रविवार, २५ जानेवारी, २००९

कधी होणार पोलिस स्मार्ट मित्र?


पोलिस दलाच्या आधुनिकीकरणाच्या अनेक घोषणा झाल्या असल्या तरी प्रत्यक्षात पोलिसांमध्ये फारसा फरक पडलेला नाही. शहरे वाढली, लोकसंख्या वाढली, मोठ्या इमारती झाल्या, इतर सरकारी कार्यालयांचे स्वरूप बदलते आहे, पण पोलिस आणि पोलिस ठाणी आहेत तशीच आहेत. मोडकळीस आलेल्या इमारती, जुनाट व कासवगतीने धावणारी अन्‌ मध्येच बंद पडणारी वाहने, अशी पोलिस यंत्रणेची स्थिती आहे. समाज बदलला, गुन्हेगारीची पद्धत बदलली, संपर्काची साधने बदलली पण तंत्रज्ञानातील खूप थोडे बदल पोलिस दलात आले. अलीकडे आधुनिकतेचे वारे पोलिस दलात येऊ घातले असले तरी ते फारसे रुजलेले नाही. मुळात पोलिस यंत्रणेतील महत्त्वाचा घटक असलेला पोलिस कर्मचारीच उपेक्षित आहे. त्यांची शैक्षणिक पात्रता, त्यांना मिळणारा पगार, त्यांच्यावर असलेला कामाचा ताण, त्यांना देण्यात येणारी घरे, इतर सुविधा आणि त्यांचे आरोग्य याकडे अक्षम्य दुर्लक्ष होत आहे. पोलिसांचे काम परिणामकारक व्हावे, आपल्याला न्याय मिळावा, घटना घडली की, यंत्रणा हलावी, असे प्रत्येकालाच वाटते. मात्र, पोलिसांच्या अडचणींचा कोणी विचार करीत नाही. सार्वजनिक उत्सव लोकांनी साजरे करायचे आणि त्यांनी ते शिस्तीत साजरे करावेत म्हणून पोलिसांनी बंदोबस्त ठेवायचा, गुन्ह्यांचा तपास पोलिसांनी करायचा, मोर्चा, आंदोलनांना समोरे पोलिसांनी जायचे, नेत्यांची बडदास्त पोलिसांनीच ठेवायची असाच शिरस्ता आपल्याकडे रूढ झाला आहे. आधीच वाढत्या कामाच्या ताणाने त्रस्त झालेली ही यंत्रणा वाढीव कामामुळे आणखी अडचणीत येत आहे.
पोलिस ठाण्यात येणारा प्रत्येक जण पिडलेला, त्रस्त झालेला असतो. आपल्याला लगेच न्याय मिळावा, पोलिसांनी तातडीने कारवाई करावी, असे त्याला वाटते. पोलिसांना मात्र अनेकदा ते शक्‍य नसते. मात्र, ही गोष्ट त्याला पटवून देण्याची कलाही पोलिसांना अवगत नसते. त्यामुळे तक्रारदार आणि पोलिस यांच्यात वाद होतात. पोलिसही त्याच्यावरच तोंडसुख घेतात, इतर ठिकाणचा राग त्याच्यावर काढला जातो. समोरचा माणूस चिडतो, वरिष्ठांकडे तक्रार जाते, संघटनांची आंदोलने होतात, त्यातून पोलिस दलाची आणखी बदनामी होते.
अशा विचित्र अवस्थेत सापडलेले पोलिस जनतेचे स्मार्ट मित्र कसे होणार? राजकारणी आणि गुन्हेगार यांच्याशी पोलिसांचे असलेले संबंध हाही एक चर्चेचा विषय असतो. पोलिसांकडून या व्यक्तींना खास वागणूक मिळते, असा आरोप होतो. त्यात काही प्रमाणात तथ्य आहे. त्याची कारणेही तशी विचित्र आहेत. राजकीय लोकांचा पोलिसांच्या कामात हस्तक्षेप असतो. पोलिसांच्या बढत्या आणि बदल्या त्यांच्या हातात असतात. राजकारणी लोक राजकारणासाठी गुन्हेगारांनाही पाठीशी घालतात. त्यामुळे या दोघांशीही पोलिसांना चांगले संबंध ठेवावे लागतात. सामान्य माणसाचे काय? त्याचे पोलिसांशी संबंध दुरावलेलेच असतात. सामान्य माणसाची पोलिसांना तपासात मदत होत नाही, साक्षीदार म्हणून त्यांच्यापैकी कोणी पुढे येत नाही. त्यामुळे अनेकदा पोलिसांना आपली हक्काची माणसे म्हणून बेकायदा धंदे करणाऱ्यांनाच साक्षीदार म्हणून बोलावून आणावे लागते. अर्थात, अशा खटल्यांचे पुढे जे व्हायचे तेच होते. मात्र, अडचणीत मदतीला धावून येणारा, दरमहा वरकमाई मिळवून देणारा प्रसंगी राजकारणी लोकांना सांगून हवे ते काम करून देणारा म्हणून बेकायदा धंदेवाल्यांशी पोलिसांचे जमते. पोलिसांची ही मानसिकता कशी बदलणार, शिकलेली नवी पिढी पोलिस दलात दाखल होत आहे, पण त्यांना शिकविणारे जुनेच आहेत, वातावरणही तेच आहे. त्यामुळे त्यातूनही स्मार्ट पोलिस कसे घडणार? हा खरा प्रश्‍न आहे.

1 टिप्पणी:

अनामित म्हणाले...

dear vijay. best aricals