रविवार, ६ जून, २०१०

तोतया पोलिस अन्‌ भोळीभाबडी जनता

आम्ही पोलिस आहोत. पुढे दंगल सुरू आहे. तुमच्याजवळील दागिने काढून ठेवा... आम्ही "सीआयडी'चे अधिकारी आहोत. तुमच्याजवळ गांजा आहे. झडती घेऊ द्या... अशी बतावणी करून लोकांना लुटण्याच्या घटना वारंवार घडत असतात. लोकांच्या बेसावधपणाचा आणि पोलिसांच्या "स्टाईल'चा वापर करून अनेक तोतया लोकांना लुबाडतात; मात्र लोकही यातून बोध घेत नाहीत.

सायंकाळच्या वेळी आजीबाई मंदिरात निघालेल्या असतात. रस्त्याने पायी जाताना पोलिसांसारखे दिसणारे; पण साध्या कपड्यातील दोघे त्यांना अडवितात. "आजी, आम्ही पोलिस आहोत. पुढे दंगल सुरू आहे. गळ्यातील दागिने काढून ठेवा. थांबा, आम्ही मदत करतो,' असे म्हणून मदतीला धावल्याच बनाव केला जातो. अचानक उद्‌भवलेला प्रसंग, दंगलीबद्दल छापून येणाऱ्या बातम्या यांमुळे त्या आजीबाईही भारावून गेलेल्या असतात. कोणी तरी मदतीला आले आहे, अन्‌ विशेष म्हणजे ते पोलिस आहेत, असे वाटून त्याही विश्‍वास ठेवतात. याचा फायदा घेत तोतया दागिने काढून घेऊन रुमालात बांधून पिशवीत ठेवण्याचा बहाणा करून दागिन्यांसह पोबारा करतात. त्यानंतर, आपण फसले गेलो आहोत, हे आजीबाईंच्या लक्षात येते. तोपर्यंत वेळ निघून गेलेली असते. तेव्हा मदतीला कोणीही येत नाही. अगदी खरे पोलिससुद्धा.
भाजी आणण्यासाठी काका बाजारात चाललेले असतात. तेवढ्यात समोरून दोघे येतात. "आम्ही सीआयडीचे अधिकारी आहोत. तुमच्याकडे गांजा असल्याचा संशय आहे. थांबा, आम्हाला झडती घेऊ द्या,' असे म्हणून ते काकांची लगेचच झडती सुरू करतात. खिसे रिकामे केले जातात. त्यातील चीजवस्तू काढून घेतल्या जातात अन्‌ काही कळायच्या आत त्या घेऊन तोतये पळूनही गेलेले असतात. तोपर्यंत भानावर आलेले काका विचार करतात, आपला गांजाशी काय संबंध? हे अधिकारी कोण? त्यांना संशय कसा आला? पण हा विचार करेपर्यंत बराच वेळ निघून गेलेला असतो अन्‌ त्या आजीबाईंप्रमाणेच हे काकाही एकाकी पडलेले असतात. कोणाला सांगायला गेले, तर लोक हसतात किंवा संशयाने तरी पाहतात. नंतर खरे पोलिससुद्धा निष्काळजीपणाबद्दल काकांनाच दोष देतात.

 आरोपींची ही गुन्हा करण्याचीच पद्धत आहे. बहुतांश वेळा असे गुन्हे करणाऱ्या बाहेरच्या टोळ्या असतात. त्यांचे नेमके वर्णन आणि ठावठिकाणा माहिती नसतो. त्यामुळे हे चोरटे अभावानेच पकडले जातात. त्यामुळे अशा घटना घडतच राहतात. घटना घडल्यावर घाबरणारे सामान्य नागरिक, शहरातील परिस्थिती, पोलिसांची कामाची "स्टाईल' यांचा पुरेपूर फायदा घेत आणि अभ्यास करून हे चोरटे डाव साधतात. त्यांनी कधी मोठ्या व्यापाऱ्याला, व्यावसायिकाला, वाहनधारकांना लुटल्याचे प्रकार घडत नाहीत. सामान्य महिला, वृद्ध यांनाच "टार्गेट' केले जाते. पोलिसांबद्दल, शहराच्या स्थितीबद्दल फारशी माहिती नसलेल्यांना, छोट्या-मोठ्या घटनांना घाबरणाऱ्या, कोणावरही चटकन विश्‍वास ठेवणाऱ्या लोकांनाच फसविले गेल्याचे आढळून येते.
यातील काही घटना पोलिस ठाण्यापर्यंत पोचतात. बऱ्याच वेळा लोक तक्रारही देत नाहीत. पोलिस ठाण्यातही गुन्हा दाखल होतो, पुढे काही तपास नाही. ज्या भागात घटना घडली, तेथे लोक एक-दोन दिवस चर्चा करतात, नंतर सर्व जण विसरून जातात. घटना टाळण्यासाठी प्रबोधन केले जात नाही. पोलिसांच्या नावाचा गैरवापर करून लोकांना लुटणाऱ्या टोळीचा छडा लावावा, असे पोलिसांनाही वाटत नाही. त्यामुळे अशा घटना घडतच राहतात.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत: