सोमवार, ११ मे, २००९

लग्नाच्या बेडीसाठी ....!

त्याचं तिच्यावर प्रेम होतं. एक दिवशी त्यानं थेट मागणीच घातली; पण तिचा विचार झाला नव्हता. त्यामुळे चिडलेल्या त्याने सरळ तिच्या तोंडावर ऍसिड फेकले. परिणामी त्याच्या हातात पोलिसांची बेडी पडली. वर्षभरानंतर दोन्ही कुटुंबांचा विचार बदलला. त्या दोघांचे लग्न लावून द्यायचे ठरले. तशी विनंती न्यायालयाला करण्यात आली. न्यायालयानेही सामाजिक दृष्टिकोन ठेवत कायद्याचा फास सैल केला.......

मनोहर रामचंद्र बरसिले याचे त्याच गावातील (जवळा, ता. पारनेर) एका मुलीवर प्रेम होते. 17 एप्रिल 2008 रोजी तो त्या मुलीच्या घरी गेला. त्याने तिच्याशी लग्न करण्याची इच्छा व्यक्त केली; पण तिने आपला विचार झाला नसल्याचे आणि आई-वडिलांना विचारल्याशिवाय निर्णय घेण्यास तिने असमर्थता व्यक्त केली. हा तिचा नकारच समजून मनोहरला संताप आला. ती जर आपली होणार नसेल, तर इतर कोणाचीही होऊ देणार नाही, असा विचारही त्याच्या डोक्‍यात आला. तशी त्याने योजना आखली. 20 एप्रिलच्या मध्यरात्री घराबाहेर झोपलेल्या त्या मुलीच्या तोंडावर ऍसिड फेकले आणि पळून गेला. जखमी अवस्थेत मुलीला रुग्णालयात दाखल करण्यात आले. काही दिवसांनी ती बरी झाली, पण चेहरा कायमचा विद्रूप झाला.
दुसऱ्या दिवशी या प्रकरणी पारनेर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल झाला. घटना घडल्यानंतर मनोहरला पश्‍चात्ताप झाला. त्यामुळे त्याने कुरुंद गावात विष घेऊन आत्महत्या करण्याचा प्रयत्न केला. त्यालाही रुग्णालयात दाखल करण्यात आले. तीन-चार दिवसांत तो बरा झाल्यावर पोलिसांनी त्याला अटक केली. त्याच्याविरुद्ध खटला दाखल करण्यात आला. तेव्हापासून तो तुरुंगातच आहे. नगरचे जिल्हा न्यायाधीश रमेश कदम यांच्यासमोर त्याची सुनावणी सुरू झाली. डिसेंबर 2008 पासून साक्षी नोंदविण्यास सुरवात झाली. फिर्यादी मुलीनेही न डगमगता साक्ष दिली. तोपर्यंत दोन्ही कुटुंबांचे आणि गावकऱ्यांचेही मत बदलले होते. चेहरा विद्रूप झालेल्या या मुलीशी कोण लग्न करणार? असाही प्रश्‍न होताच. या कृत्याबद्दल मनोहरला शिक्षा व्हावी, हा विचार समर्थनीय असला तरी त्याला शिक्षा होऊन या मुलीच्या आयुष्यात काही फरक पडणार नव्हता. ही गोष्ट दोन्ही बाजूंच्या लोकांना पटली होती. त्यामुळे खटला चालवून शिक्षा देण्यापेक्षा दोघांचे लग्न लावून देण्याचा विचार पुढे आला. दोन्ही कुटुंबांना तो मान्य झाला. सरकारी वकील ऍड. सतीश पाटील यांना याबद्दल माहिती देण्यात आली. त्यांनीही सहकार्याची भूमिका घेऊन न्यायालयास विनंती केली; पण आधी लग्न करावे आणि नंतरच खटल्याचा काय तो निर्णय घ्यावा, असे ठरले. त्यानुसार लग्नासाठी म्हणून मनोहरचा जामीन अर्ज करण्यात आला. न्यायालयाने हा अर्ज मंजूर केला. त्याला पंधरा दिवसांसाठी जामिनावर सोडण्यात आले आहे. 16 मे रोजी त्याने पुन्हा न्यायालयात हजर व्हायचे आहे.
मधल्या काळात मुलीवर पुण्यातील रुग्णालयात उपचार करण्यात आले आहे. ऍसिड फेकल्याने खराब झालेल्या तिच्या चेहऱ्यावर प्लास्टिक सर्जरी करण्यात आली आहे. त्याचा खर्चही मनोहरच्या कुटुंबीयांनीच केला. आता पंधरा दिवसांत चांगला मुहूर्त पाहून या दोघांचा विवाह लावण्यात येणार आहे. त्यासाठी दोन्ही घरी धावपळ सुरू झाली आहे. मनोहरची आई म्हणते "मला मुलगी नाही, सुनेलाच मी मुलीसारखी वागणूक देईल.'' मुलीची आई म्हणते, "झाले गेले आम्ही विसरून गेलो आहेत, मुलीचे भावी आयुष्य चांगले जावे हीच अपेक्षा आहे.' सरकारी वकील म्हणतात, "कायद्याच्या चौकटीत राहूनच या दोघांनाही न्याय देण्याचा आमचा प्रयत्न आहे. एखादे कुटुंब उभा राहत असेल तर त्याला मदत केलीच पाहिजे, हाच खरा न्याय यंत्रणेचा हेतू आहे.'
आधी पोलिसांच्या बेडीत अडकलेला मनोहर आता लग्नाच्या बेडीत अडकणार आहे. त्यासाठीच कायद्याचा फासही सैल करण्यात आला असला, तरी मूळ खटल्याचा निकाल मात्र अद्याप लागायचा आहे. मे महिन्याच्या अखेरीस मूळ खटल्याचा निकाल दिला जाणार आहे.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत: