गुरुवार, २६ जुलै, २०१२

पोलिसांची व्यसनमुक्ती कधी?

गा वातील तंटे गावातच मिटवून गावे तंटामुक्त करण्यासाठी सरकारने विशेष मोहीम आखली, तशी पोलिसांचीही व्यसनमुक्ती करण्यासाठी एखादी योजना आखण्याची गरज निर्माण झाली आहे. तंट्यांमुळे गावांचा विकास खुंटतो, तसाच व्यसनांमुळे संबंधित पोलिसांचे कुटुंब आणि एकूण पोलिस दलावरही परिणाम होत आहे. पोलिस दलातील जुन्या आणि नव्याने येणाऱ्याही व्यसनाधीन पोलिसांची संख्या मोठी आहे. व्यसनामुळे नोकरीवर गंडांतर आलेल्यांची संख्याही वाढत आहे. याचा विचार करता, भरती आणि प्रशिक्षणापासूनच व्यसनमुक्तीसंबंधी प्रबोधन होणे आवश्‍यक आहे. 

गेल्या आठवड्यात एका मद्यपी पोलिस कर्मचाऱ्याने तालुका पोलिस ठाण्यात गोंधळ घातला. अर्थात ही काही पहिलीच घटना नाही. बहुतांश पोलिस ठाण्यांत असे व्यसनाधीन पोलिस आहेतच. दारू, तंबाखू, मावा, गुटखा यांसोबतच अन्य काही "नाद' असलेल्या पोलिसांची संख्याही कमी नाही. घरातील ताण-तणाव, नोकरीतील कटकटी, आजारपण यातून व्यसनाधीनता वाढीस लागते. पोलिस दलातील विषमताही याला कारणीभूत ठरते. तुटपुंज्या पगारावर कशीबशी गुजराण करणारा एक वर्ग आणि दुसऱ्या बाजूला गैरमार्गाने अफाट संपत्ती कमावलेला वर्ग अशी दुफळी पोलिसांमध्ये आहे. नगर जिल्ह्यात काही पोलिस कर्मचारीसुद्धा अशा मार्गाने कोट्यधीश झालेले आहेत. काही कर्मचाऱ्यांना मंगळवार बाजारातून भाजी घेणे परवडत नाही, तर काही कर्मचारी स्वतःच्या गाडीतून कुटुंबासह पुण्याला जाऊन मॉलमध्ये खरेदी आणि मौजमजा करून येतात. त्यांचे काहीच होत नाही आणि आपल्याला मात्र काहीच मिळत नाही, या नैराश्‍यातूनही व्यसनाधीनता वाढते.
व्यसनाधीन पोलिसांचे कामावरील लक्ष उडते. पोलिस ठाण्यात त्याला महत्त्वाच्या जबाबदाऱ्या दिल्या जात नाहीत. त्यामुळे नैराश्‍यात आणखी भर पडत जाते. बदली हे सुद्धा यामागील एक कारण असते. अशा पोलिसांचे कामाबरोबरच घराकडेही दुर्लक्ष होते. घरीही आणि नातेवाइकांकडूनही त्यांची हेटाळणी होते. मुले काय करतात, त्यांचे शिक्षण, नोकरी याकडे या पोलिसांचे दुर्लक्ष होते. त्यामुळे मुलेही वाईट मार्गाला लागतात. 



त्यामुळेच गुन्हेगारी कारवायांमध्ये पोलिसांची मुले पकडली जाण्याचे प्रकार वाढत आहे.
पोलिसांची नोकरी इतरांच्या तुलनेत ताणतणावाची आणि धावपळीची आहे, हे मान्य; पण त्यावर उतारा म्हणून व्यसन हा पर्याय नाही. मात्र, यासंबंधी योग्य प्रबोधन करण्यासाठी पोलिसांकडे यंत्रणाच नाही. यासाठी अधूनमधून शिबिरे घेतली जातात; मात्र बहुतांश पोलिसांना ती शिक्षा वाटते. पोलिस ठाण्यातील वातावरण, घरची स्थिती, कामातील त्रुटी, त्यासाठी वरिष्ठांची बोलणी, अशा वातावरणात पोलिसांना कायम राहावे लागते. यातून मार्ग काढण्यासाठी इतरांचे अनुकरण करीत मग व्यसनांची वाट धरली जाते. बऱ्याचदा पोलिसांना मद्यही फुकट मिळू शकते. मग फुकटची किती आणि केव्हा प्यायची, यावर नियंत्रणच राहात नाही. त्यामुळे पोलिस ठाण्यात कामावर असतानाच नव्हे, तर न्यायालयात साक्षीसाठी अगर आरोपी घेऊन जातानाही मद्यपान करून जाणारे पोलिस आढळतात. काम संपवून घरी परतताना तर हमखास मद्यपान केलेले असते. अशा पोलिसांवर एकदा का "मद्यपी' म्हणून शिक्का पडला, की तो पुसता पुसत नाही. सुरवातीला चोरून मद्यपान करणारे मग उघडपणे करू लागतात. त्यांच्याकडे पोलिस ठाण्यातील सहकारी, वरिष्ठ आणि घरातील मंडळीही दुर्लक्ष करू लागतात. या दुर्लक्षातून त्यांचे व्यसन अधिक घट्ट बनत जाते.

पोलिसांमध्ये व्यसनमुक्ती करण्यासाठी काहीच प्रयत्न झाले नाहीत, असे नाही. मात्र, त्याला मिळालेले यश अल्प आहे. याची अंमलबजावणी करणारे वरिष्ठ अधिकारी कसे आहेत, त्यावर याचे यश अवलंबून असते. काही अधिकारी यासाठी मनापासून प्रयत्न करतात, तर काही दुर्लक्ष करतात. यामध्ये सातत्य राहात नसल्याने एकदा सुटलेले व्यसन पुन्हा जडण्याचे प्रकारही घडतात. पोलिस दल असे व्यसनांमुळे पोखरले जाऊ लागल्याने आता भरती आणि प्रशिक्षणापासूनच यासाठीची चाळणी लावली पाहिजे. भरती करतानाच इतर निकषांबरोबरच व्यसन नसणे हासुद्धा निकष लावता येऊ शकेल. त्यानंतर प्रशिक्षण काळापासून या पोलिसांवर लक्ष देऊन व्यसनांचे दुष्परिणाम पटवून दिले पाहिजे. मुळात ते व्यसनाच्या आहारी जाणार नाहीत, यासाठी कामाच्या रचनेत, पद्धतीत आणि एकूणच वातावरणात सुधारणा केल्या पाहिजेत. त्याचा योग्य परिणाम साधण्यासाठी त्याला एखाद्या मोहिमेचे स्वरूप दिल्यास त्याची चर्चा होऊन नक्कीच थोडाफार परिणाम दिसून येईल.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत: