शुक्रवार, २८ जून, २०१३

पोलिस आहोत म्हणून...

पो लिसांची नोकरी, त्यांचे कर्तव्य इतरांपेक्षा वेगळे आहे, याबद्दल कोणाचे दुमत नाही. त्यांना कर्तव्य बजावताना अनेकदा कुटुंबापासून दूर राहावे लागते. नाती विसरावी लागतात. म्हणूनच नागरिकांच्या मनात इतर सरकारी नोकरांपेक्षा पोलिसांबद्दल वेगळा भाव असतो. त्यातच पोलिसांना कायद्याने मिळालेल्या अधिकारांमुळे हे पद आणखी महत्त्वाचे बनते. मात्र, समाजातील या "स्टेटस'चा गैरवापर करणारे पोलिसही कमी नाहीत. त्याचा परिणाम एकूणच पोलिस दलाच्या प्रतिमेवर होतो. अर्थात अशाही परिस्थितीत पदाचा गैरवापर टाळून नोकरी आणि समाजाला योग्य न्याय देणारे पोलिस आहेतच. त्यांची संख्या कमी असली, तरी त्यांच्याबद्दल समाज आदरानेच बोलतो आणि वागतो.

गेल्या आठवड्यात एका पोलिसाने आपल्या मुलीच्या शाळेत जाऊन विद्यार्थ्याला पोलिसी खाक्‍या दाखविला. अर्थात पोलिसी खाक्‍याचीही ही काही एकमेव घटना नाही. पोलिस असल्याचा गैरफायदा घेणारे अनेक महाभाग आहेत. वेगवेगळ्या क्षेत्रांत वेगवेगळ्या कारणांसाठी, सलवतींसाठी अगर काही प्राप्त करून घेण्यासाठी वर्दीचा गैरवापर होत असल्याचे दिसून येते. खासगी वाहनातून जाताना "टोल' चुकविण्यापासून मंदिरातील रांगेला "बायपास' करून देवदर्शन घेण्यापर्यंतच्या सवलती पोलिस घेतात. वर्दी आणि कायद्याने दिलेले अधिकार याला नागरिक घाबरतात, त्यामुळे खासगी आयुष्यातही याचा उपयोग झाला पाहिजे, अशीच पोलिसांची भावना असते. त्यामुळे मुलीच्या शाळेत पालक म्हणून गेले असताना किंवा मंदिरात भाविक म्हणून जातानाही त्यांच्या डोक्‍यातील पोलिस जात नाही.

आपल्या हद्दीतील हॉटेलमध्ये जेवण करण्यासाठी जायचे, बिल नाही दिले तरी चालते! चित्रपट पाहण्याची लहर आली की चित्रपटगृहात जाऊन बसायचे. यावरून तर नगरमध्ये एका चित्रपटगृहात पोलिस आणि प्रेक्षकांमध्ये वादही झाला होता. तेथेही वर्दीच्या अधारे हे प्रकरण मिटवून घेण्यात आले. बहुतांश पोलिस स्वतःच सिग्नल आणि वाहतुकीचे इतर नियम पाळत नाहीत, एवढेच काय, तर शहरात आणि ग्रामीण भागातही काही पोलिसांची बेकायदा प्रवासी वाहतूक करणारी वाहने आहेत. ते पोलिस आहेत, म्हणून ते चालून जाते. जागा खरेदी-विक्रीच्या व्यवहारातही पोलिस असतात. त्यांच्यामुळे वादातील प्रकरणे निपटणे सोपे जाते, "मध्यस्थ पोलिस आहे' हे जणू या धंद्यातील हमीपत्रच म्हणावे लागेल! कोणी हॉटेल चालवतो, कोणी नातेवाइकांच्या नावावर इतर व्यवसाय करतो, तर कोणी राजकीय नेत्यांचे "कार्यकर्ते' बनून राजकीय खेळ्यांमध्येही सहभागी होतात. कोणाला पैसे वाचविण्यासाठी, कोणाला रांग टाळण्यासाठी, कोणाला अडलेले काम तातडीने करण्यासाठी, कोणाला नियमात नसलेले काम नियमात बसवण्यासाठी, कोणाला शेजाऱ्यावर छाप पाडण्यासाठी, कोणाला भावकीत वर्चस्व गाजविण्यासाठी पोलिस असल्याचा फायदा उचलायचा असतो. त्यासाठीच अनेकांची धडपड सुरू असते.

आपण पोलिस असल्याने खासगी आयुष्यातही इतर नागरिकांपेक्षा वेगळे आहोत, ही भावना त्यांच्या मनात असते. पोलिसांची सरकारी गाडी टोलनाक्‍यावर ज्या थाटात जाते, तशीच पोलिसाची खासगी गाडीसुद्धा काचेच्या आतून "पोलिस' असे लिहून टोल न भरता रुबाबात पुढे जाते. सरकारी नोकरांच्या खासगी वाहनांना टोल माफ नाही. हे नाक्‍यावरील कर्मचाऱ्यांनाही माहीत असते; पण खासगी गाडीतून जाताना अडविले, तर उद्या सरकारी गाडी घेऊन येऊन आपल्याला "कामाला लावतील', ही भीती त्यांच्या मनात असते.
शाळेत पोलिस आले तर विद्यार्थीच काय शिक्षकही बिचकतात. त्यामुळे शाळेत जाऊन बेकायदेशीर कृत्ये करून इतर विद्यार्थी आणि आपल्याही मुलांवर काय संस्कार करणार? यातून मोठा धोका पुढे असतो. पोलिसांच्या कुटुंबीयांवर याचा परिणाम होतो. आपण पोलिसांचे कुटुंबीय म्हणजे इतरांपेक्षा वेगळे आहोत, अशी भावना त्यांच्या मनात असते. त्यामुळे अनेकदा तेही नको ते धाडस करतात. त्यातूनच पोलिसांची मुले गुन्हेगारी क्षेत्राकडे वळत असल्याचे दिसून येते. शाळेतील प्रवेश, अभ्यास, परीक्षा या गोष्टीही ते "पोलिसी पद्धतीनेच' मिळवू पाहतात. आपण पोलिस आहोत, याचा अभिमान जरूर असावा; पण त्याचा गैरवापर करू नये. त्याचा वापर लोकसेवेसाठी होणार नसेल तरी एक वेळ चालेल; पण त्याचा गैरवापर करून लोकांना त्रास देण्याचा या मंडळींना निश्‍चितच अधिकार नाही, हेही लक्षात घेतले पाहिजे.

1 टिप्पणी:

Bharatiya Yuva म्हणाले...

नमस्कार मंडळी,

मराठीब्लोग्स.इन चे बिटा व्हर्जन फक्त आपल्यासाठी सुरू करण्यात आलेले आहे.

आत्ताच http://marathiblogs.in ला भेट द्या, नोंदणी करा,(*पुन्हा नवी नोंदणी) , आणि आपल्या ब्लॉग मधील कोणतीही लिंक मराठीब्लॉग्स.इन वर शेअर करा.
तसेच आपण RSS फीड ने देखील आपला ब्लॉग येथे जोडू शकता.(http://marathiblogs.in/page.php?page=contact-us)

३१ जुलै पर्यन्त आपले सर्वोत्तम ब्लॉग पोस्ट मराठीब्लॉग्स.इन वर शेअर करा,
जास्तीत जास्त वोट्स मिळवण्यासाठी आजच आपला ब्लॉग मराठीब्लॉग्स.इन वर जोडा.
ज्या पोस्ट ला सर्वाधिक वोट्स(मते) मिळतील, त्यांना खालील बक्षिसे देण्यात येतील.
१. मृत्युंजय (मराठी पुस्तक) मेहता पब्लिशिंग हाऊस किंवा रुपये २५० ची कोणत्याही मराठी पुस्तकावर सवलत.(मराठीबोली.कॉम)
२. रुपये १०० ची कोणत्याही मराठी पुस्तकावर सवलत. (मराठीबोली.कॉम)
३. रुपये ५० ची कोणत्याही मराठी पुस्तकावर सवलत. (मराठीबोली.कॉम)

स्पर्धेचे नियम.
१. ब्लॉग मराठीतच असावा.
२. ब्लॉग च्या होमपेज वर मराठीब्लोग्स.इन चे वीजेट.
३. ब्लॉग पोस्ट आपण शेअर करू शकता, आणि आपल्या मित्रांना त्यावर वोट करायला सांगू शकता.
त्यासाठी आपल्या मित्रांना फक्त मराठीब्लोग्स.इन वर नोंदणी करावी लागेल.(त्यांचा स्वतचा ब्लॉग असण्याची आवश्यकता नाही.)
४. स्पर्धेचा निकाल फक्त सर्वाधिक वोट्स वर अवलंबून असेल.
५. चुकीच्या किंवा खोट्या वोट्स वर आधारित ब्लॉगला स्पर्धेबाहेर काढण्याचा हक्क मराठीब्लॉग्स.इन कडे राखीव.

स्पर्धा लवकरच मराठीब्लॉग्स.इन संकेतस्थळावर सर्वांसाठी जाहीर करण्यात येईल.