गुरुवार, २१ जानेवारी, २०१०

चोरीची वाहने फोडण्याचा "धंदा'!

वरवर पाहता भंगाराचे दुकान, असे स्वरूप असते. आतमध्ये मात्र वेगळाच "उद्योग' सुरू असतो. राज्यभरातून चोरलेली वाहने तेथे आणून फोडली जातात. डंपर, ट्रकसारखी मोठी वाहने तासाभारात होत्याची नव्हती करण्याची कला त्यांनी साध्य केली आहे. त्यामुळे लाखो रुपयांची उलाढाल तेथे होते. अर्थात कारवाई करणाऱ्या सर्व यंत्रणांशी "अर्थपूर्ण' संबंधांतूनच हे साध्य होते.

पुणे जिल्ह्यातील एका वीटभट्टी चालकाचा डंपर नगरमधून चोरून आणून भंगाराच्या दुकानात त्याचे तुकडे करण्यात आले. हे भंगार विकण्याच्या प्रयत्नात असतानाच वाहनमालकाच्या शोधामुळे किमान भंगार तरी हाती लागले. त्यातून उघडकीस आला चोरीचे वाहने फोडून भंगारात विकण्याचा धंदा. अर्थात, हा धंदा नगरमध्ये नवीन नाही. यापूर्वीही त्याबद्दल बरीच चर्चा झाली आहे, तरीही येथील पोलिसांना तो सापडत नव्हता. एका सामान्य वीटभट्टी चालकामुळे यावर प्रकाश पडला. एक प्रकार उघडकीस आला असला, तरी असे आणखी किती धंदे सुरू असतील, याचा अंदाजच न केलेला बरा. चोरीची वाहने जातात कोठे, वाहनचोऱ्या का थांबत नाहीत, याची उत्तरे मात्र यातून मिळाली आहेत.

पत्र्याच्या शेडमध्ये भंगारविक्रीचे दुकान थाटून बसलेली ही मंडळी वरकरणी किरकोळ भंगारविक्रेते आणि औद्योगिक वसाहतीतील भंगार घेत असल्याचे भासवीत असली, तरी त्यांचा खरा धंदा वेगळा आहे, हेच यातून पुढे आले. राज्यातील वाहनचोरांशी त्यांचे लागेबांधे आहेत. अवजड वाहने चोरून ती येथे आणून स्वस्तात विकली जातात. चोरीचे वाहन भंगाराच्या दुकानात आणले जाते. भंगार ठेवण्यासाठी म्हणून शहरापासून दूर अंतरावर गोदाम असते. तेथे अवघ्या तासाभरात वाहनाचे तुकडे केले जातात. एका गॅस कटरच्या मदतीने आणि एका सिलिंडरमध्येच हे काम करण्याचे "कौशल्य' असलेले कारागीर त्यांच्याकडे असतात. दुचाकी वाहने तर काही मिनिटांत मोकळी केली जातात. नंतर हे भंगार फौंड्रीत पाठविले जाते. नगरमधीलच काही कंपन्या हा चोरीचा माल स्वस्तात घेतात. त्यांचेही बडे प्रस्थ निर्माण झालेले आहे. एकदा वाहनाचे तुकडे झाले, की मूळ मालकालासुद्धा ते ओळखणे कठीण जाते.

अर्थात हा सर्व धंदा पोलिसांच्या "अर्थपूर्ण' सहकार्याने चालतो. त्यामुळेच वाहनचोऱ्या आणि इतरही चोऱ्या झाल्या, तरी भंगारविक्रेत्यांवर कधीच छापा घातला जात नाही. वाहनचोरी झाली, की सुरवातीला पोलिस तक्रार घेण्यास टाळाटाळ करतात. त्यानंतर तपास सुरू होतो. यामध्ये दोन-तीन दिवस जातात. तोपर्यंत चोर आणि भंगारवाले यांना पुरेसा अवधी मिळतो. वाहनाचे तुकडे झाले, की ते विकून भंगारवाले आणि चोरही मोकळे होतात. फौंड्रीत भंगार वितळवून त्याचे लोखंड केले जाते. त्यानंतर पोलिस तपास सुरू होता. अशा वेळी त्यांच्या हाती काय लागणार? मुळात चांगले धावते-पळते वाहन अशा पद्धतीने भंगारात विकले जात असेल, अशी कल्पनाही कोणी करणार नाही. त्यामुळे वाहन चोरले, तरी ते वाहन म्हणूनच वापरले जाईल, अशा अपेक्षेनेच शोध सुरू असतो. नगरमध्ये मात्र भंगारातून सोने कमावण्याचा हा धंदा सुरू आहे. पोलिस संरक्षणात सुरू असलेला हा धंदा बंद पडल्याशिवाय राज्यातील वाहनचोऱ्या थांबणार नाहीत.

२ टिप्पण्या:

हेरंब म्हणाले...

बापरे.. जामच फालतूपणा आहे हा.

Unknown म्हणाले...

very exelent