याच्याविरुद्धही अनेक गुन्हे आहेत. काही काळ त्या दोघांनी एकत्र कामही केले आहे; पण "धंद्यापुढे दोस्ती नाही' हे गुन्हेगारी जगताचे सूत्र पाळत त्यानेच पिंट्यांवर गोळ्या चालविल्या. आता तो पुन्हा तुरुंगात गेला.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत: