रविवार, १५ जानेवारी, २०१२

पुणेकरांना फसवणारे आहेत तरी कोण?

लॅपटॉपच्या नावाखाली दगड दिला, आयफोनऐवजी साबणाची वडी दिली, पॉलिश करण्याच्या बहाण्याने दागिनेच पळवून नेले, सीआयडी असल्याचे सांगून दागिने लांबविले, शेअर्समध्ये गुंतवणुकीच्या नावाखाली फसवणूक... अशा घटना पुण्यात वाढत आहेत. पाच रुपयांच्या कोथिंबिरीची जुडी तीन वेळा पाहून घेणारे, वर्तमानपत्र विकत घेताना त्यामध्ये सर्व पाने आहेत का, हे तपासून पाहणारे चोखंदळ पुणेकर हजारो आणि लाखो रुपयांना एवढ्या सहजासहजी फसतात कसे, हा खरा प्रश्‍न आहे. स्वस्तातील वस्तूंच्या मोहामुळेच फसले जाणाऱ्यांचे प्रमाण अधिक आहे.

पोलिसांचा वचक नाही

ठगबाजीचे गुन्हे पुण्यात नवीन नसले, तरी अलीकडे त्यांचे स्वरूप बदलत आहे. महिला, वृद्ध, अल्पशिक्षित नागरिकांना गंडा घालणारे ठग तेव्हाही होते. आता उच्चशिक्षित नागरिकही या फसवणुकीचे बळी ठरत आहेत. गेल्या आठवड्यात अभियंत्यांना लॅपटॉप विक्रीच्या नावाने गंडा घालण्याच्या घटना लागोपाठ घडल्या. अशा घटनांमधील आरोपी पकडले जाण्याचे आणि त्यांना शिक्षा होण्याचे प्रमाण खूपच कमी आहे. त्यामुळे त्यांच्यावर पोलिसांचा वचक राहिलेला नाही, हे यामागील प्रमुख कारण असले तरी नागरिकांचा गहाळपणा तेवढाच कारणीभूत आहे. आसपासच्या घटनांकडे दुर्लक्ष करण्याची, अडचणीत सापडलेल्याच्या मदतीला न धावण्याची वृत्तीही वाढत आहे. माणुसकीच्या नात्यातील हा कोरडेपणाही चोरट्यांच्या पथ्यावर पडतो.


स्वस्तातील वस्तूंचा मोह

अशी फसवणूक होण्यामागे स्वस्तातील वस्तू मिळविण्याचा मोह हेही एक प्रमुख कारण आहे. लॅपटॉप रस्त्यावर नव्हे; दुकानांत मिळतो, हे माहिती असूनही रस्त्यावर भेटलेल्या अनोळखी व्यक्तीकडून स्वस्तात मिळणारा लॅपटॉप खरेदी करण्याच्या मोहामुळेच सुशिक्षित नागरिकही फसवणुकीचे कसे बळी ठरतात, हे नुकत्याच घडलेल्या घटनांवरून दिसून आले. वाहनतळावर मोटार उभी करीत असलेल्या अभियंत्याजवळ स्कूटरवरून दोघे येतात. त्यांच्याकडील लॅपटॉप आणि आयफोन दाखवितात. त्या वस्तू अभियंत्याला आवडतात आणि स्वस्तात मिळत असल्याने घ्यायची तयारीही होते. जवळ पैसे नसतात. त्यावर ते विक्रेतेच एटीएम कार्ड आणि क्रेडिट कार्डचा पर्याय सुचवितात. वस्तूच्या मोबदल्यात खरेदी करण्यासाठी त्यांच्यासोबत मॉलमध्येही जातात. एवढे करून प्रत्यक्षात त्या अभियंत्याच्या माथी दगड भरलेली लॅपटॉपची बॅग आणि साबणाच्या वड्या ठेवलेले मोबाईलचे पाऊच मारले जाते. चोर निघून गेल्यावर आपली फसवणूक झाल्याचे लक्षात येते.


अविचारीपणा चोरट्यांच्या पथ्यावर

अशा घटनांमध्ये चोरट्यांची हुशारीही लक्षात घेतली पाहिजे. ते एकट्या आणि घाईत असलेल्या व्यक्तीला गाठतात. शिवाय तो लॅपटॉप घेऊ शकणार असेल, त्याच्याकडे एटीएम; तसेच क्रेडिट कार्ड असेल, असे सावजच ते हेरतात. त्याला दुसऱ्या कोणाचे मत घ्यायला संधी मिळू नये, वस्तू ताब्यात देताना घाई करून त्याने ती व्यवस्थित पाहू नये, याची पुरेपूर दक्षता चोरटे घेतात. स्वस्तात वस्तू मिळत आहे, त्यामुळे फार विचार करायला नको, अशाच विचारात असलेला कोणीही यामध्ये फसला जाऊ शकतो. अशावेळी महागड्या वस्तू स्वस्तात का विकल्या जात आहेत, त्यांनी आपल्यालाच का गाठले, आणखी कोणाला बोलावून वस्तूंची खात्री करून घ्यावी का, वस्तू नीट तपासून घ्याव्यात का, असा विचार केला जात नाही. हे चोरट्यांच्या पथ्यावर पडते.


मोहच ठरतोय फसवणुकीचे कारण

दागिन्यांना पॉलिश करून देण्याच्या घटनाही अशाच घडतात. मुळात सोन्याच्या दागिन्यांना आणखी पॉलिश ते काय करायचे. तरीही नागरिक विशेषतः महिला त्यासाठी तयार होतात. यातील आरोपीही अशा गुन्ह्यांसाठी महिला किंवा ज्येष्ठ नागरिकांची निवड करतात. दागिन्यांना पॉलिश करून देतो, असे सांगून दागिने घेतात. कसली तरी पावडर लावण्याचा बहाणा करून हातचलाखीने दागिने लांबवितात. त्यानंतर ते घरातील प्रेशर कुकरमध्ये ठेवल्याची बतावणी करून तो गॅसवर ठेवायला सांगतात. एक शिट्टी झाली, की कुकरमधून बाहेर काढा, असे सांगून निघून जातात. आपल्याला वाटते दागिने कुकरमध्ये आहेत; पण चोरट्यांनी ते केव्हाच लांबविलेले असतात. शिट्टी झाल्यावर जेव्हा ही गोष्ट उघड होते, तेव्हा चोरटे दूर निघून गेलेले असतात. येथेही दागिने आणखी उजळ करण्याचा मोह फसवणुकीचे कारण ठरतो.


सामान्यांच्या भाबडेपणाचा गैरफायदा

नागरिकांच्या संरक्षणासाठी पोलिस असतात; पण पोलिसांच्या नावाचा गैरवापर करून फसवणूक करण्याचे प्रकारही घडतात. यामध्ये वृद्ध महिलांना "टार्गेट' केले जाते. पोलिसांसारखी शरीरयष्टी असलेले दोघे रस्त्यात उभे राहतात. समोरून आलेल्या वृद्ध महिलेला अडवितात. आपण पोलिस किंवा सीआयडी अधिकारी असल्याचे सांगून पुढे दंगल सुरू आहे अगर खून झाल्याने तपासणी सुरू आहे, अशी बतावणी करतात. जुन्या लोकांमध्ये अद्यापही पोलिसांबद्दल भीती असते. त्यामुळे आपण निरपराध आहोत, हे माहिती असूनही पोलिसाचे नाव ऐकले तरी हे लोक अर्धे खचून जातात. मग हे चोरटे आपण मदत करत असल्याची बतावणी करून गळ्यातील दागिने सुरक्षित राहावेत, यासाठी काढून ठेवण्याचा सल्ला देतात. ते काढून पिशवीत ठेवून देण्यासाठी मदतीचा बहाणा करीत हातचलाखीने दागिने काढून घेत रिकामी पिशवीच त्या महिलेच्या हाती दिली जाते. चोरटे निघून गेल्यावर फसवणूक झाल्याचे लक्षात येते. हा सगळा प्रकार भर रस्त्यात सुरू असतो. मात्र, आसपासचे नागरिक याकडे लक्ष देत नाहीत किंवा ती महिलाही कोणाला मदतीला बोलावत नाही. त्यामुळे चोरट्यांचे फावते.


किलोभर तांदळासाठी दागिने गहाण

पुण्यात आणखी फसवणुकीचा एक प्रकार रमजान महिन्यात पाहायला मिळतो. रस्त्यात थांबलेला अगर घरी आलेल्या व्यक्ती गरिबांना मदत वाटप सुरू असून तुम्ही चला, असे सांगून महिलांना तिकडे जाण्यास भाग पाडतो. महिला मदत घेण्यासाठी निघाल्यावर गळ्यातील दागिने काढून ठेवा, नाहीतर तुम्ही गरीब दिसणार नाहीत आणि वस्तू मिळणार नाही, असे सांगतात. किलोभर तांदळासाठी महिलाही खुशाल आपल्या गळ्यातील हजारो रुपयांचे दागिने काढून त्या अनोळखी व्यक्तीजवळ देतात. नंतर तांदूळही मिळत नाही आणि दागिनेही गेलेले असतात.

पोलिस ठाण्यात असे अनेक गुन्हे दाखल होत असतात. त्याच्या बातम्याही प्रकाशित होतात, तरीही नागरिक त्यातून बोध घेत नाहीत.

पोलिस ठाण्यात दाखल झालेल्या सर्वच घटनांतील आरोपी पकडले जातात असे नाही आणि पकडले गेलेल्यांकडून मुद्देमाल मिळतोच किंवा शिक्षा होते असेही नाही. त्यामुळे या घटना सुरूच राहतात. त्यामुळे प्रत्येकाने आपली दक्षता घ्यावी. मुख्य म्हणजे फुकटातील आणि स्वस्तातील वस्तूंचा मोह सोडलेलाच बरा.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत: