![](https://blogger.googleusercontent.com/img/b/R29vZ2xl/AVvXsEjzVhcBOpw_AJwiKbdLB3iLhEqbRd6FVE8H8MnRwV3TCDh9m2_Cqh9cg0yy14WGD0SI4EszSgV7gW3QAZOyU_7rR3nUnzkIvDF19tfZZ2Xytz9bBVnCKPdAYF9pVaNzU6vjvm-C3CrZBOA/s200/vahan+chori.jpg)
पोलिसांत अपघाताचा गुन्हा नोंदविताना, "रस्त्याच्या परिस्थितीकडे दुर्लक्ष करून अपघातास कारणीभूत झाला,' असे एक वाक्य असते. यामध्ये केवळ वाहन चालविणाऱ्या चालकाची चूक अधोरेखित होते. कायद्यात त्यासाठी चालकाला शिक्षा सांगितली आहे. मात्र, रस्त्याची ही परिस्थिती का झाली, त्याला जबाबदार कोण, याचा शोध मात्र घेतला जात नाही. किंबहुना तशी यंत्रणेची पद्धत नाही. त्यामुळे रस्त्यावर या ना त्या कारणाने अडथळे करणारे, रस्ता नादुरुस्त होण्यास जबाबदार असलेले, दुरुस्तीकडे दुर्लक्ष करणारे, दुरुस्तीत किंवा रचनेत त्रुटी ठेवणारे मोकळेच राहतात.
अपघाताचा संबंध केवळ दोन वाहनचालक यांच्याशीच जोडला जातो. विम्याची रक्कम मिळेपर्यंत ताणून धरले जाते, नंतर मात्र सर्वांनाच त्याचा विसर पडतो. त्यामुळे न्यायालयातही फार कमी प्रमाणात शिक्षा होते, तर कित्येक प्रकरणे प्रलंबित राहतात.
अपघात झाल्यावर पोलिसांची जबाबदारी वाढते. बहुतांश वेळा पोलिसांना संतप्त जमावाच्या असंतोषाला बळी पडावे लागते. वाहनांची जाळपोळ होते. त्यात राष्ट्रीय संपत्तीचेच नुकसान होते. अशा अनेक घटना घडल्या, तरी "रस्त्याची परिस्थिती' या घटकाकडे कोणीही फारसे लक्ष द्यायला तयार नाही. दुभाजकावर रेडिअम लावावे, गतिरोधक असावेत, सूचना फलक असावेत, धोकादायक वळणे दुरुस्त करावीत, या गोष्टींकडे कोणीही लक्ष देत नाही.
दुसऱ्या बाजूला वाहतुकीच्या नियमांचा भंग करण्याच्या वृत्तीकडेही यंत्रणेचे दुर्लक्ष होते. अपुरे रस्ते आणि वाढती वाहनसंख्या हे एक कारण असले, तरी आहेत ती वाहने शिस्तीत चालविली, तरी बराच फरक पडू शकतो; परंतु तसे होत नाही. बेकायदा प्रवासी वाहतूक सुरू आहे. मुदत संपलेल्या आणि कुचकामी झालेल्या वाहनांत क्षमतेपेक्षा जादा प्रवासी बसविले जातात. विशेष म्हणजे दाटीवाटीने बसून धोकादायक प्रवास करण्यात लोकांनाही काहीच भीती वाटत नाही. वेगाचे बंधन न पाळणे, जागरण करून वाहन चालविणे, वाहतुकीचे नियम न पाळणे, वाहनांची दुरुस्ती- देखभाल न करणे, अशा गोष्टीही अपघाताला कारणीभूत ठरतात. अपघात आणि त्यात होणारी जीवितहानी टाळायची असेल, तर या सर्व गोष्टींचा एकत्रित विचार करून त्यासाठी यंत्रणांच्या जबाबदाऱ्या निश्चित करण्याची गरज आहे. मोठा अपघात झाल्यावर काही काळ यावर चर्चा होते, नंतर मात्र सर्वांनाच याचा विसर पडतो. (eSakal)
1 टिप्पणी:
bakichya vartaman patran purawn kadli Road accident war ! ata apan hi
टिप्पणी पोस्ट करा