बुधवार, २६ मे, २०१०

शाब्बास राळेगणकरांनो!

गावात आलेल्या चोरांना गावकऱ्यांनी पिटाळून लावल्याच्या अनेक घटना पहायला मिळतात; मात्र प्रत्यक्ष चोरी करीत असताना गावकऱ्यांनी चोरांना जागीच पकडून ठेवून पोलिसांच्या ताब्यात देण्याच्या घटना विरळाच. नगर तालुक्‍यातील राळेगण म्हसोबा या गावात नुकतीच अशी घटना घडली. सुट्टीवर आलेल्या गावातील दोघा लष्करी जवानांच्या धाडसाने आणि गावकऱ्यांच्या पाठिंब्यामुळे चोर पकडला गेला. त्याबद्दल या सर्वांना शाब्बासकी दिलीच पाहिजे. एवढेच नव्हे, तर त्यांचा यथोचित गौरवही झाला पाहिजे. त्यातून इतरांना प्रेरणा मिळू शकेल.
गावात चोर आल्याची आवई उठल्यावर लाठ्या-काठ्या घेऊन रात्ररात्र जागणारी गावे सध्या नगर जिल्ह्यात पहायला मिळतात. चोरांचा पाठलाग करीत डोंगर-दऱ्यांतही रात्री-अपरात्री गावकरी जाऊन येत आहेत; मात्र हाती काहीच लागत नाही. त्यामुळे खरेच चोर होते, की गावकऱ्यांचा भ्रम की आणखी काही हे प्रश्‍न अनुत्तरितच राहतात. या पार्श्‍वभूमीवर राळेगण म्हसोबा गावातील घटना वेगळी ठरते. भापकर कुटुंबाच्या घरात पहाटेच्या सुमारास तिघे चोरटे शिरल्याचे लक्षात आले. या कुटुंबातील अर्जुन व पोपट हे दोघे लष्करात आहेत. सुट्टीसाठी ते गावी आले आहेत. चोर आल्याचे कळताच त्यांनी चोरांना पकडण्यासाठी धाव घेतली. त्यातील एकाला पकडण्यात त्यांना यश आले. चोरट्याकडून झालेली मारहाण सहन करीत त्यांनी दाखविलेले धाडस कौतुकास्पद आहे. पोलिसांचा ढिसाळपणा येथेही अनुभवास आला. पहाटे चोर पकडल्यानंतर पोलिसांना कळविण्याचा प्रयत्न केला, तर पोलिस ठाण्यात कोणीच दूरध्वनी घेतला नाही. शेवटी सकाळी संपर्क झाल्यावर पोलिस आले.

ेया घटनेत गावकऱ्यांच्या धाडसाबरोबरच संयम आणि समजूतदारपणाही लक्षात घेतला पाहिजे. प्रत्यक्ष चोरी करताना पकडलेल्या एकट्या दुकट्या चोरावर गावकरी तुटून पडले असते, तर तो जगू शकला नसता. बऱ्याच ठिकाणी अशा घटना घडल्या आहेत. त्यामुळे नंतर गावकऱ्यांनाच कारवाईला सामोरे जावे लागल्याची उदाहरणे आहेत. राळेगणच्या ग्रामस्थांनी मात्र संयम राखून असे काही कृत्य होऊ दिले नाही. कायदा हातात घेण्याऐवजी त्या चोराला कायदेशीर मार्गाने शिक्षा देण्यासाठी पोलिसांच्या स्वाधीन केले. त्यामुळे आता पोलिसांची जबाबदारीही वाढली आहे. पळालेल्या चोरांचा शोध घेणे आणि या घटनेचा योग्य तपास करून या चोरांना शिक्षा घडवून आणणे हे आव्हान पोलिसांसमोर आहे. यात कुचराई झाली, तर त्यांना पुन्हा गावकऱ्यांच्या रोषाला समोरे जावे लागले, यात शंका नाही. गावकऱ्यांच्या संतापाची झलक घटनेच्या दिवशी पाहिलेले पोलिस त्यातून नक्कीच बोध घेतील, असे वाटते.

आता आपल्यावर चोर सूड उगवतील काय? अशी एक अनाठायी शंका या ग्रामस्थांमधून व्यक्त होत आहे. मात्र, ती शक्‍यता कमी वाटते. कारण गावाची एकी पाहून पुन्हा असे धाडस कोणी करील, असे वाटत नाही. त्यामुळे शंका बाळगण्यापेक्षा गावकऱ्यांनी एकी टिकवून ठेवणे आवश्‍यक आहे. मुख्य म्हणजे, अशीच एकी इतरही गावांत झाली पाहिजे. बदलत्या परिस्थिती आता पोलिसांचा चोरट्यांवर वचक निर्माण होऊ शकत नाही. ते दिवस आता गेले. त्यामुळे गावकऱ्यांचीच भीती चोरट्यांना वाटावी, असे वातावरण गावोगावी तयार झाले पाहिजे. तसे झाले तर चोरांना पळता भुई थोडी होईल. गावात घबराट निर्माण करीत रात्रीची गस्त घालण्यापेक्षा चोरांवर वचक बसेल, अशी कृती ग्रामस्थांनी केल्यास पुन्हा त्या गावाकडे चोरटे फिरकणार नाहीत. दुसऱ्या बाजूला इतर दोघे चोरटे पकडण्यासाठी आणि पकडलेल्यास शिक्षा होण्यासाठी गावकऱ्यांनाच पाठपुरावा करावा लागेल, हेही तितकेच खरे.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत: