सोमवार, १४ सप्टेंबर, २००९

शेवटी "तिला' मिळाला न्याय

पालकांनी लहानपणीच लग्न लावून दिले. मात्र तीन महिन्यांतच पतीने छळ सुरू केला. त्याला कंटाळली असतानाच दुसरा एक पुरुष जीवनात आला. त्याच्या गोड बोलण्याला फसून त्याच्यासोबत गेली. तिला मुलगी होताच त्यानेही तिला टाकले. केवळ टाकलेच नाही, तर भटक्‍या समाजातील पन्नास वर्षांच्या एका व्यक्तीबरोबर लग्न लावून दिले. त्याच समाजातील एका महिलेला तिची दया आली. तिने तिला पोलिसांच्या ताब्यात दिले. पोलिसांनी न्यायालयात आणले. न्यायालयानेही सहृदयता दाखवून तिला "न्यायाधार' संस्थेच्या ताब्यात देऊन कायदेशीर लढाईचा मार्ग खुला करून दिला. अखेर त्याला यश आले आणि चार आरोपींना दहा वर्षे सक्तमजुरीची शिक्षा झाली.

ही करुण कहाणी आहे हडपसर (पुणे) येथील एका फसलेल्या युवतीची.
एप्रिल 2007 मध्ये नेवासे पोलिसांनी नगरचे तत्कालीन मुख्य न्यायदंडाधिकारी नारायण गिमेकर यांच्यासमोर एका अल्पवयीन मुलीला हजर केले. न्यायालयाने नेहमीच्या कायद्याच्या चौकटीबाहेर जाऊन तिची चौकशी केली अन्‌ त्या युवतीवर झालेल्या अत्याचारांची मालिका उघड झाली. या युवतीचे तिच्या पालकांनी बालपणीच तेथील एका व्यक्तीशी लग्न लावून दिले. मात्र सहा महिन्यांतच त्याने तिचा छळ सुरू केला. त्याचदरम्यान प्रकाश ज्ञानदेव गायकवाड (रा. मिरी, ता. पाथर्डी) याच्याशी ओळख झाली. त्याने तिची छळातून मुक्तता होण्यासाठी आपल्याबरोबर गावाकडे चलण्यास सांगितले. भोळ्या आशेने तीही तयार झाली. त्यानुसार ती मिरीला आली. सुमारे दीड वर्ष तेथे राहिली. त्यादरम्यान तिला एक मुलगी झाली. शेवगाव येथील एका रुग्णालयात तिचे बाळंतपण करण्यात आले. त्यानंतर गायकवाड याने ती मुलगी हिसकावून घेतली आणि त्या युवतीला रमेश मोतीराम काळे (रा. भेंडा, ता. नेवासे) या भटक्‍या समाजातील व्यक्तीच्या घरात सोडून दिले. तेथे ती आठ दिवस राहिली. त्यानंतर सोमनाथ गायकवाड याने धमक्‍या देऊन तिचा विवाह बळजबरीने किशोर मोतीराम काळे (वय 50) यांच्यासमवेत लावून दिला. ही घटना 17 एप्रिल 2007 रोजी घडली. ही गोष्ट त्याच समाजातील कलाबाई काळे हिच्या लक्षात आली. ती या युवतीला घरी घेऊन गेली. तिने त्या युवतीला नेवासे पोलिसांच्या ताब्यात दिले. पोलिसांनी तिला तेथील न्यायालयापुढे हजर केले. तत्कालीन मुख्य न्यायदंडाधिकारी श्री. गिमेकर यांनी तिच्याकडे चौकशी सुरू केली, तेव्हा तिची कहाणी समोर येऊ लागली.

घटनेचे गांभीर्य लक्षात घेऊन त्यांनी खुल्या न्यायालयातील कामकाज थांबवून चेंबरमध्ये तिची व्यथा ऐकून घेण्याचे ठरविले. त्यानुसार येथील न्यायाधार संस्थेच्या सचिव ऍड. निर्मला चौधरी आणि बालसुधारगृहाच्या महिला अधिकाऱ्यांनाही बोलावून घेतले. या दोन्ही महिलांनी तिची व्यथा ऐकली. तिला आधार दिला. तिच्या मूळ गावी दूरध्वनीवरून संपर्क साधून खात्री करण्यात आली. तिची नेमकी जन्मतारीखही समजली. त्यानुसार ती आता सज्ञान झाल्याचे स्पष्ट झाले. तिला आधार मिळाल्याने तिने ज्या लोकांनी फसविले त्यांच्याविरुद्ध तक्रार द्यायची असल्याचे सांगितले.

त्यानुसार पाथर्डीच्या पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला. या प्रकरणाची सुनावणी ऑगस्ट 2009 मध्ये येथील जिल्हा न्यायाधीश नागेश न्हावकर यांच्यासमोर झाली. चार पुरुष व चार महिलांविरुद्ध खटला भरण्यात आला होता. न्यायालयासमोर आलेल्या पुराव्यातून चौघे पुरुष दोषी आढळून आले. त्यांना प्रत्येकी दहा वर्षे सक्तमजुरीची शिक्षा देण्यात आली. महिला आरोपींविरूद्ध गुन्हा सिद्ध होऊ शकला नाही. तिला फसवून गावी आणणारा, विकण्यासाठी मदत करणारा त्याचा भाऊ, विक्रीसाठीचा मध्यस्थ आणि विकत घेऊन लग्न करणारा, अशा चौघांना शिक्षा देण्यात आली. मधल्या काळात न्यायाधार संस्थेच्या मदतीने त्या युवतीचेही पुनर्वसन झाले आहे. तिला आता एक चांगले घर मिळाले असून तिचा संसार सुखाने सुरू आहे.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत: