
हिंदी चित्रपटात शोभावी तशी खंडणीसाठी अपहरण करण्याची घटना गेल्या आठवड्यात नगरमध्ये घडली. पुरावा मागे राहणार नाही, याची पुरेपूर दक्षता घेत आरोपींनी हा गुन्हा केला असला, तरी त्यांची ओळख पोलिसांना पटली आहे. मात्र मुख्य आरोपी अद्याप फरार आहे.
नगरमधील वाहतूक व्यावसायिक नरेंद्र जग्गी यांचे पाच लाखांसाठी अपहरण करण्याची घटना गेल्या आठवड्यात घडली. पाच लाखांची मागणी करून शेवटी अपहरणकर्त्यांनी 46 हजार रुपये घेऊन त्यांची सुखरूप सुटकाही केली. नगरमध्ये खंडणीचे गुन्हे करणाऱ्या अजहर मंजूर शेख याच्या टोळीने नियोजनबद्धरीत्या हा गुन्हा केला. मागील वेळी झालेल्या चुका टाळण्याचा प्रयत्न करीत त्याने पोलिसांनाही आव्हान दिले आहे.
या प्रकरणी विकास कांबळे नावाचा आरोपी अटक झाल्यावर त्याच्याकडून पोलिसांना बरीच माहिती मिळाली. श्री. जग्गी यांच्याकडून खंडणी उकळण्याचे "टार्गेट' ठरल्यावर मुख्य आरोपी अजहर मंजूर शेख याने साथीदार व साधनांची जुळवाजुळव केली. सायंकाळच्या सुमारास तन्वीर शेख (रा. तख्ती दरवाजा) यांच्याकडे जाऊन, राहुरीला जायचे आहे, असे सांगून व्हॅन भाड्याने घेतली. त्यासाठी एक हजार रुपये देण्याचे ठरले. त्यांचा चालक रिझवान पठाण याला घेऊन ते निघाले. "ऍडव्हान्स' म्हणून पाचशे रुपये दिले होते. आरोपी कांबळे आणि अन्य दोघांनाही सोबत घेतले. त्यानंतर सर्व जण माथेरान ढाब्यावर गेले. तेथे जाऊन मद्यपान व जेवण केले. रात्री साडेआठच्या सुमारास ते राज चेंबर्सजवळ आले. तेथे आल्यावर ते श्री. जग्गी कार्यालयाबाहेर पडण्याची वाट पाहू लागले. त्यासाठी अन्य एकाला "नियुक्त' केले असावे. त्याच्याकडून त्यांना श्री. जग्गी यांच्या हालचाली कळत होत्या. हा प्रकार व्हॅनचालकाच्या लक्षात आल्याने तो यासाठी नकार देऊ लागला. त्यामुळे त्यांनी व्हॅनचालक रिझवान याला खाली उतरवून दिले व तेथून निघून जाण्यास सांगितले.
तोपर्यंत जग्गी कार्यालयाबाहेर पडले. आरोपींनी व्हॅनमधून त्यांचा पाठलाग सुरू केला. सर्जेपुऱ्यात संधी मिळताच त्यांच्या पुढे जाऊन, व्हॅन आडवी लावून त्यांना व्हॅनमध्ये घेतले. व्हॅनमधील दोघांनी खाली उतरून श्री. जग्गी यांचीच दुचाकी घेतली व व्हॅनच्या मागे चालवत गेले. खंडणीची रक्कम आणण्यासाठीही याच दुचाकीचा वापर केला, जेणेकरून ते पैसे देण्यासाठी आलेल्याने साथीदाराच्या दुचाकीचा क्रमांक पाहू नये.
श्री. जग्गी यांच्या पुतण्याशी संपर्कासाठी जग्गी यांचाच मोबाईल, तर साथीदारांशी संपर्कासाठी स्वतःचा मोबाईल वापरण्यात आला, जेणेकरून मोबाईल क्रमांकही पोलिसांना उपलब्ध होऊन त्याद्वारा तपास होऊ नये.
खंडणीची रक्कम मिळाल्यानंतर जग्गी यांना मुकुंदनगरमध्ये सोडून देण्यात आले. यातील आरोपी कांबळे यालाही तेथेच सोडण्यात आले, तर अजहर व अन्य आरोपींनी व्हॅनमालकाच्या घरी जाऊन त्याची व्हॅन परत केली व राहिलेले पाचशे रुपयेही देऊन टाकले. इकडे मुकुंदनगरला उतरलेला आरोपी कांबळे पायी चालत तारकपूर बस स्थानकावर आला. मद्यपान केल्याने आपल्याला काही समजत नव्हते, असे तो आता पोलिसांना सांगत आहे. त्यामुळे आपण तारकपूर बस स्थानकावरच थांबलो. रात्री तेथेच बाकावर झोप काढली. सकाळी उठून सिद्धार्थनगरला गेलो. गुन्हा दाखल झाल्याची माहिती मिळाल्यावर दुसऱ्या दिवशी कल्याणला निघून गेलो, असे तो पोलिसांना सांगत आहे. अन्य आरोपीही त्या रात्री नगरमध्येच विविध ठिकाणी थांबले होते. गुन्हा दाखल होणार नाही, अशीच त्यांची अपेक्षा होती. घटना घडल्यानंतर घाबरलेल्या श्री. जग्गी यांनी पोलिसांशी संपर्क साधण्यास उशीर केला. शिवाय पोलिसांना घटना कळल्यावरही नेमका तपशील कळून शोधमोहीम सुरू होण्यातही बराच अवधी गेला.
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा