रविवार, २४ मे, २००९

तांत्रिकाने भूलविले, घर उद्‌ध्वस्त झाले


पती-पत्नी, तीन गोंडस मुली, एक चुणचुणीत मुलगा. अल्लाहने दिलेले सर्व काही असे भरलेले सुखवस्तू घर! एक तांत्रिक येतो, आपल्या मायाजालात पती-पत्नी अशा दोघांना भूलवतो नि त्यातून हे भरलेले घर उद्‌ध्वस्त होते. एखाद्या रहस्यमय चित्रपटातील कथा वाटावी, अशी भीषण घटना सोलापुरात घडली.
एका तांत्रिकाने शेतात गाडलेले गुप्तधन मिळवून देण्याची थाप मारून घरातील महिलेचा बळी घेतला. सुदैवाने पतीचा बळी घेण्याचा प्रयत्न अयशस्वी झाला. बचावलेल्या पतीने दिलेल्या जबानीतून मांत्रिकाच्या क्रूर कुकर्माचा किस्सा पुढे येतो. माझी पत्नी गेली. पण, अल्लाहने मला वाचविले. तसे झाले नसते तर त्या तांत्रिकाचे पातक जगापुढे कधीच आले नसते, असे मुश्‍ताक सय्यद साश्रू नयनाने सांगतात. मीही मेलो असतो तर तांत्रिकाने आमच्या नावाने लिहून ठेवलेली आत्महत्येची चिठ्ठी मिळाली असती आणि लोकांनी त्यावर विश्‍वास ठेवला असता. त्याच्यामुळे आणखी किती कुटुंबे उद्‌ध्वस्त झाली असती, कोणास ठाऊक?, असे मुश्‍ताक बोलतात.
मुश्‍ताक सय्यद-इनामदार यांना चार भाऊ. चौघांचा उत्तम चालणारा एकच पारंपरिक व्यवसाय कोंबडीचे मांस व अंडी विकण्याचा. मुश्‍ताक जेमतेम दुसरी शिकलेले. त्यांची पत्नी शाहीन आठवी शिकलेली. चार-एक वर्षांपूर्वी मुश्‍ताक यांचा परिचय स्वतःला मौलाना म्हणवून घेणाऱ्या अब्बास महंमदहनीफ बागवान या तांत्रिकाशी झाला. मुश्‍ताक यांची जुनी मोटार अब्बास तांत्रिकाने विकत घेतली. त्यानंतरच्या संबंधातून तांत्रिक अब्बास मुश्‍ताक यांना त्यांच्या शेतात सोने आहे, असे सांगतो. ते तुमच्याच हक्काचे आहे. ते मी तुम्हाला मिळवून देतो. त्याची विद्या माझ्यापाशी आहे. त्यासाठी काही कर्मकांड करावे लागेल, असे सांगून भूलविले.
"तुमच्या शेतावर गेलो होतो. तेथील थोडी माती आणली आणि त्याचे सोन्याच्या बिस्किटात रूपांतर झाले असून ते पाहण्यासाठी या, असे दूरभाषवरून तांत्रिक अब्बासने मुश्‍ताक यांना सांगितले. महापालिकेजवळ मुश्‍ताक यांना सोन्याचे बिस्कीट दाखविले. अशा प्रकारे अनेकांना सोने मिळवून दिल्याचा त्याचा दावा प्रत्यक्ष बिस्कीट पाहत असल्याने मुश्‍ताक यांना खरा वाटला आणि ते भूलले! या धनाची प्राप्ती करण्यासाठी कुणाकडून काही देणे-घेणे असल्याची माहिती लिहून घ्यावी लागेल, असे अब्बासने सांगितले. त्याप्रमाणे ही माहिती एका कागदावर लिहून घेतली. काही तांत्रिक विद्या पूर्ण करून हे सोने मिळवता येईल. त्यासाठी शेतावर जावे लागेल, असे अब्बासने मुश्‍ताक यांना सांगितले. यावेळी तांत्रिक अब्बासने आपल्या बहिणीला सोबत आणले होते. शेतावर काही कर्मकांड करून तेथे स्टीलचा डबा घेऊन सांगितले, की यात शेतातील सोने जमा झाले आहे. आणखी काही विधी असून ते घरी करावयाचे आहेत. कोणीही पाहू नये म्हणून रात्री उशिरा मी घरी येईन. माझा भाचा मला रिक्षातून थेट दारासमोर आणून सोडेल. घरात लहान मुले नको. त्यांच्यावर काळ्याविद्येचा प्रतिकूल परिणाम होईल. म्हणून त्यांना अन्य कुठेतरी पाठवा, असे अब्बासने सांगितले. त्याप्रमाणे मुश्‍ताक यांनी आपल्या चारही मुलांना भावाकडे पाठविले. घरी पत्नी शाहीन आणि मुश्‍ताक राहिले. मंगळवारी रात्री साडेबाराच्या सुमारास अब्बास आला. कपाटातील डबा काढून काही विधी करणार असल्याचे सांगितले. त्याप्रमाणे सफरचंद, केळी, डाळिंब आदी फळांसह, लिंबू, कारले ठेवले. काही मंत्र म्हटल्यासारखे करून हे पुन्हा परत ठेवायला सांगितले. उद्या रात्री पुन्हा येईन, असे सांगून तो गेला. एक सात हात लांब दोरीची व्यवस्था करण्यासाठी सांगितले. दुसऱ्या रात्री दीडच्या सुमारास तांत्रिक अब्बास पुन्हा रिक्षातून
आला. आणखी काही विधी करायचे आहेत असे सांगून पुन्हा डबा, फळे तशीच सजविली. घरात दोन ठिकाणी ती दोरी कापून बांधली. तीन जा-ए-नमाज (नमाज पढण्यासाठी वापरण्यात येणारी लहानशी चादर) तीन ठिकाणी ठेवायला सांगितल्या. तुमच्याकडून जे काही देणे-घेण्याविषयीची माहिती लिहून घेतली आहे; त्या कागदावर तुम्हा दोघांची सही हवी आहे, असे सांगून दोघांच्या सह्या घेतल्या. शाहीन यांचे आठवीपर्यंत शिक्षण झाले आहे. त्यांनी कागद पाहण्यासाठी विचारले असता, ते मंतरलेले असल्याने तुम्हाला पाहता येणार नाही, असे सांगून त्यांना "कर्जबाजारीपणामुळे आत्महत्या करत आहोत' या आशयाच्या चिठ्ठीवर दोघांच्या सह्या घेतल्या आणि तो कागद विधी करण्यासाठी ठेवला. कारल्यावर मंत्र फुंकल्यासारखे केले आणि सांगितले की कारल्याच्या रसासोबत एक औषध घ्यावे लागणार आहे. काळजीचे कारण नाही. पण, औषध कडू लागेल. ते सहन करा. मग तुमचे भले होईल, असे तांत्रिक अब्बासने सांगितले. रात्री कारल्याचे रस काढण्यासाठी मिक्‍सरचा वापर केल्यास लोकांना आवाज जाईल. त्यापेक्षा बत्याचा वापर करा असे सांगून रस काढावयास सांगितले. दोघांवर वेगवेगळ्या ठिकाणी विधी करावे लागणार असल्याने घराच्या आतल्या खोलीत शाहीन यांना जाण्यास सांगितले. त्यानंतर घरातील सर्व दिवे मालवावयास सांगितले. सगळीकडे अंधार झाल्यानंतर त्याने आपल्याकडील विषारी द्रव मिसळून मुश्‍ताक यांना कारल्याचा रस दिला. रस पिताच मुश्‍ताक यांना गुंगी आली आणि ते बेशुद्ध पडले. डोळे उघडले ते थेट दवाखान्यातच. त्यामुळे आपल्या पत्नी सोबत काय प्रसंग गुदरला याची माहिती मुश्‍ताक यांना नाही. 22 एप्रिल रोजी हा प्रसंग घडला.
23 एप्रिल रोजी पहाटे मुश्‍ताक यांच्या नातेवाइकांना दोरीला लटकलेल्या स्थितीत शाहीनचा मृतदेह दिसला. संपूर्ण इनामदार कुटुंबीयांवर दुःखाची दाट सावली पसरली. मुश्‍ताक यांना उपचारासाठी इस्पितळात नेण्यात आले. तेथे ते जवळपास वीस दिवस बेशुद्ध अवस्थेत होते. शुद्धीवर आल्यानंतर तांत्रिकाची हकिगत सगळ्यांना समजली.
(esakal)

1 टिप्पणी:

Asshwin Shende म्हणाले...

दुखःद कथा. जीवनाची शोकान्तिका. पैसा दिसला की माणुस आंधळा होतो ह्याचे जिवंत उदाहरन म्हणजे हि कथा. आजकालच्या जगात योगी पुरुश नसतात हे अशिक्षितांना कुणीतरी सांगायाला हवं.