बुधवार, ६ मे, २००९

मंगळसूत्रांची चोरी ः समस्या व उपाय


अलीकडील काळात वर्तमानपत्रांमध्ये अनेक गावांमध्ये मंगळसूत्र चोरीच्या बातम्या नेहमी वाचण्यात येतात. महिलांच्या दृष्टीने ही एक गंभीर समस्या होऊन बसली आहे. एक काळजीचा सामाजिक प्रश्‍न या नजरेने या घटनांकडे पाहिले पाहिजे. पूर्वी काठीला सोने बांधून लोक काशीयात्रेला जात होते; पण आता समाज व नैतिक अधिष्ठाने घसरत चाललेली आहेत. बदलता काळ- नवीन आव्हाने या दृष्टीने पारंपरिक मूल्ये-दृष्टिकोन यामध्ये बदल होणे आवश्‍यक आहे.
साधारणपणे पहाटे व सायंकाळी फिरावयास जाणाऱ्या महिला किंवा अन्य कामांसाठी किरकोळ खरेदीसाठी बाहेर पडणाऱ्या महिला. या वेळी रस्त्यावर वाहने किंवा माणसांची गर्दी नसते. एकाकी किंवा सुनाटीच्या रस्त्यावर मंगळसूत्र चोरीचे प्रमाण जास्त आढळते. प्रौढ व वयोवृद्ध महिला त्यांच्या गळ्यातील मंगळसूत्रे, त्यांचे जाण्या-येण्याचे रस्ते याचे बारकाईने निरीक्षण करून मंगळसूत्र चोर मोटारसायकलवरून "धूम स्टाईल'ने वेगाने येऊन गळ्यातील मंगळसूत्र खेचतात व क्षणार्धात पळून जातात. जेथे वस्ती विरळ आहे अशा भागामध्ये अशा चोऱ्यांचे प्रमाण जास्त आढळते.
काही उपाय ः जास्त ग्रॅम सोन्याचे मंगळसूत्र वापरण्याचा महिलांनी अट्टहास धरू नये. परिस्थितीनुसार पारंपरिक दृष्टिकोनात बदल करावा. सौभाग्यमणी असलेली सुंदर डिझाईनची काळी पोत वापरावी. मंगळसूत्र माळ समोर न ठेवता ब्लाऊज किंवा पदराच्या, ओढणीच्या आत ठेवावी. महिला मंडळे, भिशी मंडळे, भजनी मंडळे, बचत गट, तसेच महिलांचे इतर विविध गट यांमध्ये या समस्येवर चर्चा घडवून आणून या चोऱ्याच होऊच नयेत, म्हणून महिलांना जागृत करून विविध उपाय योजना करावी.
जास्त गर्दीची ठिकाणे उदा. गणपतीची आरास, नवरात्रोत्सव, देवदर्शन, यात्रा, प्रवास, प्रदर्शने, मिरवणुका आदी ठिकाणी खोटे मंगळसूत्र वापरणे, तसेच सावधतेने फिरणे आवश्‍यक आहे.
पोलिसांवर सध्याच विविध कामांचा, प्रश्‍नांचा खूप ताण आहे. त्यामध्ये महिलांनीच जर या समस्येबाबत खबरदारी घेतली, तर पोलिसांवरचा कामाचा ताण कमी होईल व अप्रत्यक्षपणे यामुळे पोलिसांना सहकार्य केल्याचे उदाहरण घडेल.
कुटुंबातील व्यक्तींनी कष्टाने मिळविलेल्या पैशांची बचत करून हौसेने केलेले सुंदर डिझाईनचे मंगळसूत्र चोरीस गेल्यास ती महिला व कुटुंबीय यांना जो मानसिक, आर्थिक धक्का बसतो, त्यामुळे अशी घटना घडणे फार वाईट आहे.
मंगळसूत्र हे मांगल्य, पावित्र्यदर्शक, सौभाग्य अलंकार आहे. महिलांच्या दृष्टीने त्याचे सांस्कृतिक मूल्य मोठे आहे. सध्याच्या धोकादायक परिस्थितीत आपल्या पारंपरिक दृष्टिकोनात थोडासा बदल करून नवीन आव्हान स्वीकारावे लागेल. ही गोष्ट सर्व समाज व महिलांच्या दृष्टीने फायद्याची व सद्यपरिस्थितीवर मात करण्यासाठी योग्य ठरेल, असे वाटते. तसेच महिलांमध्ये स्वसंरक्षण संस्कृती निर्माण करण्यासाठी सर्व महिला गटांनी प्रयत्न करणे आज गरजेचे आहे.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत: