शुक्रवार, २३ जुलै, २०१०

पोलिसांची टोपी आणि काठी झालीय गायब!

खाकी वर्दी, डोक्‍यावरील टोपी आणि हातातील काठी, ही पोलिसांची खास ओळख; पण अलीकडच्या काळात नव्याने भरती झालेल्या पोलिसांना या गणवेशाची लाज वाटते आहे. त्यामुळे त्यांच्या हातातील काठी गायब झाली असून, डोक्‍यावरची टोपी खिशात, तर खिशातील मोबाईल हातात आला आहे. त्यामुळे काम सोडून मोबाईलवर बोलताना किंवा "गेम' खेळत बसलेले तरुण पोलिस नजरेस पडतात.

पोलिसांचा गणवेश यापूर्वी अनेकदा बदलला. सुरवातीला असलेली 'हाफ पॅंट' जाऊन आता "फुल पॅंट' आली. लाकडी लाठ्या जाऊन आता फायबरच्या नव्या आकर्षक लाठ्या आल्या आहेत. त्यामुळे पोलिस कर्मचारी अधिक 'स्मार्ट' दिसू लागले. पूर्वी बहुतांश पोलिसांकडे सायकली होत्या. घरूनच गणवेशात निघालेले हे पोलिस सायकलला काठी लटकवून जायचे. ड्युटीवर असतानाही डोक्‍यावर टोपी आणि हातातील काठी कायम असायची. गणवेशाशिवाय वरिष्ठांसमोर जाणे दूरच; पोलिस ठाण्याच्या आवारात पाय ठेवण्याचीही हिंमत कोणी करीत नव्हते. आता मात्र पूर्ण गणवेश केलेले पोलिस अभावानेच पाहायला मिळतात. तेव्हाचे वरिष्ठ अधिकारीही याबद्दल कडक शिस्तीचे असत. त्यानंतर मोटारसायकली आल्या, तरीही पोलिसांची काठी सोबत होतीच. दुचाकीला काठी लटकविण्यासाठी त्यांनी खास सोय करवून घेतलेली होती. काठी लटकविलेली दुचाकी म्हणजे पोलिसांची, अशी खास ओळखही त्यांची झाली होती.

पोलिस दलात नव्याने भरती झालेल्यांना मात्र हा गणवेश फारसा रुचलेला दिसत नाही. डोक्‍यावर टोपी आणि हातात काठी, असे पोलिस तर मोठ्या बंदोबस्ताशिवाय इतरत्र दिसतच नाहीत. कामावर जाताना अगर परतताना खाकी वर्दीवर साधा शर्ट घालून जातात. कामावर असतानाही टोपी खिशात ठेवून देतात. बहुतांश पोलिसांकडे तर काठ्याच नाहीत. असल्या तरी त्या वाहनात अगर पोलिस ठाण्यात ठेवून दिलेल्या असतात. विशेष म्हणजे, मोबाईल वापरणाऱ्या पोलिसांची संख्या वाढली आहे. तरुण पोलिस तर तासन्‌ तास मोबाईलशी खेळत बसतात. पोलिस ठाण्यातील लिखापढीचे अगर तपासाचे काम त्यांना नको वाटते. गुन्ह्यांचा तपास, आरोपी पकडण्याची मोहीम, वाहतूक यांसाठीही हे पोलिस नाखूष असतात. बंदोबस्तासाठी राखीव म्हणून मुख्यालयात बसून राहणेच त्यांना अधिक पसंत पडते. "वाटेकरी' नको म्हणून जुने पोलिसही त्यांना मुख्य कामांत सहभागी करवून घेण्यास इच्छुक नसतात. त्यांना पडेल ते काम दिले जात असल्याने, कामाबद्दल नव्या पोलिसांच्या मनात तिटकाराही निर्माण होतो. खात्यांतर्गत परीक्षा देऊन फौजदार व्हायचे, असे लक्ष्य ठेवून काही जण त्या तयारीला लागतात, तर काही जण कायमचे बाजूला पडतात. त्यामुळे पोलिस दलातील महत्त्वाच्या कामांसाठी मनुष्यबळ उपलब्ध होत नाही.

भविष्यातील धोका ओळखावा
नवे पोलिस तपास आणि लिखापढीचे काम शिकण्यास उत्सुक नाहीत. त्यांना जर याची सक्ती करून शिकण्यास भाग पाडले नाही, तर सध्याचे पोलिस निवृत्त झाल्यावर भविष्यात अशी कामे करणारी माणसे दुर्मिळ होतील. गुप्त माहिती काढण्यापासून गुंतागुंतीचा तपास करण्यापर्यंतची प्रक्रिया आतापासूनच नव्या पोलिसांना शिकविण्याची गरज आहे.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत: