गुरुवार, २५ ऑक्टोबर, २०१२

दहशतवादाच्या संशयाचे मूळ


पु ण्यात एक ऑगस्टला झालेल्या बॉंबस्फोटातील संशयित आरोपींचे धागेदोरे नगरपर्यंत पोचले. अटक करण्यात आलेल्या चारही संशयित आरोपींचा एकमेकांशी आणि तेवढाच नगरशी संबंध असल्याचे पोलिसांच्या तपासात उघड झाले आहे. यावरून दहशतवादाच्या संशयाची मुळे नगरमध्ये आल्याचे दिसून येते. येथूनही त्याला खतपाणी घातले जात असल्याच्या संशयाला वाव आहे. अर्थात, सखोल पोलिस तपासातच या गोष्टी नेमकेपणाने स्पष्ट होतील. मात्र, यामुळे नगर शहर किंवा एखाद्या समाजाला बदनाम करण्याचा प्रयत्न होता कामा नये. 

नगरची आतापर्यंत राज्यात, देशात आणि आंतरराष्ट्रीय पातळीवरही वेगळी ओळख आहे. राजकारण, सहकार, कला, क्रीडा या क्षेत्रात नगरने विविध पातळ्यांवर आपला ठसा उमटविला आहे. नगरचे नाव या अर्थाने सातासमुद्रापार नेलेली व्यक्तिमत्त्वे शहरात आहेत. अर्थात, ही नगरची परंपरा आहे, त्यामुळे स्वातंत्र्यलढ्यातही नगरचे योगदान मोठे आहे. स्वातंत्र्यसेनानी आणि त्यांनी गाजविलेल्या पराक्रमाची मोठी परंपरा नगरला आहे. देशभक्तीची ही परंपरा असलेल्या नगरमध्ये देशविघातक कृत्यांची मुळे आढळून आल्याने नगरकरांच्या दृष्टीने ती नक्कीच शरमेची बाब आहे.

अर्थात, या गोष्टी अचानक घडल्या नाहीत. पोलिस, गुप्तचर, राजकारणी आणि नागरिकांच्या दुर्लक्षाचाच हा परिपाक आहे. शहरात देशविघातक कृत्ये सुरू असल्याचे नेहमी बोलले जाते; पण त्यांचा शोध घेऊन कारवाईची धमक ना अधिकाऱ्यांनी दाखविली, ना लोकप्रतिनिधींनी त्याचा पाठपुरावा केला. एखाद्या भागाला यासाठी बदनाम करून, त्याचा बागूलबुवा करून मते मिळविण्यातच काही राजकारण्यांनी धन्यता मानली. निवडणुकीच्या प्रचारात विशिष्ट समाज आणि भागावर भाषणे ठोकली की काम झाले, असाच आतापर्यंतचा शिरस्ता बनला आहे. आता या नव्या संशयाच्या मुळांचा वापरही असाच केला जाईल; मात्र ही मुळे येथे कशी आली, का रुजली, ती कशी उखडून टाकता येतील, पुन्हा येऊ नयेत म्हणून काय करता येईल, याचा विचार ना राजकारणी करीत आहेत, ना पोलिस प्रशासन. 
एखाद्या भागाबाबत बागूलबुवा करून तेथील सामाजिक अभिसरण रोखण्याचा जो प्रयत्न झाला, तोच अशा गोष्टींसाठी पूरक ठरला आहे. आपल्या शहरात नवीन कोण येतो, कोणाला भेटतो, त्याचा व्यवसाय काय, त्याचे विचार काय, त्याचे येथील नाते काय, त्याला कोणाची मदत मिळते, या गोष्टींवर समाजाचे आणि पोलिसांतील गुप्तचरांचे जे स्वाभाविक लक्ष असते, तेच राहिले नाही. त्याचा गैरफायदा बाहेरच्या लोकांनी उठविला नसता तरच नवल! ही परिस्थिती त्यांना सुरक्षित वाटली असावी आणि पद्धतशीरपणे आपले जाळे पसरले असावे. याचा अर्थ, यामध्ये त्या भागातील सर्व जण यामध्ये सहभागी आहेत, असा मुळीच नाही. त्यातून आपुलकीची भावना नष्ट होऊन अशा गोष्टींकडे दुर्लक्ष करण्याची वृत्ती वाढते, तीच सध्या महागात पडल्याचे दिसून येते. त्यामुळे सर्वांकडेच संशयाने पाहण्याचा दृष्टिकोन प्रथम बदलावा लागेल. 

आता राहिली गोष्ट पोलिस गुप्तचरांची. गेल्या काही वर्षांत गुप्तचरांच्या कामाचा प्राधान्यक्रमच बदलला आहे. पूर्वी अशा गोष्टींवर प्राधान्याने लक्ष ठेवले जायचे. शहरातील हालचालींची जंत्रीच गुप्तचरांकडे उपलब्ध असायची. त्यासाठी अपार मेहनत घेणारे अधिकारी-कर्मचारी या शाखेत होते. आजच्यासारखी अत्याधुनिक संपर्कयंत्रणा त्या वेळी नव्हती, माहिती द्यायला लोक पुढे येत नव्हते. अशा प्रतिकूल परिस्थितीत चांगले काम करून दाखविलेले अधिकारीही नगरमध्ये होऊन गेले. त्यांनी संकलित केलेली माहिती, ठेवलेल्या नोंदी आजही उपयुक्त ठरू शकतात. किंबहुना, त्यांच्याकडे दुर्लक्ष झाले नसते, हे काम पुढे सुरू राहिले असते, तर आज संशयाची ही मुळे नगरमध्ये कदाचित आलीच नसती.    (सकाळ पोलिसनामा...)

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत: