गुरुवार, १७ जानेवारी, २०१३

गावठी कट्टे ते बॉंबस्फोटातील सहभाग


वा ळूतस्करी, खंडणी, स्वस्तात सोन्याचे आमिष, दरोडे अशा गुन्ह्यांसाठी (कु)प्रसिद्ध असलेले जिल्ह्यातील आरोपी आता थेट बॉंबस्फोटासारख्या देशविघातक गुन्ह्यांमध्ये अडकू लागले आहेत. पूर्वी नगर जिल्ह्यात "सिमी' (स्टुडंट इस्लामिक मूव्हमेंट ऑफ इंडिया) या बंदी घातलेल्या संघटनेच्या कारवाया सुरू होत्या. त्यांचे काही खटलेही येथील न्यायालयात प्रलंबित आहेत. मधल्या काळात यंत्रणांचे या हालचालींकडे दुर्लक्ष झाले आणि आता थेट बॉंबस्फोटासारख्या गुन्ह्यात नगर जिल्ह्यातील आरोपींचा सहभाग उघड होत आहे. या घटना वेळीच रोखण्यात पोलिस आणि गुप्तचरांना अपयशच आले, असे म्हणावे लागेल. गेल्या वर्षीपासून जिल्ह्यात दहशतवादविरोधी पथक कार्यरत आहे; मात्र, या पथकाला याची माहिती नव्हती. विशेष म्हणजे या पथकातील एक कर्मचारी पूर्वी अटक केलेल्या एका आरोपीच्या घराजवळच राहतो आणि दुसरा कर्मचारी नव्याने अटक केलेल्या आरोपीच्या चांगल्याच परिचयाचा असल्याचे सांगण्यात येते. अशी जर आपल्याकडील स्थानिक "एटीएस'ची अवस्था असेल, तर दहशतवाद्यांना कारवायांसाठी हा भाग सुरक्षित का वाटणार नाही?
पुण्यातील जंगली महाराज रस्त्यावरील बॉंबस्फोटप्रकरणी नगरमधून अटक करण्यात आलेल्या आरोपींची संख्या आता दोन झाली आहे. मुकुंदनगरमधील इरफान लांडगे आणि श्रीरामपूरमधील बंटी जहागीरदार यांना आतापर्यंत या गुन्ह्यात अटक करण्यात आली आहे. या दोघांवरही आरोपींना मदत केल्याचा आरोप आहे. इतर दोन आरोपींचाही नगरशी प्रत्यक्ष संबंध असून, तेही काही काळ नगरमध्ये वास्तव्य करून गेलेले आहेत. दहशतवादी कारवाया मराठवाड्यापाठोपाठ आता नगरमधूनही उघड होऊ लागणे ही चिंतेची गोष्ट आहे. आता तरी पोलिसांनी या गोष्टी गांभीर्याने घेतल्या पाहिजेत.
नगरमध्ये पारंपरिक गुन्हेगारी आहेच. त्याच्या जोडीला काही वर्षांपूर्वी "सिमी'च्या कारवाया सुरू झाल्या होत्या. बंदी आल्यावर नाव बदलून त्या सुरूच राहिल्या. त्यामुळे बाहेरच्या जिल्ह्यांतील कार्यकर्त्यांचे नगरला येणे-जाणे सुरूच होते. त्यातून झालेली जवळीक आणि सोयरिकही याला खतपाणी घालणारी ठरल्याचे आतापर्यंत उघड झालेल्या माहितीवरून दिसून येते. श्रीरामपूर- नेवासे भागात गावठी कट्टे खरेदी-विक्रीचा धंदा जोरात आहे. दोन वर्षांपूर्वी पोलिसांनी त्यावर कारवाई केली होती. अनेकांना यामध्ये अटक झाली. मात्र, पुन्हा कारवाई थंडावली आणि धंदा पुन्हा तेजीत आला. श्रीरामपूर, नेवासे, राहुरी या भागात मोठ्या प्रमाणावर शस्त्रांची खरेदी-विक्री चालते. या शस्त्रांचा वापर वाळूतस्करी आणि अन्य गुन्हेगारीसाठी केला जातो, असे आतापर्यंत आढळून येत होते. आता ही शस्त्रे थेट दहशतवाद्यांपर्यंत गेल्याचेही उघड होत आहे. पोलिसांना सर्वच गोष्टी माहिती नसतात असे नाही. अनेकदा राजकीय हस्तक्षेपामुळे पोलिसांचे हात बांधले जातात. बंटी जहागीरदार प्रकरणात हेच झाल्याचे दिसून येते. त्याच्याविरुद्ध दाखल गुन्ह्यांची जंत्रीच पोलिसांकडे आहे. तरीही त्याच्याविरुद्ध कडक कारवाई झाली नाही, यातच सर्व आले.
दहशतवाद हा एकाएकी फोफावत नाही. तुलनेत सुरक्षित असलेली ठिकाणे आणि परिस्थितीचा विचार करून दहशतवादी ठिकाणांची निवड करतात, हे आतापर्यंत दिसून आले आहे. आतापर्यंत त्यांना यासाठी मराठवाडा तुलनेत सुरक्षित वाटत होता. मात्र, मधल्या काही घटनांमुळे आता पोलिसांचे लक्ष तिकडे वेधले गेले. त्यामुळे त्यांनी आता नगर परिसरात बस्तान बसविण्यास सुरवात केल्याचे दिसते. कमी मनुष्यबळ, कायदा- सुव्यवस्थेच्या वाढत्या घटना आणि बदलती गुन्हेगारी, यामुळे आधीच जेरीस आलेल्या पोलिसांना दहशतवादी कारवायांवर लक्ष ठेवणे शक्‍य नाही. त्यामुळे "एटीएस'सारख्या शाखाच या भागात मजबूत करण्याची गरज आहे. त्यासोबतच आता नागरिकांनीही सावध राहून संशयास्पद हालचालींची माहिती पोलिसांना कळविण्याची आवश्‍यकता आहे.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत: