विरहात तळमळणारी प्रेयसी... कबूतराच्या माध्यमातून चिठ्ठी पाठवून तिला सुखद दिलासा देणारा प्रियकर... हिंदी चित्रपटांमधील हा लोकप्रिय प्रसंग... मात्र, प्रेमाचा दूत ठरलेले कबूतर आता ओडिशामध्ये पोलिस विभागात दाखल होऊन संदेशाचे वहन करणार आहे. यापूर्वी चक्री वादळ आणि महापुरात याच कबूतरांनी संदेशवहनाची जबाबदारी सक्षमपणे राज्यात पार पाडलेली आहे.
राज्यातील कटक आणि अंगूल या जिल्ह्यांत दीडशे कबूतरांचे पथक आहे. देशाचा स्वातंत्र्यदिन, प्रजासत्ताकदिन आणि काही विशेष कार्यक्रमांसाठी या कबूतरांना आकाशात उडविले जाते. यापैकी अंगूलकडे 50 आणि कटक जिल्ह्यात शंभर कबूतरे आहेत. राजधानी भुवनेश्वर ते कटक एवढे अंतर पार करण्यासाठी कबूतरांना केवळ 17 ते 25 मिनिटे लागतात. व्यवस्थित प्रशिक्षण दिल्यास मुसळधार पाऊस आणि प्रतिकूल हवामानातही कबूतर केवळ 12 मिनिटांत जाऊ शकते, तसेच मूळ स्थानी परत येऊ शकते. यातील हुशार कबूतरांना व्यवस्थित प्रशिक्षण दिल्यास शहरातील विशिष्ट ठिकाणी ती संदेश घेऊन जाऊ शकतात. पर्यटकांचे आकर्षण असलेली जगप्रसिद्ध जगन्नाथपुरी रथयात्रा, बालासूर येथील क्षेपणास्त्र प्रकल्प यांच्या सुरक्षेसाठी या कबूतरांचा उपयोग केला जाऊ शकतो.
ई-मेल, एसएमएस, दूरध्वनी आणि मोबाईलच्या काळात कबूतरांच्या पथकांचा पारंपरिक पद्धतीने वापर करण्याच्या प्रयोगामुळे लोकांना आश्चर्य वाटू शकते. मात्र, या संदर्भात मुख्यमंत्री नवीन पटनाईक स्वतः विशेष आग्रही आहेत. या कबूतरांविषयी ते अतिशय आश्वासक आहेत. त्यामुळे पोलिस खात्यात कबूतरांच्या पथकांचा संदेशवहनसाठी समावेश करण्याचे आदेश त्यांनी दिले, असे या पथकाचे वरिष्ठ अधिकारी निहाल बिस्वाल यांनी सांगितले.
पायाला बांधलेला संदेश तब्बल सातशे ते आठशे किलोमीटरवर योग्य ठिकाणी नेण्याची कबूतरांची क्षमता आहे. मात्र, केवळ पाच लाख रुपये वाचविण्यासाठी कबूतरांच्या माध्यमातून राबविली जाणारी सेवा बंद करण्यात आली होती, अशी माहिती सूत्रांनी दिली.
राज्यात कबूतरांच्या सक्रियतेचा मोठा इतिहास आहे. स्वातंत्र्यप्राप्तीनंतर 1948 मध्ये पंतप्रधान जवाहरलाल नेहरू यांनी राज्याला भेट दिली होती. त्या वेळी त्यांच्या दौऱ्याची प्रभावी व्यवस्था करण्यासाठी संदेश पाठविण्याच्या कामात याच कबूतरांचा वापर करण्यात आला होता. 1999 मध्ये आलेल्या चक्री वादळानंतर दळणवळण आणि दूरसंचार यंत्रणा ठप्प झाल्यावर राज्याच्या सागरकिनारी भागांची खबरबात कबूतरांनीच राजधानीत कळविली होती. राज्याला 1982 मध्ये महापुराने वेढले होते. माहिती कळविण्यासाठी सर्व आधुनिक यंत्रणा अक्षम ठरल्या असताना कबूतरांनी महत्त्वाची भूमिका वठविली होती. (सकाळ)
1 टिप्पणी:
स्वित्झर्लण्डच्या सैन्यदलातही कबूतरांचा सन्देशवाहक म्हणून वापर केल्या ज़ातो.
- नानिवडेकर
टिप्पणी पोस्ट करा