मंगळवार, १६ नोव्हेंबर, २०१०

लॉटरीच्या 'एसएमएस'द्वारेही सुरू आहे फसवणूक

'अभिनंदन! आपल्याला एक लाख डॉलरचे बक्षीस लागले असून, खालील पत्त्यावर संपर्क साधा,' असा संदेश तुमच्या मोबाईलवर आला, तर त्याला मुळीच प्रतिसाद देऊ नका. कारण, "ई-मेल'पाठोपाठ आता मोबाईल "एसएमएस'द्वारेही लॉटरीच्या नावाने लोकांची फसवणूक करण्याचे प्रकार सुरू झाले आहेत.

इंटरनेट वापरणाऱ्यांना या प्रकाराचा अनुभव खूप दिवसांपासून येत आहे. त्यांच्या "ई-मेल' खात्यावर असे "ई-मेल' येतात. संगणकाद्वारे काढण्यात आलेल्या लॉटरीत आपला ई-मेल आय.डी. बक्षिसासाठी निवडला गेल्याचा दावा त्यामध्ये केलेला असतो. ते बक्षीस आपल्यापर्यंत पाठविण्यासाठी प्रथम आपली माहिती आणि त्यानंतर काही पैशांची मागणी केली जाते. त्यासाठी बॅंकेतील खाते क्रमांक कळविला जातो. त्यामध्ये पैसे जमा करण्यास सांगण्यात येते. त्याला प्रतिसाद दिला, की पुढील "प्रक्रिया' सुरू होते. बक्षीस पाठविण्याचा खर्च म्हणून पैसे भरण्यास सांगण्यात येते. एकदा पैसे भरले तरी विविध कारणे सांगून पुन्हा पुन्हा पैसे भरण्यास सांगण्यात येते. शेवटी फसवणूक झाल्याचे लक्षात येते.

आता हाच प्रकार मोबाईलच्या बाबतीत होत आहे. खासगी कंपन्यांबरोबरच भारत संचार निगमच्या मोबाईलवरही असे "एसएमएस' येतात. "आपला क्रमांक बक्षिसासाठी निवडण्यात आला आहे. अमुक-तमुक देशाच्या लॉटरीचे बक्षीस आपल्याला देण्यात येणार असून, त्यासाठी खालील ठिकाणी संपर्क साधा', असा हा संदेश असतो. त्यानंतर पुढील "प्रक्रिया' ई-मेलद्वारे केल्याप्रमाणेच असते. अशाप्रकारेही अनेकांना गंडा घातला गेल्याची उदाहरणे आहेत.

या संदर्भात पोलिसांच्या सायबर क्राइम विभागातील गणेश येमूल यांनी सांगितले की, असे प्रकार नायजेरियातून जास्त प्रमाणात केले जातात, असे आढळून आले आहे. तेथे फसवणूक करणे हा गुन्हा मानला जात नाही. त्यामुळे अशा प्रकारांना चालना मिळते. आपल्याकडे तक्रार आल्यावर गुन्हा दाखल झाला तरी संबंधित देशाशी आरोपी हस्तांतरणाचा करार नसल्याने आपल्याला त्यांच्यापर्यंत पोचता येत नाही.

असे मिळवतात नंबर
 मोबाईल कंपन्यांच्या बल्क "एसएमएस' सेवेद्वारे असे "एसएमएस' पाठविले जातात. यासाठीचे नंबर कॉल सेंटरमधील काही कर्मचारी, मोबाईल कंपन्यांचे छोटे-मोठे वितरक किंवा ज्यांच्याकडे मोबाईल क्रमांकांचा संच आहे, अशा लोकांकडून मध्यस्थांमार्फत मिळविले जातात. त्याबद्दल त्यांना मोबदला मिळत असल्याने तेही यासाठी तयार होतात. याचा वापर कशासाठी होणार आहे, हेही त्यांना अनेकदा ठाऊक नसते. (सकाळ, पुणे)

सोमवार, १ नोव्हेंबर, २०१०

चला, सजग नागरिक बनू या !

"वाइटाला वाईट म्हणणारी माणसे जेव्हा तयार होतील, अवतीभोवती घडणाऱ्या घटनांची माहिती देण्यासाठी पुढे येतील, तेव्हा गुन्हेगारी नियंत्रणाचे काम सोपे होईल,' असे पोलिस अधीक्षक कृष्ण प्रकाश आपल्या भाषणातून नेहमी सांगत असतात. त्यांना अपेक्षित असलेले सजग नागरिक जिल्ह्यात निर्माण झाले पाहिजेत. त्यासाठी आपल्यातील उदासीनता आणि पोलिसांकडे पाहण्याची दृष्टी बदलण्याची गरज आहे. गेल्या चार वर्षांपासून "पोलिसनामा' या सदरातून याच पद्धतीने समाजप्रबोधन करण्याचा प्रयत्न सुरू आहे.

आपल्या वर्तनाचा विचार केला, तर खरेच आपण अगदीच उदासीन होत चाललो आहोत. कोणत्याही घटनेकडे आपण, "मला काय त्याचे' या भावनेतून पाहतो. त्यामुळे आसपास घडलेले कितीतरी गुन्हे दडपले जातात. सामान्य नागरिकांच्या या वृत्तीचाच गुन्हेगार आणि गुंड फायदा घेतात. आपण एकमेकांच्या अडचणीच्या वेळी मदतीला धावून जातो का? रस्त्यात अपघात झाला, तर बघ्याची भूमिका घेणारेच अधिक असतात. जखमीला रुग्णालयात हलविण्यास कोणीही पुढाकार घेत नाही. उलट, अपघातास कारणीभूत ठरणाऱ्या वाहनाच्या चालकावर हात साफ करण्यासाठी मात्र अनेक हात सरसावतात.

आपण आपली स्वतःचीसुद्धा दक्षता घेत नाही. त्यामुळे बॅंकेच्या बाहेर थांबलेले ठग आपल्याकडील रोकड पळवू शकतात. आपण फसव्या योजनांच्या आहारी जातो. कोणताही माल घेताना पावतीचा अग्रह धरत नाही. पेट्रोल भरताना भेसळ दूरच; मापाचीसुद्धा खात्री करीत नाही. एकूणच, सामान्य माणूस म्हणजे उदासीन वृत्तीचा. त्याला कसेही लुबाडले तरी चालते, असाच समज रूढ होत आहे. त्यामुळे गुन्हेगारीला प्रोत्साहन मिळते आहे. आपल्या अवतीभोवती घडणारे गुन्हे, वावरणाऱ्या गुन्हेगारी वृत्तीच्या व्यक्ती यांच्यावर पोलिसांचा वचक हवा, अशी आपली अपेक्षा रास्त असली, तरी त्यासाठी प्रथम या लोकांना आपली भीती वाटली पाहिजे. गुन्हेगारी वृत्तीच्या लोकांना प्रतिष्ठा मिळणे थांबविणे सामान्य माणसांच्याही हातात आहे. याचा अर्थ, एकट्या-दुकट्या माणसाच्या हाती नव्हे, तर सामान्य माणसाची सामुदायिक ताकद यासाठी निर्माण व्हावी लागेल. या ताकदीला पोलिसांची योग्य साथ मिळाल्यास गुन्हेगारीवर वचक निर्माण करणे सोपे होईल.

येथे पोलिस आणि सामान्य माणूस यांचे संबंधही चांगले हवेत. सध्या मात्र या दोघांचे एकमेकांबद्दल गैरसमज आहेत. पोलिस गुन्हेगारांचीच पाठराखण करतात, असाच सामान्य माणसांचा समज आहे, तर सामान्य माणूस पोलिसांना मदत करण्यासाठी पुढे येत नाहीत, असा पोलिसांचा आक्षेप आहे. त्यामुळे हे दोन्ही घटक एकमेकांपासून दुरावले आहेत. त्यांचा हा दुरावा गुन्हेगारांच्या पथ्यावर पडणारा आहे. त्यासाठी कृष्ण प्रकाश यांच्यासारख्या अधिकाऱ्यांनी पुढाकार घेऊन पोलिस व सामान्य माणसांतील दुरावा कमी करण्यासाठी प्रयत्न केले पाहिजेत. अर्थात, त्यासाठी दोघांचेही वर्तन सुधारावे लागले. त्याशिवाय एकमेकांबद्दल विश्‍वासाचे वातावरण निर्माण होणार नाही. पोलिस ठाण्यात गेलेल्या सामान्य माणसाला सन्मानाची वागणूक मिळाली पाहिजे, त्यांची कामे विनासायास झाली पाहिजेत. सध्या चित्र उलटे आहे. सामान्य माणसाला चकरा माराव्या लागतात, तर गुन्हेगारी वृत्तीच्या लोकांना पोलिसांमध्ये जादा महत्त्व आहे.

त्यामुळे एक वेळ अशी येते, की सामान्य माणसांना आपल्या कामासाठी या गुन्हेगारी व्यक्तींचीची मदत घ्यावी लागते. हे चित्र बदलण्यासाठी कृष्ण प्रकाश यांनी प्रयत्न सुरू केले आहेत. त्याला सामान्य नागरिकांनी साथ दिली पाहिजे. "सकाळ'नेही यासाठी वेळोवेळी पुढाकार घेतला आहे. "पोलिसनामा' या सदरातून पोलिसांचे दोष तर दाखविण्याचा प्रयत्न केलाच; पण जनतेच्या चुकाही दाखवून देण्याचा प्रयत्न केला. अनेक उपायही सुचविले. यातून सकारात्मक काही घडावे, अशीच यामागील अपेक्षा आहे.