गुरुवार, ३ जानेवारी, २०१३

तोच खरा रेजिंग डे!

पो लिस ठाण्यात तक्रार द्यायला गेलेल्याच्याच अंगावर खेकसणारे, त्याची तक्रार नीट ऐकून न घेणारे, त्याचीच उलटतपासणी घेणारे आणि आणखी काही काही... अशीच सर्वसामान्यांच्या मनात पोलिसांबद्दलची प्रतिमा असते. सामान्यांपेक्षा राजकारण्यांना प्राधान्य देणारे, "दादा' लोकांमध्ये रमणारे पोलिस आता आठ दिवस तरी सामान्यांचा विचार करणार आहेत. या वर्षीपासून दोन जानेवारी हा दिवस पोलिस दलाचा स्थापना दिन म्हणून साजरा करण्यात येणार आहे. त्यानिमित्त दोन ते आठ जानेवारी या काळात पोलिसांनी जनतेत मिसळून आपल्या कामाची ओळख करून द्यावी, जनतेशी संपर्क सुधारावा, अशी संकल्पना राज्याचे पोलिस महासंचालक संजीव दयाळ यांनी मांडली आहे. तसा आदेशच त्यांनी राज्यातील सर्व पोलिसांना दिला आहे.
त्यामुळे या आदेशाचे पालन करण्यासाठी तरी किमान पुढील आठ दिवस पोलिस आपल्याशी सौजन्याने वागतील, अशी अपेक्षा सर्वसामान्य नागरिकांनी करण्यास हरकत नाही. या काळात आयोजित केलेल्या कार्यक्रमांना नागरिकांनी अवश्‍य गेले पाहिजे. कदाचित त्यातून परस्परांबद्दलचे गैरसमज दूर होऊन संबंध सुधारण्यास मदत होऊ शकेल. सामान्य माणूस पोलिसांपासून दुरावत चालला आहे. पोलिसांबद्दल त्यांच्या मनात विश्‍वास राहिलेला नाही, हे त्यामागील एक कारण आहे. रोजच्या जीवनात पोलिसांकडून जो अनुभव येतो, त्यावरून त्याचे मत बनते. सामान्य नागरिकांसमक्ष राजकारणी आणि त्यांच्या कार्यकर्त्यांना वेगळी वागणूक दिली जाते, तेव्हा सामान्य माणसाचे पोलिसांबद्दल वाईट मत तयार होते. तसेच सामान्य माणूस जेव्हा पोलिस ठाण्यात फिर्याद द्यायला जातो, त्या वेळी ती सहजासहजी नोंदवून घेतली जात नाही. एक तर त्याला वरिष्ठांकडे जावे लागते किंवा राजकारण्यांचा वशिला लावावा लागतो. दुसऱ्या बाजूला, राजकीय मंडळींच्या राजकीय भांडणांच्या तक्रारी जशाच्या तशा नोंदवून घेतल्या जातात. पोलिस ठाण्यात सामान्य माणसांपेक्षा राजकारणी, त्यांचे कार्यकर्ते, दलाल, धंदेवाले, पंटर यांचाच वावर जास्त असतो. ज्या सामान्यांच्या सुरक्षेसाठी पोलिस आहेत, तोच घटक या यंत्रणेपासून दुरावला आहे.
पोलिस-जनता संबंध बिघडण्यास हे दोन्ही घटक कारणीभूत आहेत. पोलिसांबद्दलचे गैरमसज वाढल्याने सामान्य माणूस पोलिसांपासून दुरावला आणि जेव्हा आपल्याला मदत लागते, तेव्हा सामान्य माणसापेक्षा आपण जोपासलेले "मित्र'च मदतीला येतात, असा पोलिसांचा अनुभव असतो. त्यामुळे तेही त्यांनाच जवळ करतात. एखाद्या गुन्ह्यात पोलिसांना जेव्हा माहिती हवी असते, पंच, साक्षीदार हवे असतात, त्या वेळी कोणीही सामान्य नागरिक पुढे येत नाही. पोलिस समोरच्याला सामील होऊन आपल्यालाच अडचणीत आणतील, अशी शंका त्यांना वाटत असते. त्यामुळे अशा कामांसाठी पोलिसांना आपल्या "हक्का'च्या माणसांवरच अवलंबून राहावे लागते. तेच ते साक्षीदार अनेक गुन्ह्यांत असतात. त्यामुळे न्यायालयात खटले टिकत नाहीत, साक्ष फिरविण्याचे प्रकार घडतात आणि आरोपी सुटतात. तेव्हा पोलिसांनीच केस "लूज' ठेवून आरोपींना मदत केली, अशी चर्चा सामान्य माणसांत परसते आणि दुरावा वाढतच जातो.
यातूनच एकमेकांना मदत न करण्याची वृत्ती वाढली आहे. वास्तविक, हे दोन्ही घटक एकत्र आले, एकमेकांना मदत करू लागले, तर राजकारणी, दादा आणि त्यांच्या पंटर लोकांचे अवघड होऊन जाईल. त्या लोकांची पोलिस मदत घेतात, ती केवळ नाइलाज म्हणून. कारण त्यांच्यापुढे दुसरा पर्याय नसतो. आता स्थापनादिनाच्या निमित्ताने आदेशाचे पालन म्हणून का होईना, पोलिस जनतेमध्ये मिसळणार आहेत. तेव्हा जनतेने त्यांना समजून घ्यावे. एकमेकांच्या अडचणी सांगितल्या जाव्यात, आपसांतील संबंध सुधारण्याचा प्रयत्न करावा. या दोघांमधील विसंवादच अन्य घटकांच्या पथ्यावर पडणारा आहे. त्याचा फटका पोलिस आणि जनतेलाही बसत असतो. त्यामुळे दीर्घकालीन विचार करता पोलिस व सामान्य जनतेचा सुसंवाद हवाच. त्याची सुरवात या उपक्रमातून झाली, तर खऱ्या अर्थाने हा "रेजिंग डे' ठरेल. 

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत: