रविवार, २० डिसेंबर, २००९

भावूक गृहमंत्री अन्‌ निष्ठूर पोलिस

राज्याचे गृहमंत्री आर. आर. पाटील ऊर्फ आबा हे संवेदनशील मनाचे आहेत. हलाखीच्या परिस्थितीतून पुढे आलेल्या आबांना सामान्यांच्या परिस्थितीची जाणीव आहे. त्यामुळे त्यांचा स्वभाव तसा बनला असावा. त्यामुळेच ते लवकर भावूक होतात. पोलिसांबद्दल, त्यांच्या स्थितीबद्दल बोलतानाही ते भावूक होतात. एका वृत्तवाहिनीला दिलेल्या मुलाखतीत आबांचा हा भावूक स्वभाव पुन्हा एकदा पाहायला मिळाला. सक्षम पोलिस दल तयार करण्यासाठी गृहमंत्रीही तसाच खंबीर मनाचा हवा, अशी प्रतिक्रिया त्यावर उमटणे साहजिक आहे. याचा अर्थ भावूक मंत्री पोलिस दलाचा कारभार पाहू शकणार नाही, असेही म्हणता येणार नाही; पण आपले पोलिस दल आबांच्या या भावना समजू शकणारे आहे का? सामान्यांना बहुतांश पोलिसांकडून निष्ठूरपणाचीच वागणूक मिळत असते. त्यांना आबांच्या भावना तरी कशा समजणार, असाही प्रश्‍न आहे.

खंबीरपणा वेगळा आणि निष्ठूरता वेगळी. पोलिस ठाण्यात रात्री-अपरात्री रडतपडत आपले दुःख घेऊन आलेल्या महिलेला शिव्या घालत हाकलून देणे, एखाद्यावर अन्याय झाला आहे, हे उघडपणे दिसत असूनही राजकीय दबाव किंवा पैशाच्या मोहाने त्याच्यावर अन्याय करणाऱ्याचीच पाठराखण करणे, एखाद्या ठिकाणी दरोडा पडत असल्याची माहिती मिळूनही थातूरमातूर कारणे सांगून तेथे तातडीने जाण्याचे टाळणे याला निष्ठूरपणा म्हणावा नाही तर काय? जुने-जाणते अधिकारी आणि कर्मचारीही जेव्हा असे वागतात, तेव्हा जनतेने पोलिस दलावर विश्‍वास कसा ठेवायचा? जे पोलिस आपल्या सुखदुःखाला धावून येत नाहीत, आपल्याऐवजी चोरांचीच पाठराखण करतात, त्या पोलिसांच्या सुखदुःखांत जनता तरी कशी समरस होणार?

असे हे पोलिस दल आबांना आता सक्षम करायचे आहे. त्यांच्या हाती अत्याधुनिक शस्त्रे द्यायची आहेत. जगातील सर्वांत उच्च पातळीचे प्रशिक्षण त्यांना द्यायचे आहे. त्यासाठी आबांना हवे आहेत साडेतीन हजार कोटी रुपये. तेवढ्या पैशात पोलिस दल आधुनिक करता येईलही. त्यांच्या हातांत आधुनिक शस्त्रे येतील, अतिरेक्‍यांचा खतमा करण्यासाठी हे दल सक्षम होईल; मात्र स्वकीयांचे रक्षण करण्याची क्षमता पोलिसांत खऱ्या अर्थाने येईल का? सामान्य जनतेला पोलिसांबद्दल आदर आणि विश्‍वास वाटेल का? नव्या यंत्रसामग्रीचा वापर पोलिस जनतेच्या रक्षणासाठी करतील, की त्यांनाच धमकावण्यासाठी, याचाही विचार करावा लागेल.

जनेतेचे सोडाच; आपल्या सहकाऱ्यांशी तरी पोलिसांचे वर्तन कसे असते, हेही पहावे लागले. चांगल्या जागी नियुक्ती मिळविण्यासाठी त्यांच्यात असलेली गळेकापू स्पर्धा, खालच्या कर्मचाऱ्यांपासून ते वरिष्ठ अधिकाऱ्यांपर्यंत असलेली गटबाजी, त्यातून एकमेकांना अडचणीत आणण्यासाठी केले जाणारे खटाटोप, त्यांच्यातील राजकारण या गोष्टीही बंद व्हायला हव्यात. त्यासाठी प्रथम बदल्या आणि बढत्यांमधील भ्रष्टाचार रोखला गेला पाहिजे. पोलिस भरतीत जशी पारदर्शकता आली, तशी यामध्ये आणली पाहिजे. मुख्य म्हणजे पोलिस दलातील वरच्या पातळीवर चालणारा भ्रष्टाचार रोखला, तर खालच्या अधिकाऱ्यांची त्यासाठी हिमंत होणार नाही, हे सूत्र आधी ध्यानात घ्यावे लागेल.

आबा म्हणतात, की पोलिसांना कायद्यानुसार संघटना स्थापन करता येत नाही; परंतु त्यांचा प्रतिनिधी म्हणून आपण त्यांच्या अडचणी सरकारकडे मांडू.' यातून पोलिसांप्रती आबांना असलेली कळकळ व्यक्त होत असली, तरी पोलिसांनी यातून बोध घेण्याची गरज आहे. असा गृहमंत्री आपल्याला लाभला, याचा पोलिसांना खरे तर अभिमान वाटला पाहिजे. गृहंमत्री जर आपल्याला काही देण्यासाठी पुढाकार घेत असेल, तर आपण त्यांच्यासारखे वागण्याचा प्रयत्न केला पाहिजे. प्रसंगी खंबीरपणे लढून संरक्षण देणारे आणि तेवढ्याच भावूकतेने अन्यायग्रस्तांना मदतीचा हात देणारे पोलिस दल निर्माण झाल्यास जनताही त्यांना सलाम करील, यात शंका नाही.

1 टिप्पणी:

Unknown म्हणाले...

पोलिसनामा ब्लॉग वाचनीय आहे. यात पोलिसांच्या वसाहती,कल्याण योजना,कौटुंबिक ओढाताण याबद्धल सुध्दा लिही. माझे वडिल पोलिस होते. ते सेवानिवृत्त होउन 20 वर्षे झाली आहेत. मी सिटी पोलिस लाईन,पोलिस हेडक्वार्टर,जामखेड,पाथर्डी,भिंगार येथील पोलिस जीवन जवळून पाहिले आहे. तुझ्या ब्लॉगला हार्दिक शुभेच्छा.