शनिवार, १२ जून, २०१०

साक्षरता वाढली; पण अंधश्रद्धा कायम


गेल्या पन्नास वर्षांत नगर जिल्ह्यातील साक्षरता 40 टक्‍क्‍यांवरून 78 टक्‍क्‍यांपर्यंत पोचली; पण लोकांवरील अंधश्रद्धेचा पगडा काही कमी झाला नाही. त्यामुळेच जिल्ह्यात आजही अनेक बुवा- महाराजांचे प्रस्थ कायम आहे. केवळ अशिक्षितच नव्हे, तर शिकलेली माणसेसुद्धा अशा बुवाबाजी आणि गंड्या-दोऱ्यांमध्ये अडकलेली दिसतात.
पुरोगामी विचारांचा, संतमहंताचा आणि समाजसुधारकांचा जिल्हा म्हणून ओळखल्या जाणाऱ्या या जिल्ह्याने अनेक क्षेत्रांत भरारी घेतलेली असली, तरी अंधश्रद्धा आणि बुवाबाजीची काळी किनार अद्याप दूर झालेली नाही. अलीकडच्या काळात याविरोधात फारसे कोणी काम करीत नसले, तरी पूर्वी मात्र संत आणि समाजसुधारकांनी लोकांच्या या प्रवृत्तीवर चांगलेच ओरखडे ओढल्याचे आढळून येते.

जिल्ह्यातील अनेक ठिकाणे केवळ अंधश्रद्धेतून निर्माण झाली आणि नावारूपालाही (!) आलेली आहेत. विशेष म्हणजे, ती येथील लोकांची आता श्रद्धास्थाने बनली आहेत. त्यांचा नामोल्लेखही भावना दुखावणारा ठरू शकतो, एवढा लोकमनावर त्यांचा पगडा निर्माण झाला आहे. नवस बोलणे आणि काम झाल्यावर तो फेडणे, हा प्रकारही रूढ झाला आहे. नवसाला पावणाऱ्या म्हणून कित्येक देवदेवता जिल्ह्यात "प्रसिद्ध' आहेत. नवस करण्याच्या आणि फेडण्याच्या पद्धतीही विचित्रच म्हणाव्यात अशा आहेत. सव्वा किलोच्या नैवेद्यापासून बोकड-बकऱ्यांच्या बळींपर्यंत आणि उपवास करण्यापासून देवाजवळच्या झाडाला गंडा-दोरा बांधण्यापर्यंतच्या प्रथा येथे आहेत. परीक्षेत पास होऊ दे, चांगले गुण मिळू दे, लग्न जमू दे, पैसा मिळू दे, अशा प्रयत्नसाध्य गोष्टींपासून मूलबाळ होऊ दे, पाऊस येऊ दे, अशा निसर्ग आणि विज्ञानाधारित गोष्टींसाठीसुद्धा नवस बोलले जातात. विशेष म्हणजे, निवडणुकीत विजयी होऊ दे, यासाठी नवस करणारे आणि त्यासाठी कोणा बाबाचा आशीर्वाद घेणारे नेतेही आपल्या जिल्ह्यात कमी नाहीत. कोणा बाबाने दिलेला गंडा-दोरा हातात कायम बांधलेले कित्येक नेते आणि उच्चपदस्थ अधिकारीसुद्धा पाहायला मिळतात. ज्यांनी अंधश्रद्धा दूर करण्यासाठी प्रयत्न करायचे, ती मंडळीच तर त्याचे अनुसरण करीत असतील, तर हा रोग कसा दूर होणार?

दुसरा प्रकार आहे बुवाबाजीचा. एकीकडे मोठमोठी रुग्णालये उभी राहत असताना दुसरीकडे जिल्ह्यात अनेक बुवा- महाराजही आपले प्रस्थ वाढवून बसले आहेत. "बुवा तेथे बाया' अशी एक म्हण आपल्याकडे रूढ आहे. याचा अर्थ, बुवाबाजीला सर्वाधिक बळी पडणाऱ्या महिला असतात. आपल्या जिल्ह्यात मात्र, महिलांबरोबर राजकीय नेते, कार्यकर्ते आणि उच्चपदस्थ अधिकारीसुद्धा बुवाबाजीत रमलेले दिसतात. कोणा बुवाचा भक्त नाही, असा नेता शोधून सापडणार नाही. घरगुती भांडणे, प्रापंचिक अडचणी, उद्योग- व्यवसाय, राजकारण, नोकरीतील बढती, पैसे कमावण्याची संधी अशा कितीतरी गोष्टींवर बुवा तोडगे सुचवितात, असा समज होऊन त्यांच्याभोवती ही गर्दी झालेली असते. कित्येक बुवांनी शहरी भागातही आपली "दुकाने' थाटली आहेत. भगवी वस्त्रे घालून बसणारेच नव्हे, तर वातानुकूलित गाड्यांतून फिरणारे आणि रात्री नको तेथे दिसणारे बुवाही जिल्ह्यात कमी नाहीत.

आजारपणावर अंगारे-धुपारे करणारे बुवाही आहेत. त्यांच्याकडेही गर्दी दिसते. आरोग्यसेवा उपलब्ध नसलेल्या ग्रामीण आणि आदिवासी भागातील लोकांच्या दृष्टीने हेच दवाखाने मानले जातात. मंत्र, अंगारा अन्‌ जोडीला झाड-पाला किंवा दुसरा काही तरी प्रसाद देणाऱ्या या बुवा- महाराज किंवा देवऋषींवरच लोकांचा जास्त विश्‍वास असतो. कित्येकदा या बुवांनी सुचविलेले अघोरी उपायसुद्धा केले जातात. त्यातून अनेकांचा जीव जात असला, तरी बाबांची महती कमी होत नाही. उलट, देवाचा कोप म्हणून त्याकडे दुर्लक्ष केले जाते. बाबांच्या सांगण्यावरून नरबळी दिल्याच्या कित्येक घटना जिल्ह्यात घडल्या आहेत. अद्यापही त्या पूर्ण बंद झालेल्या नाहीत. आमवस्येच्या रात्री उतारा टाकणारे जसे आहेत, तसे दहा लाखांच्या आलिशान गाडीत किंवा कोट्यवधींच्या भव्य बंगल्यात काळी बाहुली उलटी टांगणारे अंधश्रद्धाळूही कमी नाहीत.

अंधश्रद्धा ही कोणा एका धर्माच्या अगर जातीच्या लोकांमध्ये आहे, असे नाही. याबाबतीत जातीपातीच्या भिंती केव्हाच ओलांडल्या आहेत. एका धर्माचे लोक दुसऱ्या धर्मातील बाबाला अगर देवतांना मानणारेही आहेत. त्यामुळेच विशिष्ट दिवशी विशिष्ट ठिकाणी गर्दी होत असल्याचे दिसून येते. त्यातून नवे व्यवसाय आणि त्यातून होणारी लूटमारही सुरू आहे, ही गोष्ट वेगळीच. सर्वच क्षेत्रांत आघाडी घेतलेला नगर जिल्हा याबाबतीत मात्र खूप मागे राहिला आहे, असे खेदाने म्हणावे लागेल.

बोगस डॉक्‍टरही !
अत्याधुनिक सोयी असलेली मोठी रुग्णालये उभी राहत असताना ग्रामीण भागात बोगस डॉक्‍टरांचीही चलती आहे. अधिकृत वैद्यकीय पदवी नसलेले हे डॉक्‍टर ठोकताळ्याच्या अधारे औषधोपचार करतात. स्वस्तात काम होते, म्हणून आणि गुण आल्याचा तोंडी प्रचार होत असल्याने खऱ्या डॉक्‍टरांपेक्षा अशा बनावट डॉक्‍टारांचीच जास्त चलती आहे. हीसुद्धा एकप्रकारे वैद्यकीय अंधश्रद्धाच म्हणावी लागेल. त्यांच्यावर होणारी कारवाईही अगदीच जुजबी आहे.

४ टिप्पण्या:

Mahendra म्हणाले...

नरेंद्र दाभोळकरांची दोन तिन पुस्तकं वाचलेली आहेत. त्या मधे साई बाबा ते शनी शिंगणापूर सगळे देव त्यांनी कव्हर केले आहेत. मिळाल्यास अवश्य वाचा.
लेख सुंदर जमलाय.
माझ्या कडे नुकतेच एक पुस्तक आणले आहे विकत- "तुम्हाला बरं कां वाटते" या नावाचं . अंधश्रध्दा निर्मुलन समितीने काढलेले.वाचतोय.

अनामित म्हणाले...

साक्षरता विचार करावयाला शिकवीत नाही. विचार करणे हे आपल्या आपण शिकावयाचे असते. नरेंद्र दाभोळकरांबद्दल म्हणावयाचे तर ते विचार करण्याएवजी माझे विचार स्वीकारा असेच सांगतात. असे सांगणार्याची किंमत एखाद्या बुवाइतकीच आहे.

HAREKRISHNAJI म्हणाले...

आपला लेख खुप चांगला आहे, संपुर्ण सहमत.

दाभोळकर नव्हे दाभोलकर.

Abhishek म्हणाले...

छान आहे लेख, आणखी थोडा विस्तृतपणे लिहिला असता, तर अजून चांगला झाला असता, असं मला वाटतं.