मंगळवार, २५ ऑगस्ट, २००९

सावधान! उत्सव सुरू आहेत

चौकातल्या मंडपात गणपती अन्‌ राहुटीत पोलिस. मिरवणुकीत नाचणारे कार्यकर्ते अन्‌ त्यांच्याभोवती पोलिसांची फौज. मंदिर-मशिदीमध्ये प्रार्थना सुरू अन्‌ बाहेर पोलिसांचा जागता पहारा, अशीच अवस्था आपल्याकडील सण-उत्सवांची झाली आहे. दंगल किंवा गोंधळ गडबडीची अन्‌ अलीकडे दहशतवादी हल्ल्याची भीती असल्याने कडेकोट बंदोबस्ताशिवाय उत्सव साजरे होतच नाहीत. उत्सवातील चालीरितींपेक्षा आता सुरक्षाविषयक नियमांना प्राधान्य देण्याची वेळ आली आहे. असाच "पोलिसमय' गणेशोत्सव आणि त्यातच रमजानचा महिना सध्या सुरू आहे.
कोणताही उत्सव हा खरा आनंदासाठी असतो. मात्र, उत्सवांच्या बदलत्या स्वरूपामुळे पोलिसांना त्यामध्ये नको एवढा हस्तक्षेप करण्याची वेळ आली आहे. कधी कधी तर जणून पोलिस आणि प्रशासनच उत्सव साजरा करीत आहेत की काय, असे वाटते. उत्सवाचा सर्वाधिक ताण असतो तो पोलिस यंत्रणेवर. या काळात त्यांच्या रजा बंद, साप्ताहिक सुट्या बंद. कितीही तातडीचे काम असले, तरी रजा नाही. इतर कामे बंद. केवळ बंदोबस्त करायचा. यासाठी अतिरिक्त यंत्रणाही बोलाविली जाते. लाठ्याकाठ्या तयार असतात. दारूगोळा भरून घेतलेला असतो. कोणत्याही प्रसंगाला सामोरे जाण्यासाठी आधीच रंगीत तालीम करून घेतलेली असते. जणू एखाद्या युद्धजन्य परिस्थितीला सामोरे जाण्याचीच तयारी पोलिस दलाने केलेली असते. आनंदाच्या उत्सवाचा बंदोबस्त असा तणावपूर्ण का असावा? उत्सव शांततेत पार पाडण्याची जबाबदारी कार्यकर्त्यांचीही नाही काय? असे प्रश्‍न यातून निर्माण होतात.
अर्थात ही परिस्थिती ओढावण्यास सर्वच घटक जबाबदार आहेत. उत्सवाकडे राजकारणाचे व्यासपीठ म्हणून पाहिले जाऊ लागले आहे. उत्सव काळात जास्तीत जास्त शक्तिप्रदर्शन करण्याकडे राजकीय कार्यकर्त्यांचा कल असतो. त्यामुळे त्यामध्ये गोंधळ होण्यास सुरवात झाली. हा गोंधळ टाळण्याची अगर क्षमविण्याची जबाबदारी ज्या पोलिसांवर असते, त्यांनी आपल्या पद्धतीने त्याला सामोरे जाण्याची पद्धत सुरू केली. त्यामुळे उत्सव म्हणजे पोलिस बंदोबस्त, असेच स्वरूप सध्या सर्व धर्मांच्या उत्सवांना आले आहे. त्यातून सामान्यांची आणि उत्सवाचीही ओढाताण सुरू झाली आहे. कार्यकर्ते उत्सवाला आपल्या सोयीनुसार बदलू पाहात आहेत, तर पोलिस त्यांना बंदोबस्ताला सोपे जाईल, असे स्वरूप उत्सवाला देऊ पाहत आहेत. त्यातून अनेक नवे नियम करण्यात आले, नव्या पद्धती पाडण्यात आल्या. उत्सवाचे मूळ स्वरूप बदलण्यास केवळ कार्यकर्तेच नव्हे, तर पोलिस प्रशासनही जबाबदार असल्याचे यातून दिसून येते.
निवडणुकांच्या तोंडावर येणारे उत्सव तर विशेष दक्षता घेण्यासारखे असतात. त्यामुळे या काळात इतर सर्व कामे बंद ठेवून पोलिस प्रशासन उत्सवाच्या बंदोबस्तातच व्यग्र असते. सध्या अशीच स्थिती आहे. यावर्षी तर स्वाइन फ्लू आणि दुष्काळाची पार्श्‍वभूमी असूनही या वातावरणात फारसा बदल झालेला नाही. उत्सवाचे हे स्वरूप बदलण्यासाठी प्रयत्न होण्याची गरज आहे.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत: