शुक्रवार, १३ जुलै, २०१२

"लोणीखाऊ' प्रवृत्ती

अपघातात मरण पावलेल्या व्यक्तींच्या अंगावरील दागिने आणि जवळच्या चीजवस्तू चोरीस जातात. रुग्णालयात दाखल अत्यवस्थ रुग्णांच्या दागिन्यांवरही असा हात मारला जातो. अपघातग्रस्तांना मदतीच्या नावाखाली पुढे आलेले हातच कधी असा प्रकार करतात, तर कधी उपचार करणारे आणि कायदा व सुव्यवस्था राखण्याची जबाबदारी असलेले हातही या चिखलाने माखतात... हे हात कोणाचे आहेत, यापेक्षा "मृताच्या टाळूवरचे लोणी खाण्या'ची ही प्रवृत्ती वाईट आहे. दुःखात असलेल्या नातेवाइकांचे या गोष्टींकडे लक्ष नसते, तर कधी लक्षात येऊनही बोलण्याची सोय नसते. त्यामुळे या प्रवृत्ती वाढत आहेत. 

जिल्हा रुग्णालयात उत्तरीय तपासणीसाठी आलेल्या एका महिलेच्या मृतदेहावरील दागिने लंपास केल्याचा गुन्हा शवागारातील कर्मचाऱ्यांविरुद्ध दाखल झाला आहे. अलीकडच्या काळातील अशा प्रकारचा हा पहिलाच गुन्हा असावा. हे प्रकरणही दडपले गेले असते; मात्र "सकाळ'मध्ये बातमी प्रसिद्ध झाल्यावर हा गुन्हा दाखल झाला. यामध्ये कोणाची बदनामी किंवा विटंबना करण्याचा "सकाळ'चा हेतू मुळीच नव्हता. अशा प्रवृत्ती उघडकीस आणून त्यांना आळा घालण्याचा प्रयत्न व्हावा, हाच यामागील हेतू. पोलिसांच्या बाबतीत अशा कृत्यांबद्दल उघडपणे संशय घेतला जातो. अनेक घटनांमध्ये पोलिसांनी हात मारलेलाही असतो, हे आता लपून राहिलेले नाही. आरोपींकडून जप्त केलेला मुद्देमाल, छाप्यात पकडलेला मुद्देमाल, पोलिस ठाण्यात जप्त करून ठेवलेल्या वस्तू यांना पाय फुटतात. यामध्ये पोलिसच हात मारतात, ही सर्वसामान्यांची समजूत खरी ठरावी, अशाच घटना वारंवार घडतात. मृतांच्या अंगावरील दागिने आणि चीजवस्तू चोरणे हे या सर्वांहून घृणास्पद म्हणावे लागेल. अपघात झाल्यावर आसपासचे नागरिक तेथे पोचतात. त्यांच्यात जर कोणी अशा प्रवृत्तीचे असेल, तर एखाद-दुसऱ्या प्रकरणात पोलिस येण्याच्या आत वस्तू लांबविण्याचे प्रकार घडतात. मात्र, बहुतांश प्रकरणांत नागरिक पोलिसांची प्रतीक्षा करतात.

पोलिस आल्यावर मोठ्या विश्‍वासाने त्यांच्यावर मृत, जखमी आणि त्यांच्याकडील चीजवस्तूंची जबाबदारी सोपविली जाते. त्यांच्याकडूनच विश्‍वासघात होण्याचे प्रकार घडतात. बाहेरगावच्या अपघातग्रस्तांच्या बाबतीत तर हमखास असे प्रकार घडतात; कारण त्यांचे नातेवाईक यायला वेळ लागतो. नातेवाईक आल्यावर पोलिस अपघातग्रस्तांकडे सापडलेल्या किरकोळ वस्तू त्यांच्याकडे सुपूर्द करून सही घेतात. "नीट पाहून घ्या', असे अनेकदा सांगत, जणू सर्व मौल्यवान वस्तू प्रामाणिकपणे परत करीत असल्याचा आव आणतात. पोलिसांची ही चलाखी नातेवाइकांच्याही लक्षात आलेली असते; मात्र तो प्रसंग वाद घालण्याचा नसतो. अपघातस्थळी पोलिस नेहमीच उशिरा पोचतात, अशी ओरड केली जाते. ती काही अंशी खरीही आहे. अर्थात, त्यामागील इतर अडचणीही समजून घेतल्या पाहिजेत. मात्र, घटनास्थळी गेल्यावर पोलिस काय "दिवे लावतात' हेही आता सर्वांना कळून चुकले आहे. काही पोलिस अधिकारी आणि कर्मचारी प्रामाणिकपणे अपघातग्रस्तांना मदत करतात. स्वतःच्या खिशातून खर्च करून मदत करणारे पोलिसही आहेत; मात्र काहींच्या "लोणीखाऊ' वृत्तीमुळे त्यांचेही काम झाकोळले जाते. नगरमध्ये दाखल झालेल्या गुन्ह्यातून जिल्हा रुग्णालयातील कर्मचाऱ्यांकडे संशयाची सुई जात असली, तरी यातून इतर घटकांनीही बोध घेतला पाहिजे. सर्वांत महत्त्वाचे म्हणजे, प्रसंग अवघड असला तरी नातेवाइकांनी याबद्दल तक्रार केली पाहिजे. त्याशिवाय अशा प्रवृत्तींना आळा बसणार नाही. 

लोणीखाऊ प्रवृत्तींसोबतच वाटमारी करणारेही कमी नाहीत. बसस्थानक आणि रेल्वेस्थानकांत चालणारी पाकीटमारी पोलिसांच्या सक्रिय आशीर्वादाशिवाय चालूच शकत नाही. आता तर त्याही पुढे जाऊन, पोलिसांचा त्यामधील सहभाग उघड होत आहे. दौंडचे काही पोलिस नगरच्या रेल्वेस्थानकापर्यंत येतात. प्रवाशांच्या बॅगा तपासणीचे नाटक करीत "चिरीमिरी'ही मिळवितात. शिवाय, पुढे गेल्यावर नेमक्‍या त्याच बॅगा चोरीला गेल्याचे लक्षात येते, असा अनुभव नेहमी प्रवास करणारे रेल्वेप्रवासी सांगतात. त्यामुळे प्रवासात पोलिसांवर तरी विश्‍वास कसा ठेवायचा, हा प्रश्‍न निर्माण झाला आहे. यामुळे एकूणच पोलिसांची प्रतिमा डागाळत आहे. त्यामुळे प्रामाणिक पोलिसांनी अशा वाईट प्रवृत्तींना खड्यासारखे वेचून दूर केले पाहिजे. त्यासाठी त्यांना जनतेची साथ नक्की मिळेल. नगरमध्ये दाखल झालेल्या गुन्ह्याच्या निमित्ताने याची सुरवात झाली, असे म्हणावे लागेल.                                                         (सकाळ)

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत: