सोमवार, १ नोव्हेंबर, २०१०

चला, सजग नागरिक बनू या !

"वाइटाला वाईट म्हणणारी माणसे जेव्हा तयार होतील, अवतीभोवती घडणाऱ्या घटनांची माहिती देण्यासाठी पुढे येतील, तेव्हा गुन्हेगारी नियंत्रणाचे काम सोपे होईल,' असे पोलिस अधीक्षक कृष्ण प्रकाश आपल्या भाषणातून नेहमी सांगत असतात. त्यांना अपेक्षित असलेले सजग नागरिक जिल्ह्यात निर्माण झाले पाहिजेत. त्यासाठी आपल्यातील उदासीनता आणि पोलिसांकडे पाहण्याची दृष्टी बदलण्याची गरज आहे. गेल्या चार वर्षांपासून "पोलिसनामा' या सदरातून याच पद्धतीने समाजप्रबोधन करण्याचा प्रयत्न सुरू आहे.

आपल्या वर्तनाचा विचार केला, तर खरेच आपण अगदीच उदासीन होत चाललो आहोत. कोणत्याही घटनेकडे आपण, "मला काय त्याचे' या भावनेतून पाहतो. त्यामुळे आसपास घडलेले कितीतरी गुन्हे दडपले जातात. सामान्य नागरिकांच्या या वृत्तीचाच गुन्हेगार आणि गुंड फायदा घेतात. आपण एकमेकांच्या अडचणीच्या वेळी मदतीला धावून जातो का? रस्त्यात अपघात झाला, तर बघ्याची भूमिका घेणारेच अधिक असतात. जखमीला रुग्णालयात हलविण्यास कोणीही पुढाकार घेत नाही. उलट, अपघातास कारणीभूत ठरणाऱ्या वाहनाच्या चालकावर हात साफ करण्यासाठी मात्र अनेक हात सरसावतात.

आपण आपली स्वतःचीसुद्धा दक्षता घेत नाही. त्यामुळे बॅंकेच्या बाहेर थांबलेले ठग आपल्याकडील रोकड पळवू शकतात. आपण फसव्या योजनांच्या आहारी जातो. कोणताही माल घेताना पावतीचा अग्रह धरत नाही. पेट्रोल भरताना भेसळ दूरच; मापाचीसुद्धा खात्री करीत नाही. एकूणच, सामान्य माणूस म्हणजे उदासीन वृत्तीचा. त्याला कसेही लुबाडले तरी चालते, असाच समज रूढ होत आहे. त्यामुळे गुन्हेगारीला प्रोत्साहन मिळते आहे. आपल्या अवतीभोवती घडणारे गुन्हे, वावरणाऱ्या गुन्हेगारी वृत्तीच्या व्यक्ती यांच्यावर पोलिसांचा वचक हवा, अशी आपली अपेक्षा रास्त असली, तरी त्यासाठी प्रथम या लोकांना आपली भीती वाटली पाहिजे. गुन्हेगारी वृत्तीच्या लोकांना प्रतिष्ठा मिळणे थांबविणे सामान्य माणसांच्याही हातात आहे. याचा अर्थ, एकट्या-दुकट्या माणसाच्या हाती नव्हे, तर सामान्य माणसाची सामुदायिक ताकद यासाठी निर्माण व्हावी लागेल. या ताकदीला पोलिसांची योग्य साथ मिळाल्यास गुन्हेगारीवर वचक निर्माण करणे सोपे होईल.

येथे पोलिस आणि सामान्य माणूस यांचे संबंधही चांगले हवेत. सध्या मात्र या दोघांचे एकमेकांबद्दल गैरसमज आहेत. पोलिस गुन्हेगारांचीच पाठराखण करतात, असाच सामान्य माणसांचा समज आहे, तर सामान्य माणूस पोलिसांना मदत करण्यासाठी पुढे येत नाहीत, असा पोलिसांचा आक्षेप आहे. त्यामुळे हे दोन्ही घटक एकमेकांपासून दुरावले आहेत. त्यांचा हा दुरावा गुन्हेगारांच्या पथ्यावर पडणारा आहे. त्यासाठी कृष्ण प्रकाश यांच्यासारख्या अधिकाऱ्यांनी पुढाकार घेऊन पोलिस व सामान्य माणसांतील दुरावा कमी करण्यासाठी प्रयत्न केले पाहिजेत. अर्थात, त्यासाठी दोघांचेही वर्तन सुधारावे लागले. त्याशिवाय एकमेकांबद्दल विश्‍वासाचे वातावरण निर्माण होणार नाही. पोलिस ठाण्यात गेलेल्या सामान्य माणसाला सन्मानाची वागणूक मिळाली पाहिजे, त्यांची कामे विनासायास झाली पाहिजेत. सध्या चित्र उलटे आहे. सामान्य माणसाला चकरा माराव्या लागतात, तर गुन्हेगारी वृत्तीच्या लोकांना पोलिसांमध्ये जादा महत्त्व आहे.

त्यामुळे एक वेळ अशी येते, की सामान्य माणसांना आपल्या कामासाठी या गुन्हेगारी व्यक्तींचीची मदत घ्यावी लागते. हे चित्र बदलण्यासाठी कृष्ण प्रकाश यांनी प्रयत्न सुरू केले आहेत. त्याला सामान्य नागरिकांनी साथ दिली पाहिजे. "सकाळ'नेही यासाठी वेळोवेळी पुढाकार घेतला आहे. "पोलिसनामा' या सदरातून पोलिसांचे दोष तर दाखविण्याचा प्रयत्न केलाच; पण जनतेच्या चुकाही दाखवून देण्याचा प्रयत्न केला. अनेक उपायही सुचविले. यातून सकारात्मक काही घडावे, अशीच यामागील अपेक्षा आहे.

1 टिप्पणी:

Amod म्हणाले...

विजय,
या पोस्टस् मध्ये सामान्य नागरिकांच्या भावनाच तुम्ही मांडत असता, ही सुद्धा तशीच एक पोस्ट.आपला ब्लॉग सगळ्या परिस्थितीवर सकारात्मक विचार करायला कुठेतरी भाग पडतो.

असाच एक "कम्युनिटी पोलिसिंग"चा सकारात्मक आणि यशस्वी प्रयोग आपल्या भारतातच झाला होता: त्रिची - तिरुचिरापल्लीला.
त्याबद्दल पेपरात पण आलं होतं थोडं फार.
त्याबद्दलची माहिती खालच्या लिंक्सवर वाचायला मिळेल.
तुमच्या या ब्लॉगमध्ये त्याचा संदर्भ(reference) योग्य ठरेल असं वाटलं म्हणून ही कमेंट.
http://www.businessworld.in/index.php/The-Guardians-of-Peace.html

http://www.maricoinnovationfoundation.org/awards/pdfs/winners_trichypolice.pdf

BTW, सध्या त्रिचीची काय परिस्थिती आहे काही कल्पना नाही बुवा.