रविवार, ५ जुलै, २००९

ग्रामसुरक्षा दलांचे पुनरुज्जीवन करणार


जिल्ह्याची वाढती लोकसंख्या, शहरी आणि ग्रामीण भागात विस्तारणारी वसाहत, याबरोबरच गुन्हेगारीचे प्रमाणही वाढत आहे. त्या तुलनेत किती तरी कमी असलेले पोलिसांचे मनुष्यबळ आणि यंत्रणा यांचा विचार करता, यावर नियंत्रण ठेवणे एकट्या पोलिसांना शक्‍य होत नाही. त्यामुळे या कामात लोकांचाही सहभाग आवश्‍यक आहे. आपल्या मालमत्तेचे संरक्षण करणे, ही आपलीही जबाबदारी आहेच. याच भावनेतून ग्रामसुरक्षा दलासारखे उपक्रम सुरू झाले. गेल्या काही काळात नगर जिल्ह्यात हे उपक्रम मागे पडले असले, तरी आता त्यांचे पुनरुज्जीवन करण्यात येत आहे. शिवाय प्रत्येक पोलिस ठाण्यात गुन्हे शाखेच्या मदतीने दरोडा प्रतिबंधक व शोध पथके स्थापन करण्यात आली आहेत. याशिवाय गोपनीय पद्धतीने इतरही उपाययोजना हाती घेण्यात आल्या आहेत.
नगर जिल्हा विस्ताराने राज्यात सर्वांत मोठा आहे. लोकसंख्या आणि लोकवस्तीही वाढत आहे. ग्रामीण भागात जशा वाड्या-वस्त्या वाढत आहेत, तशी शहरी भागातही उपनगरे तयार होत आहेत. गावठाणापासून दूर असलेल्या या वस्त्यांच्या सुरक्षेचा प्रश्‍न त्यातून निर्माण झाला आहे. आधीच लोकसंख्येच्या तुलनेत अपुरी असलेली पोलिसांची संख्या, त्यात ही विस्तारलेली वस्ती. दुसऱ्या बाजूला पोलिसांची वाढती कामे. यामुळे सुरक्षा पुरवायची कशी, हा मोठा प्रश्‍न निर्माण झाला आहे. अर्थात यामुळे पोलिसांनी आपली जबाबदारी टाळून मुळीच चालणार नाही, याची आम्हाला जाणीव आहे. त्यामुळेच लोकांना मदतीला घेऊन मालमत्तेविरुद्धचे गुन्हे रोखण्याचे विविध उपाय योजण्यात येत आहेत. अर्थात या उपक्रमांमध्ये सातत्य ठेवण्यातही इतर कारणांनी अडथळे येतात. गुन्हे वाढले, की लोकांची पहिली मागणी होते, ती रात्रीची पोलिस गस्त वाढविण्याची. तशी गस्त सुरू असतेच; पण त्यालाही मर्यादा पडतात. एवढे मोठे क्षेत्रफळ असलेल्या जिल्ह्यात गस्त तरी किती घालणार? शहरी भागात एक वेळ ठीक आहे. रात्रीतून एक-दोन वेळा तरी हद्दीतील प्रत्येक भागातून पोलिस गाडी जाऊ शकेल; पण ग्रामीण भागात तीन-चार गावांसाठी एक पोलिस, असे प्रमाण असल्याने, तेथे कशी गस्त घालणार?
पोलिसांच्या अशा अनेक मर्यादा असल्या, तरी त्यातून मार्ग काढून मालमत्तेविरुद्धचे गुन्हे रोखण्यास आम्ही प्राधान्य देत आहोत. जुनी ग्रामसुरक्षा दले पुन्हा कार्यरत करण्यात येत आहेत. त्यासाठी सर्व पोलिस ठाण्यांना सूचना देण्यात आल्या आहेत. त्या भागातील पोलिस या दलांच्या मदतीने सुरक्षा व्यवस्थेचे काम पाहतील. ग्रामस्थांनी, विशेषतः तरुणांनी यासाठी पुढाकार घेऊन आपलीही सामाजिक बांधिलकी जपावी, असे पोलिसांतर्फे आवाहन. मालमत्तेच्या संरक्षणासाठी लोकांनीही काळजी घ्यावी. उपनगरे आणि वाड्या-वस्त्यांवर वास्तव्य करताना पक्की घरे बांधण्यावर भर द्यावा. मौल्यवान वस्तू बॅंकेच्या लॉकरमध्ये ठेवता येऊ शकतात. मंगळसूत्र चोऱ्या टाळण्यासाठी महिलांनी दक्षता घ्यावी. आपल्या भागातील संशयास्पद हालचालींची माहिती पोलिसांना तातडीने द्यावी. पोलिस आणि जनता या दोघांनी एकत्र मिळून काम केल्यास उपनगरांची सुरक्षा सोपी होईल.

-विजय चव्हाण
पोलिस अधीक्षक, नगर

1 टिप्पणी:

Unknown म्हणाले...

सर नमस्कार सर उल्हासनगर मध्ये एक Fir ची दोन पोलीस रिपोर्ट जावक नंबर आणि दोन कोर्ट नंबर मध्ये काही इतर आरोपी फरार आहेत . उल्हासनगर ०१ दिनांक २१/०१/२०१३ पोलीस स्टेशन Fir नंबर i 23/2013 आणि दिनांक २२/०१/२०१३ रोजीची पोलीस रिपोर्ट जावक नंबर ४७१ आणि ४९८ मधील फरार आरोपी हे अटक आरोपींना माहिती असून आजतागायत न्यायालयात हजर करण्यात आले नाही म्हणजे किती निष्काळजीपणा उल्हासनगर ०३ चोपडा कोर्ट २ रा वर्ग केस नंबर आर.सी.सी. १०००४७७ सामान्य माणसाला वाली कोणी आहे का माझा फोन नंबर ८८०६३११७०५