गुरुवार, २० मे, २०१०

गुरुजींनो! माराल छडी तर पडेल बेडी

नव्या शैक्षणिक विधेयकाचा परिणाम म्हणून विद्यार्थ्यांऐवजी शिक्षकांनाच हाताची घडी आणि तोंडावर बोट ठेवून शिकवावे लागेल, अशी स्थिती आहे. विद्यार्थ्यास अपमानास्पद बोलता येणार नाही, मग हात लावणे दूरच अशी तरतूद या विधेयकात आहे. या नव्या शैक्षणिक विधेयकाने शिक्षकांच्याच वर्गातील वर्तणुकीची कसोटी लागणार आहे.

'छडी लागे छमछम विद्या येई घमघम' हे काव्य आता इतिहासजमा झाले आहे. छडीमुळे विद्यार्थी अभ्यासाकडे जरी वळत असला तरी अनेक विद्यार्थी त्याचा ताण घेतात आणि त्याचा त्यांच्या मानसिक आरोग्यावरही परिणाम होतो. ग्रामीण भागात अनेक विद्यार्थी केवळ छडीच्या भीतीने शाळेपासून लांब गेले आहे. त्यामुळे विद्यार्थ्याच्या मानसिकतेचा विचार करून अनेक निर्णय घेतले आहेत.

येत्या जूनपासूनच्या शाळाप्रवेशापासूनच विधेयकाची अंमलबजावणी सुरू होत आहे. आठवीपर्यंत आता कुणीही नापास होणार नाही. शिक्षकांना थेट कायद्याच्या चौकटीत आणले जाणार असून एखाद्या विद्यार्थ्याला "गमभन' का आले नाही, म्हणून शिक्षकांना जाब विचारला जाणार आहे. "छडी लागे छमछम, विद्या येई घमघम' हे बालगीत ऐकून अनेक पिढ्या घडल्या. आता शिक्षकांना छडी मारता येणार नाही. शिकविण्याचेच काम त्यांना करावे लागणार असून अपमानास्पद शब्द उच्चारता येणार नाहीत. शारीरिक आणि मानसिक इजा होईल, असे वर्तन शिक्षकांनी करू नये, असे विधयेकात म्हटले आहे. सहा ते चौदा वर्षांपर्यंतच्या प्रत्येक मुलाला मोफत आणि सक्तीचे शिक्षण नव्या विधेयकामुळे मिळणार आहे. सर्व विद्यार्थ्यांना गणवेश, लेखनसाहित्य, पाठ्यपुस्तके मोफत दिली जातील. पाचवीपर्यंतच्या विद्यार्थ्यांना त्यांच्या घरापासून एक किलोमीटरच्या अंतरावर प्रवेश दिला जाईल. आठवीपर्यंत हीच अट तीन किलोमीटरपर्यंत आहे. वर्षभराच्या शैक्षणिक वर्षात संबंधित विद्यार्थ्यांचे सर्वंकष मूल्यांकन होईल. एक-दोन विषय राहिले तो विद्यार्थी अनुत्तीर्ण होणार नाही.

शाळा व्यवस्थापन समितीत बदल करण्यात आला असून समितीत 75 टक्के पालक असतील. त्यात 50 टक्के महिला पालकांचा समावेश असेल. समितीचे अध्यक्षपद पालकांकडेच असेल. पहिली ते चौथीसाठी दर 30 विद्यार्थ्यांमागे एक शिक्षक आणि सहावी ते आठवीसाठी 35 विद्यार्थ्यांमागे एक शिक्षक असेल.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत: