
बीड जिल्ह्यातील परळी येथील दोघी बहिणी आईविना वाढत होत्या. हॉटेलमध्ये काम करून त्यांचे वडील त्यांचा सांभाळ करीत होते. त्यांचे शिकण्या खेळण्याचे वय, पण घरची आर्थिक स्थिती बेताची असल्याने त्यांना सुखाचे दिवस येत नव्हते. तशातच त्यांचे एक लांबचे नातेवाईक त्यांना भेटले. मुलींचा सांभाळ करतो, म्हणून त्या दोघींना ते घेऊन गेले; पण नंतर घडले ते भलतेच.
त्या नातेवाइकाने दोघी मुलींना जामखेडमधील (जि. नगर) एका कुंटणखान्यात विकले आणि त्या मुलींचे आयुष्यच काळवंडून गेले. त्यांना त्यांच्या वडिलांशीही संपर्क करणे शक्य होत नव्हते. काही महिने तेथे ठेवल्यानंतर कुंटणखान्याच्या मालकिणीने त्यांना शेवगावमध्ये आणले. तेथेही त्यांच्याकडून वेश्या व्यवसाय करून घेतला जात होता. सुटकेसाठी त्यांचे प्रयत्न सुरू होते, तर दुसरीकडे त्यांचे वडीलही त्यांचा शोध घेत होतेच. एके दिवशी संधी मिळताच मोठ्या मुलीने आपल्या वडिलांशी संपर्क करून आपण शेवगावमध्ये असल्याचे कळविले.
तेथून पुढे त्या पित्याची धडपड सुरू झाली. कसेबसे पैसे जमा करून ते शेवगावमध्ये आले. तेथे आल्यावर आपल्या मुलींची स्थिती त्यांना समजली. कुंटणखान्यातील लोक दाद देत नाहीत, म्हटल्यावर त्यांच्या सुटकेसाठी पित्याने पोलिसांकडे धाव घेतली; पण अशावेळी मदत करतील ते पोलिस कुठले? पोलिसांनी त्यांना हाकलून लावले. पैशाशिवाय काम होणार नाही, हे लक्षात आल्यावर पित्याने त्यासाठी धावपळ सुरू केली. त्यांच्या सुदैवाने ही माहिती पाथर्डीच्या नेताजी सुभाषचंद्र बोस प्रतिष्ठानच्या कार्यकर्त्यांना कळाली. मग त्यांनी यासाठी पाठपुरावा सुरू केला. मात्र, पोलिस त्यांनाही दाद देईनात. त्यामुळे त्यांनी वृत्तपत्रांकडे धाव घेतली. "सकाळ'च्या बातमीदाराला ही माहिती कळाल्यावर त्याची बातमी प्रकाशित करण्यात आली. त्यामुळे पोलिस यंत्रणा खडबडून जागी झाली, मात्र तीही उलट्या दिशेने. आता हे प्रकरण आपल्यावर शेकणार, हे लक्षात आल्यावर पोलिसांनी असे काही घडलेच नाही, असा बनाव करण्याचा प्रयत्न केला. आपल्या हस्तकांमार्फत त्या मुलींचे प्रतिज्ञापत्र तयार करून घेण्यात आले. "आम्ही येथे स्वेच्छेने आलो असून, येथे धुण्याभांड्याचे व घरकाम करीत आहोत, आमची कोणाबद्दलही तक्रार नसून आपले वडील मुद्दाम बदनामी करीत आहेत,' असे त्यामध्ये लिहून घेतले. एवढेच नव्हे तर वृत्तपत्रांकडे बातम्यांचा खुलासा आणि सोबत कारवाईचा इशारा देणारे पत्रही त्या मुलींच्या नावानेच पाठवून दिले.
मात्र, प्रतिष्ठानचे कार्यकर्ते आणि वृत्तपत्रांनी हे प्रकरण लावून धरले. शिवसेना महिला आघाडीच्या आमदार नीलम गोऱ्हे यांनीही यामध्ये लक्ष घालून वरिष्ठ अधिकाऱ्यांना पत्र लिहिले. नगरच्या "स्नेहालय' संस्थेचे कार्यकर्तेही यासाठी सरसावले. त्यामुळे वरिष्ठ पातळीवरूनच याची चौकशी सुरू झाली. त्या दोन्ही मुलींना नगरला आणून वरिष्ठ अधिकाऱ्यांसमोर त्यांची चौकशी करण्यात आली. आधार मिळतोय हे लक्षात आल्यावर मुली खरे बोलू लागल्या. त्यांनी भोगलेल्या नरकयातनांची माहिती ऐकून सर्व जण अवाक झाले. आपल्याला पुन्हा शेवगावला अगर वडिलांकडे पाठवू नये, या अटीवर त्या मुली बोलायला तयार झाल्या. त्यामुळे त्यांना स्त्री आधार केंद्रात पाठविण्यात आले. कुंटणखान्याची मालकीण, दलाल आणि इतर साथीदारांना अटक करण्यात आली.
आता त्या आरोपींची आणि बनवाबनवी करणाऱ्या पोलिसांचीही चौकशी सुरू आहे.
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा