सोमवार, १६ नोव्हेंबर, २००९

अशी दक्षता अन्‌ तत्परता हवी

सर्वसामान्य माणूस हादेखील वर्दीविना पोलिस आहे. त्यांचाही पोलिसांच्या कामात सहभाग हवा असतो, असे पोलिस दलातर्फे नेहमी सांगितले जाते. मात्र, जेव्हा पोलिस सामान्य माणसाच्या भूमिकेत असतो (म्हणजे रजेवर किंवा काम संपवून घरी जाताना), तेव्हा त्यांचे वर्तन कसे असते, हे सर्वांना माहिती आहे. आपली ओळख लपविण्यासाठी अंगावरील खाकी वर्दीही बहुतांश पोलिस झाकून घेतात. रस्त्यात काही प्रसंग घडल्यास आपण पोलिस असल्याचे कळाल्यावर लोक आपल्यामागे लागतील. त्यामुळे ही नस्ती झंजट नको, म्हणून खाकी वर्दीवर साधा शर्ट चढवून फिरणारे अनेक पोलिस पाहायला मिळतात. अर्थात जेथे फायद्याची गोष्ट आहे, तेथे आपली ओळखच नव्हे, तर खाक्‍या दाखविणारेही अनेक महाभाग असतात.

अशा परिस्थितीत नगरमध्ये दोन दिवसांपूर्वी एक घटना घडली. नगरच्या शहर वाहतूक शाखेत काम करणारे अजिनाथ महानवर यांनी रजेवर असताना आणि मुख्य म्हणजे आरोपी पकडणे हे त्यांच्या ठाण्याचे काम नसतानाही रस्तालुटीतील दोन महत्त्वाचे आरोपी पकडून दिले. त्यासाठी त्यांना युक्तीही करावी लागली. आरोपींकडे शस्त्रे आहेत, याची माहिती असूनही त्यांनी हे धाडस केले. ते ज्या वाहनात बसले होते, त्यामध्येच आरोपीही होते. आरोपींना त्यांच्याबद्दल संशय आल्याने त्यांनी तत्परतेने ते वाहन सोडले; पण नगरमधील आपल्या वरिष्ठांना कळवून आरोपी पकडण्यासाठी महानवर यांनी सापळा लावला. साध्या वेषात फिरणारा, रजेवर असणारा पोलिस असे काही करील, याची सुतराम शक्‍यता आरोपींना वाटली नसावी. त्यामुळे ते पकडले गेले. एकूणच, या प्रकरणात महानवर यांची तत्परता आणि शिताफी कामाला आली.

पोलिस जेव्हा लोकांना मदतीचे आवाहन करतात, तेव्हा ते स्वतः कसे वागतात, याकडे जनतेचे लक्ष असते. जनतेने पकडून दिलेले आरोपी जुजबी कारवाई करून सोडून देणे, फिर्यादीने आरोपींची नावे देऊन व त्यांची पुरेपूर माहिती असूनही त्यांना अटक करण्यात चालढकल करणे, आपल्यासमोर गुन्हा घडत असतानाही त्याकडे दुर्लक्ष करणे, अशीच बहुतांश पोलिसांची वृत्ती असते. त्यामुळे एकूणच पोलिस दलाकडे पाहण्याचा लोकांना दृष्टिकोन बदलत आहे. त्यामुळे अशा पोलिसांना मदत कशाला करा, अशीही भावना जनतेत वाढते आहे. त्यामुळे पोलिसांच्या कामातील जनतेचा सहभाग कमी होत आहे. पोलिसांना माहिती मिळण्याचे प्रमाण कमी होत आहे. पोलिसांनी नियुक्त केलेले खबरेही त्यांना खरी माहिती देतीलच याची शाश्‍वती आता राहिलेली नाही. उलट, पोलिसांच्या जवळिकीचा फायदा करून घेणारे खबरेच वाढत आहेत. म्हणजे ज्यांच्या बळावर तपास करायचा, त्या खबऱ्यांचे जाळेही असे कमकुवत होत आहे.

या सर्वांमागे पोलिसांची बेफिकीर वृत्ती हेही एक कारण आहे. प्रत्येक नागरिक हा वर्दीविना पोलिस आहे, असे जेव्हा पोलिस म्हणतात, त्या वेळी वर्दीतील पोलिसांनी वर्दी असताना आणि वर्दी नसतानाही जबाबदारीने वागून जनतेपुढे वस्तुपाठ ठेवला पाहिजे. वर्दीतील पोलिस हाही शेवटी माणूसच आहे, असे सांगताना, वर्दी नसताना पोलिसांनी त्यांना अपेक्षित असलेल्या सामान्य माणसासारखे वागले पाहिजे. तेव्हाच खऱ्या अर्थाने त्यांना जनतेचा विश्‍वास संपादन करता येईल.

४ टिप्पण्या:

अनामित म्हणाले...

श्री विजयसिंह होलम : आपला ब्लॉग खूप चांगला आणि एका अगदी वेगळ्या विषयावर आहे. तो तुमच्यासारखाच एखादा माणूस हाताळू शकेल.

विषय असा आहे की त्यावर आम्हां त्या विषयाबद्दल अज़ाण असणार्‍या वाचकांना फार प्रतिक्रिया देता येत नाहीत. पण म्हणून त्याचं मूल्य कमी होत नाही.

Kanchan Karai (Mogaraafulalaa) म्हणाले...

पोलिसांचा असा हा पहिला वहिला, एकमेव ब्लॉग असावा. स्टार माझ्याच्या ब्लॉग स्पर्धेत उल्लेखनीय यश मिळाल्याबद्द्दल आपलं अभिनंदन!

PRAKASH K. THUBE म्हणाले...

विजय, सुन्दर ब्लॊग. तुलाया ब्लॊगबद्दल मिळालेल्या पारितोषिकाबद्दल अभिनन्दनही.
... प्रकाश ठुबे , अपर जिल्हाधिकारी, नाशिक.

Deepak म्हणाले...

स्टार माझ्याच्या ब्लॉग स्पर्धेत यश मिळाल्याबद्द्दल मन:पुर्वक – हार्दीक -अभिनंदन – शुभेच्छा!!