गुरुवार, २१ ऑक्टोबर, २०१०

बॅंकांना लुटणारे नवे "दरोडेखोर'

रात्री तिजोरी फोडून अथवा दिवसा कर्मचाऱ्यांना शस्त्राचा धाक दाखवून बॅंका लुटणाऱ्या दरोडेखोरांच्या टोळ्या पूर्वीपासूनच कार्यरत आहेत; मात्र बनावट कागदपत्रांच्या आधारे वाहन कर्जे घेऊन बॅंकांना लाखो रुपयांना गंडा घालणारी एक नवीनच टोळी नगर जिल्ह्यात तयार झाली आहे. पारनेर तालुक्‍यातील रांजणगाव मशीद येथील विनोद जवक याच्या टोळीने आतापर्यंत नगर, पुणे व नाशिक जिल्ह्यांतील बॅंकांना अशा पद्धतीने लुटले आहे. आतापर्यंत चार बॅंकांची एकूण 66 लाखांची फसवणूक झाल्याचे उघडकीस आले आहे. या बॅंका कशा फसल्या, त्यांच्यापैकी कोणी टोळीला मदत करीत आहे का, या प्रश्‍नांची उत्तरे अद्याप मिळालेली नाहीत.

विनोद जवक हा या टोळीचा सूत्रधार. वाहन कर्जासाठी बनावट कागदपत्रे बॅंकेत सादर करून कर्ज घ्यायचे आणि नंतर त्याची परतफेड करायची नाही, अशी त्याची गुन्हे करण्याची पद्धत आहे. त्यासाठी त्याने मोहन किसन जवक, बाळासाहेब भाऊसाहेब जवक यांच्यासह इतरांची मदत घेतली. एकाच्या नावाने कर्ज घ्यायचे आणि इतरांनी त्यांना जामीन राहायचे, अशी त्यांची पद्धत आहे. दर वेळी साथीदार बदलले असले, तरी जवक मात्र सर्व गुन्ह्यांत आहे. नगरची मर्चंट बॅंक, नाशिक मर्चंट बॅंकेच्या नगर व श्रीरामपूर येथील शाखा, चंदननगर (पुणे) येथील विश्‍वंभर बॅंक, शिरूरची जिजामाता महिला बॅंक यांना या टोळीने अशा पद्धतीने फसविल्याचे आतापर्यंत उघडकीस आले आहे. वाहन कर्जासाठी बॅंकेत अर्ज करताना सोबत जोडावी लागणारी कोटेशन, हमी पत्र, सात-बारा उतारे, पोच पावत्या, विम्याची कागदपत्रे, आर. सी. बुक अशी कागदपत्रे बनावट तयार करून जोडायची. महागड्या वाहनासाठी कर्ज उचलायचे. ते वाहन घेतल्याचेही बॅंकेला कागदोपत्री दाखवून द्यायचे. परतफेडीचा एखादा हप्ता भरायचा आणि नंतर बॅंकेकडे फिरकायचेही नाही. जेव्हा वसुली निघते, तेव्हा बॅंकेला फसवणूक झाल्याचे लक्षात येते. अशा पद्धतीने जवक याने एकापाठोपाठ अनेक बॅंकांना फसविले आहे. ते गुन्हे आता उघडकीस येत आहेत.

जवक टोळीने ज्या बॅंकांना फसविले, त्या सर्व नागरी सहकारी बॅंका आहेत. राष्ट्रीयीकृत बॅंकांचा यामध्ये अद्याप तरी समावेश नाही. यावरून, बॅंकांच्या कर्जमंजुरी प्रक्रियेबद्दल संशय निर्माण होतो. सामान्य माणसांना, सुशिक्षित बेरोजगारांना उद्योग- व्यवसायासाठी कर्ज देताना हात आखडणाऱ्या बॅंका अशा लोकांना वाहन कर्जे इतक्‍या सहजासहजी कशा देतात? कागदपत्रांची पडताळणी करणारी यंत्रणा त्यांच्याकडे नाही काय, की या यंत्रणेचाही यामध्ये हात आहे? अशा अनेक शंका यानिमित्ताने उपस्थित केल्या जाऊ शकतात. मुळात नागरी बॅंकांचे कामकाज हे अधिकाऱ्यांपेक्षा संचालक मंडळ अगर बॅंकेच्या नेत्यांच्या इशाऱ्यावरच चालत असते. कर्जमंजुरीचे अधिकारसुद्धा अधिकाऱ्यांऐवजी संचालक, नेत्यांकडे असतात. त्यांची कर्ज मंजूर करण्याची पद्धत सर्वश्रुत आहेच. निवडणुकीत मोठा खर्च करून ही मंडळी निवडून आलेली असते, ती उगीच नाही. त्यामुळे यामध्ये केवळ बॅंक कर्मचाऱ्यांना दोष देता येणार नाही. बॅंकांना गंडा घालणारे संचालक, त्यांचे नातेवाईक यांचीही संख्या काही कमी नसते. त्यांनीही उचललेल्या कर्जाची मोठी थकबाकी हा नेहमीच चर्चेचा विषय असतो. संचालक मंडळांच्या अशा कारभारामुळे कित्येक बॅंका दिवाळखोरीत निघाल्याचीही उदाहरणे आहेत. नागरी बॅंकांच्या बाबतीत अशा घटना अधिक घडतात.

बॅंकांच्या या कार्यपद्धतीचा फायदा जवक टोळीने उचललेला दिसतो. जो पारनेर तालुका बॅंका आणि पतसंस्था चळवळीत आघाडीवर आहे, त्याच पारनेर तालुक्‍यात बॅंकांना लुटणारी नव्या दरोडेखोरांची टोळी तयार झाली, ही दुर्दैवाची गोष्ट आहे. अशा टोळ्या भविष्यातही उपद्रव करण्याची शक्‍यता नाकारता येणार नाही. त्यामुळे बॅंकांनी काळजी घेतली पाहिजे; मात्र असे करताना सामान्य माणसाची कर्जासाठी अडवणूक होईल, असेही धोरण घेता कामा नये. अशा गुन्ह्यांत बॅंकांशी संबंधित काही घटक सहभागी असतील, तर त्यांचाही शोध घेऊन त्यांना शिक्षा झाली पाहिजे.

३ टिप्पण्या:

♪♪♥ Prasik ♥♪♪.. ♪♪♥ प्रसिक ♪♪♥........ म्हणाले...

आजकाल सहकारी बँकवर विश्वासच राहिला नाहीये :(, फक्त इतर बँक पेक्षा जास्त व्याज मिळते म्हणून त्यात पैसा ठेवू नये

एक सभासद म्हणाले...

या बँकांमधील संचालकच खरे चोर असतात. एक तर सरळसरळ पैसे खातात नाही तर अशा चोरांच्या मदतीने पैसे उकळतात. बँकांना बुडविणाऱया टोळ्याच आहेत या.

एक सभासद म्हणाले...

या बँकांमधील संचालकच खरे चोर असतात. एक तर सरळसरळ पैसे खातात नाही तर अशा चोरांच्या मदतीने पैसे उकळतात. बँकांना बुडविणाऱया टोळ्याच आहेत या.