पवना धरणातील पाणी पिंपरी-चिंचवडला नेऊ नये, या मागणीसाठी वडगाव मावळमधील शेतकऱ्यांनी आंदोलन केले होते. त्यावेळी पोलिसांनी केलेल्या गोळीबारात तिघांचा बळी गेला. अर्थात अशाप्रकारचे आंदोलन, होणारा गोळीबार आणि त्यात जाणारे बळी त्याही पुढे जाऊन त्याचे केले जाणारे राजकारण या गोष्टी राज्याला नवीन राहिलेल्या नाहीत. घटना घडून गेल्यावर त्यावर चर्चा होते, वेगवेगळ्या मागण्या केल्या जातात, त्यातील मुख्य मागणी सरकारच्या किंवा गृहमंत्र्यांच्या राजीनाम्याची असते. शेवटी पोलिस कर्मचाऱ्यांवर कारवाई होते, आणि सगळे शांत होते. बळी गेलेले कार्यकर्ते हेही शेवटच्या घटकातील असतात आणि निलंबित झालेले पोलिस हेही शेवटच्या स्तरातील असतात. आंदोलन करण्याचा, ते भडकविण्याचा आणि त्याचा राजकीय वापर करण्याचा निर्णय वरिष्ठ राजकारण्यांचा असतो. तर आंदोलन चिरडण्याचा, गोळीबार करण्याचा निर्णय सुद्धा सरकार आणि वरिष्ठ अधिकाऱ्यांचा असतो. या दोन्ही बाजूंचे हे दोन्ही घटक यातून सहीसलामत बाजूला राहतात, असेच आजवर झालेल्या विविध आंदोलनांतून दिसून आले आहे. वडगाव मावळमधील आंदोलनही त्याला अपवाद नाही.
घरातील कमावता माणूस गोळीबारात ठार झाल्याने कुटुंब उघड्यावर आलेले असते, दुसऱ्या बाजूला कमावता माणूस (पोलिस) निलंबित झाल्याने त्यांच्याही कुटुंबावर संकट कोसळलेले असते. अशावेळी माध्यमे आणि राजकारणी व्यक्ती कोणाची "गेम' किती यशस्वी अगर अयशस्वी झाली, याची चर्चा करीत बसतात. घडून गेलेल्या घटनांवर खल करताना पुन्हा अशा घडू नयेत, यासाठी उपाययोजनांचाही विचार केला जात नाही.
1 टिप्पणी:
पवना धरणातील पाणी पिंपरी-चिंचवडला नेऊ नये, या मागणीसाठी वडगाव मावळमधील शेतकऱ्यांनी आंदोलन केले होते. ?????????????????????????????????
• शेतीला पाणी पाहीजे म्हणून धरण बांधलं. त्यातलं पाणी पिंपरी-चिंचवड नगरपालिकेला द्यायला शेतकर्यांची ना नाही. आजही पवनेचं पाणी पिंपरी-चिंचवड शहराला दिलं जात आहेच. मात्र ते पाणी नदीतून वाहात रावेतपर्यंत येतं, तिथे उपसा जलसिंचनामार्फत महापालिका ते पाणी उचलते आणि पाणीपुरवठा करते. धरणातून रावेतपर्यंत वाहात येणारं हे पाणी जमिनीत मुरतं त्यामुळे शेतातल्या विहीरांना पाझर मिळतो आणि शेती फुलते. महानगरपालिकेने थेट धरणातून पाइपलाइनने पाणी घेतलं तर रावेतपर्यंत पाणी वाहात येणार नाही आणि विहीरींना झिरपा मिळणार नाही म्हणून शेतकर्यांचा पाइपलाइनला विरोध आहे.
• पाईपलाइनद्वारे पाणी आणण्याचा हट्ट अजितदादा आणि कंपनी का धरते आहे? जवाहरालाल नेहरू नगरनूतनीकरण योजनेमार्फत निधी मिळतो आहे. तो निधी ठराविक मुदतीत खर्च केला पाहीजे. पाइपलाइनसाठीचा खर्च आहे ४०० कोटी रुपये. अर्थातच हा पैसा कंत्राटदाराला म्हणजे राजकारण्यांच्या मर्जीतल्या माणसाला मिळणार. त्यातला वाटा संबंधीत राजकीय पक्षाला मिळणार. यासाठी तो पैसा खर्च करण्याची वा वापरण्याची घाई सुरु आहे. रावेतला उचललेल्या पाण्याचं शुद्धिकरण करून शहरवासियांना पुरवायचं झालं तर तो खर्च कमी असेल आणि महापालिकेला आपल्या उत्पन्नातून करावा लागेल. म्हणून अजितदादा, आबा, पिंपरी-चिंचवड महापालिकेचे महापौर, राष्ट्रवादीचे नगरसेवक इत्यादी पाईपलाइनचा आग्रह धरत आहेत.
• पाइपलाइन झाली तर कोल्हापूर पद्धतीचे बंधारे बांधून शेतीच्या पाण्याची व्यवस्था करू असं आश्वासन सरकार देतं. पवना धरण बांधून झालं १९७२ साली. अजून विस्थापितांचं पुनर्वसन झालेलं नाही. कोल्हापूर पद्धतीचे बंधारे बांधण्याच्या दादांच्या वा आबांच्या आश्वासनावर शेतकर्यांनी विश्वास का ठेवायचा? आधी कोल्हापूर पद्धतीचे बंधारे बांधून मग पाइपलाइन टाकण्याचं नियोजन दादा-आबांनी का केलं नाही?
टिप्पणी पोस्ट करा