बुधवार, ५ मे, २०१०

मदतीला धावून येणारे पालकमंत्री

रस्त्यात अपघात झालेला पहिल्यावर केवळ बघ्याची भूमिका घेणारे अन्‌ निघून जाणारे लोक सर्रास दिसतात. अपघातग्रस्तांच्या मदतीला धावून जाणारे मात्र अतिशय कमी. "व्हीआयपी' लोकांचे तर हे कामच नाही; मात्र नगरचे पालकमंत्री बबनराव पाचपुते हे याला अपवाद म्हणावे लागतील. मंत्री झाले म्हणूनच नाही, तर पूर्वीपासूनच अपघातग्रस्तांना मदत करण्याची त्यांची सवय आहे. मंत्री झाले तरी त्यांनी ती जपली आहे. अर्थात, याबद्दल वेगवेगळे मतप्रवाह असू शकतील. कोणी याला प्रसिद्धीचा "स्टंट' म्हणेल, तर कोणी हे त्यांचे कर्तव्यच आहे असे म्हणेल. एक गोष्ट मात्र निश्‍चित, श्री. पाचपुते यांच्या या कृतीतून अपघातग्रस्तांना मदत करण्याचा एक चांगला संदेश लोकांमध्ये जातो. एखादा मंत्रीच जर अपघातग्रस्तांच्या मदतीला तत्काळ धावून जात असेल, तर सरकारी कर्मचारी आणि सामान्य नागरिकही यातून काही बोध घेतील, असे वाटते. त्यादृष्टीने पालकमंत्री करीत असलेले काम मोलाचे ठरते.

अपघातानंतर पोलिस चौकशीचा ससेमिरा मागे लागतो, असा एक समज लोकांमध्ये रूढ झाला आहे. त्यामुळे अपघातग्रस्तांच्या मदतीला धावून जाण्याची वृत्ती कमी झाली आहे. वेळेवर मदत न मिळाल्याने अपघातात दगावणाऱ्यांची संख्या वाढते. कोणी मदतीसाठी थांबला, तर इतर वाहनचालक त्यांना सहकार्य करण्यास तयार होत नाहीत. एवढेच काय, सरकारी अधिकारी, कर्मचारी, ड्युटीवर नसलेले पोलिससुद्धा अशा वेळी मदतीला धावून येत नाहीत. एका बाजूला पोलिस चौकशीची भीती आणि दुसरीकडे उदासीनता. यामुळे अपघातग्रस्तांना मदत करण्याचे टाळले जाते. विशेष म्हणजे, एकदा अपघातातून बचावलेली माणसेसुद्धा दुसऱ्याच्या अपघाताच्या वेळी धावून जात नाहीत, असेही आढळून येते.

यासाठी लोकांचे प्रबोधन होणे आवश्‍यक आहे. आता नियम खूप बदलले आहेत. अघातग्रस्तांना मदत करून रुग्णालयात दाखल करणाऱ्यांना आता पूर्वीसारखे नसत्या चौकशांना सामोरे जावे लागत नाही. मात्र, याची लोकांना फारशी माहिती नाही. ती व्हावी, यासाठी प्रशासकीय पातळीवरून प्रबोधनासाठी प्रयत्नही केले जात नाहीत. वाहतूक सुरक्षा सप्ताहातूनसुद्धा यावर भर दिला जात नाही. अपघात झाल्यास मदत करण्याचे काम पोलिसांचे आहे, आपले नाही, असाच समज लोकांमध्ये रूढ होत आहे. त्यामुळे काही जण दूरध्वनी करून पोलिसांना अपघात झाल्याचे कळवितात आणि निघून जातात. अपघातग्रस्तांच्या असहायतेचा गैरफायदा उठवत त्यांच्याजवळच्या चीजवस्तू लांबविणारेही काही लोक पाहायला मिळतात, ही गोष्ट वेगळी.

या पार्श्‍वभूमीवर श्री. पाचपुते यांचे काम वेगळे ठरते. प्रत्यक्ष कृतीतून लोकांचे प्रबोधन ते करीत आहेत. जिल्ह्यात होणाऱ्या अपघातांची संख्या पाहता, सर्व ठिकाणी श्री. पाचपुते किंवा प्रशासन पोचू शकत नाही. त्यासाठी लोकांनीच मदतीसाठी पुढे आले पाहिजे, हा एक संदेश यातून जाणार आहे. कामात व्यग्र असणारे मंत्री स्वतः अपघाताच्या ठिकाणी थांबतात, रक्ताने माखलेल्या लोकांना आपल्या वाहनात घेतात, त्यांना दाखल करण्यासाठी रुग्णालयात जातात, ही गोष्ट फार महत्त्वाची आहे. प्रवचनकार असलेले श्री. पाचपुते त्या माध्यमातून लोकांचे प्रबोधन करीत आहेत; परंतु त्यांनी प्रत्यक्ष कृतीतून केलेले प्रबोधन अधिक प्रभावी आणि उपयुक्त ठरणारे आहे. त्यामुळे या विषयाला प्रसिद्धी मिळालीच पाहिजे. जास्तीत जास्त लोकांपर्यंत श्री. पाचपुते यांचा हा कृतिसंदेश गेला पाहिजे. त्यातूनच अपघातग्रस्तांना मदत करणाऱ्यांची संख्या वाढण्यास मदत होणार आहे.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत: