मंडपाजवळ थांबायला पोलिस, मिरवणुकीत पोलिस, आचारसंहिता ठरवायची पोलिसांनी, विसर्जन करताना न बुडणाऱ्या मूर्तीही बुडवायच्या पोलिसांनीच, अशा पद्धतीने सध्या गणेशोत्सवात पोलिसांना हस्तक्षेप करावा लागत आहे. दिवसेंदिवस त्यामध्ये एवढी वाढ होत आहे, की उत्सव कार्यकर्त्यांचा की पोलिसांचा, असा प्रश्न निर्माण होतो.
उत्सवाचे मूळ स्वरूप मागे पडून त्याकडे राजकीय शक्तिप्रदर्शनाचे साधन म्हणून पाहिले जाऊ लागल्याने कार्यकर्ते उत्सवापेक्षा राजकीय शक्तिप्रदर्शनाचेच नियोजन करण्यावर भर देतात. त्यामुळे मूळ उत्सवावर आणि इतर हालचालींवर लक्ष ठेवण्याचे कामही पोलिसांनाच करावे लागत आहे. अर्थात, केवळ गणेशोत्सवच नव्हे, तर बहुतांश सर्व धर्मांच्या सण-उत्सवांचे स्वरूप असे "पोलिसमय' झाले आहे.
दुसऱ्या बाजूला या प्रत्येक क्षणाचा आपल्या शक्तिप्रदर्शनासाठी कसा वापर करता येईल, यावरच बहुतांश मंडळांच्या पदाधिकाऱ्यांचा आणि त्यांच्या पाठीराख्यांचा प्रयत्न सुरू आहे. अथार्त बरीच मंडळे हा उत्सव चांगल्या पद्धतीने साजरा करतात. शांततेत आणि वेगळ्या पद्धतीने मिरवणूक काढणे, लोकप्रबोधनाचे देखावे तयार करणे, उत्सव काळात सांस्कृतिक कार्यक्रम घेणे आणि शक्तिप्रदर्शनापेक्षा उत्सवाचे पावित्र्य टिकविणे यावर त्यांच्याकडून भर दिला जातो. दुसऱ्या बाजूला केवळ राजकीय शक्तिप्रदर्शनासाठी उत्सव करणारी मंडळेही कमी नाहीत.
उत्सवाच्या बदलत्या स्वरूपामुळे त्यामध्ये पोलिसांचा हस्तक्षेप सुरू झाला. हळूहळू तो वाढत गेला. ब्रिटिशांच्या काळात नव्हते एवढे नियम स्वतंत्र भारतात या उत्सवासाठी केले गेले. अर्थात याचा फटका शांततेत उत्सव साजरा करणाऱ्या आणि कोणतेही राजकीय पाठबळ नसलेल्या मंडळांनाच बसला. पूर्वी सोसायट्या, वसाहती, उपनगरे येथेही लोक एकत्र येऊन गणेशोत्सव साजरा करीत. चौकातल्या मोठ्या मंडळांसारखा धांडगधिंगा न करता सांस्कृतिक कार्यक्रम, विविध स्पर्धा, व्याख्याने, असे कार्यक्रम या मंडळांकडून होत. मंडळे छोटी असल्याने कार्यक्रमांचे स्वरूपही तसेच असे; मात्र पोलिसी नियमांच्या कचाट्यात ही मंडळेही सापडली.
नोकरी-व्यवसाय सांभाळून फावल्या वेळात मंडळाचे काम करणाऱ्या या "कार्यकर्त्यांना' विविध परवानग्यांसाठी पोलिस आणि इतर सरकारी कार्यालयांत चकरा मारणे जमत नाही. शिवाय राजकीय पाठबळ नसल्याने नियम झुगारून उत्सव साजरे करण्याची हिंमतही केली जात नाही. त्यामुळे हळूहळू अशा मंडळांची संख्या कमी होत गेली. म्हणजे जेथे खऱ्या अर्थाने उत्सव केला जात होता, तो आता बंद होत आहे. जो उत्सव सुरू आहे, त्यामध्येही पोलिसांना हस्तक्षेप करावा लागत आहे. शिवाय त्यातून समाजप्रबोधन आणि समाजहित किती होते, हा प्रश्न वेगळाच.
बंदोबस्तासाठी होणारा सरकारचा खर्च, या काळात ठप्प होणारी इतर कामे, त्याचे होणारे दुरगामी परिणाम, या सगळ्या गोष्टी दूरच. उत्सवात कार्यकर्ते व नेते आवश्य तयार व्हावेत, नेतृत्व गुण विकसित करणे हा उत्सवाचा हेतू आहेच. मात्र, हे नेतृत्व सकारात्मक पद्धतीने तयार झालेले असावे, लोकांनी स्वीकारलेले असावे. दंगामस्ती करून, बळजबरीने लादलेले आणि दहशतीने निर्माण केलेले नसावे. उत्सवाचे हे चित्र बदलावे लागेल. केवळ गणेशोत्सवच नव्हे तर आपल्याकडील बहुतांश सार्वजनिक सण-उत्सावांचे असे स्वरुप झाले आहे. अलिकडे त्यावर दहशतवादाचेही सावट असल्याने नागरिकांनी याचा विचार करून उत्सवातील उत्सवी वातावरण कायम ठेवण्यासाठी पुढाकार घेतला पाहिजे.
1 टिप्पणी:
तुमचं म्हणणं अगदी पटलं! चौकातल्या मंडळाला सांगायला गेलं की जरा स्पीकरचे आवाज हळू ठेवा, तर ते आपल्यावरच धाऊन येतात. शिवाय, जाहिराती आणि वर्गण्या मिळविण्यासाठी धमक्या देणं हे तर गेली कित्येक वर्षं चालू आहे. मग हा उत्सव कशासाठी? बुद्धीच्या देवतेचा उत्सव साजरा करताना, लोकांची बुद्धीच का चालत नाही?
टिप्पणी पोस्ट करा